चालू घडामोडी - १६ जून २०१७

Date : 17 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वयानेही सर्वांत मोठा गुरू : 
  • आपल्या ग्रहमालेतील गुरू हा ग्रह केवळ आकारानेच नव्हे, तर वयानेही इतर ग्रहांहून मोठा आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून सूर्यानंतर ४० लाख वर्षांच्या आत हा प्रचंड आकाराचा वायूरूप ग्रह जन्माला आला असावा, असा त्यांनी हिशेब मांडला आहे.

  • ग्रहमाला तयार होऊन ती सध्याच्या रचनेपर्यंत कशी विकसित झाली हे समजण्यासाठी गुरू ग्रहाचे वय जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ग्रहमाला तयार होत

  • असताना गुरू ग्रह तुलनेने लवकर तयार झाला, असा ढोबळ अंदाज यापूर्वीच्या मॉडेलवरून करण्यात आला होता, तरी गुरूच्या जन्माचा नेमका कालखंड कधी ठरविला गेला नव्हता.

  • अमेरिकेतील लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांच्या चमूने आता नव्या अभ्यासातून गुरूचे नेमके वय ठरविले असून त्यांचा हा शोधप्रबंध ‘प्रोसीडिंग्ज आॅफ दि नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ सायन्सेस’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश :
  • चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली.

  • बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

  • तसेच त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.

  • तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले.

न्यायिक कृतिवादाचे प्रणेते न्या. भगवती कालवश :
  • देशातील न्यायिक कृतिवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी सरन्यायाधीश पी.एन. भगवती यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

  • भगवती देशाचे १७ वे सरन्यायाधीश होते. त्यांनी जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ यादरम्यान देशाचे हे सर्वोच्च न्यायिक पद भूषविले होते.

  • तसेच ते गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. जुलै १९७३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.

  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी जनहित याचिका आणि भारतीय न्यायिक प्रणालीप्रती संपूर्ण उत्तरदायित्व या दोन संकल्पना अस्तित्वात आणल्या.

राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत ‘मेट्रो मॅन’ची एन्ट्री; ई. श्रीधरन NDA चे उमेदवार : Presidential poll
  • राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा राजकीय घडामोडी रंगतदार होताना दिसत असून गेल्या काही दिवसांपासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल, यावरून अनेक अंदाज बांधले जात आहेत.

  • विरोधी पक्षांच्या आघाडीसह संपूर्ण राजकीय वर्तुळाला भाजपच्या निर्णयाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अजूनही कोणालाही याचा थांगपत्ता लागून दिलेला नाही. सुरूवातीला एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव चर्चेत आले होते.

  • आता या स्पर्धेने आणखी एक रंगतदार वळण घेतले असून कोणालाही अपेक्षा नसलेले ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांचे नाव अचानकपणे चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे शनिवारी कोची मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ई.श्रीधरन व्यासपीठावर एकत्र येत असल्याने या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

इस्रो बनवतेय केरोसीनवर चालणारे सेमी-क्रायोजेनिक इंजिन :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. याच इस्रोने आता आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

  • इस्रोकडून सध्या प्रक्षेपकासाठीचे सेमी-क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्याचे काम सुरू आहे. या इंजिनामध्ये इंधन म्हणून रिफाईंड केरोसीनचा वापर करण्यात येणार आहे.

  • अन्य पारंपरिक इंधनांच्या तुलनेत रिफाईंड केरोसीन हे अधिक पर्यावरणपूरक समजले जाते. याशिवाय किंमत आणि साठवणुकीच्यादृष्टीने केरोसीन किफायतशीर आहे.

  • सूत्रांच्या माहितीनुसार, केरोसीनचा वापर केलेल्या या सेमी-क्रायोजेनिक इंजिनाची पहिली चाचणी २०२१ पर्यंत पार पडू शकते.

जीएसटीपूर्वी ग्राहकांची दिवाळी, जवळपास सर्वच कंपन्यांकडून भरघोस सूट
  • देशात ०१ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, मात्र त्याचा परिणाम आत्ताच जाणवू लागला आहे. कारण जवळपास सर्वच कंपन्यांनी वस्तूंवर भरघोस सूट दिली आहे. एसी, टीव्ही, फ्रीज आणि मोबाईलसह इतर वस्तूंवरही मोठी सूट दिली जात आहे.

  • दुचाकी, चारचाकींवरही सूट

  • मारुतीच्या कारवर अगोदरपासून जी सूट दिली जात होती, ती आणखी दहा हजार रुपयांनी वाढवली आहे. टोयोटाच्या गाड्यांवरही अशीच सूट आहे. टाटाच्या कारवरही ऑफर सुरु आहे.

  • दुचाकींवरही डिस्काऊंट दिला जात आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी बंपर सेल सुरु झाल्याने या ऑफर दिल्या जात आहेत. विविध कंपन्यांच्या गाड्यांवर १५ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार : १६ जून १९२०

  • आर्या आंबेकर, मराठी गायिका : १६ जून १९९४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • देशबंधू चित्तरंजन दास, बंगालमधील कायदेपंडित : १६ जून १९२५

  • श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक, नट : १६ जून १९७७

ठळक घटना

  • फोर्ड मोटर कंपनीची स्थापना : १६ जून १९०३

  • व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वोस्तोक - ६ या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला : १६ जून १९६३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.