चालू घडामोडी - १९ जुलै २०१७

Date : 19 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकची मागणी केंद्राने फेटाळली :
  • स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांची मागणी केंद्र सरकारनं फेटाळून लावली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वतंत्र झेंड्याची कुठलीही तरतूद नाही, असं म्हणत केंद्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.

  • राज्यघटनेतील ‘एक देश, एक ध्वज’ या सिद्धांताच्या आधारावर तिरंगा हाच संपूर्ण देशाचा ध्वज आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

  • आपला एकच देश आहे आणि एकच ध्वज आहे, असं गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. राज्यांना स्वतंत्र ध्वज देण्याची परवानगी देणारी अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

ब्रिटनच्या संसदीय समितीत पहिल्या महिला प्रीत कौर गिल :
  • ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये पहिल्यांदाच एका महिला शिख खासदाराची वर्णी लागली आहे.

  • प्रीत कौर गिल यांची या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये ११ जणांचा समावेश आहे.

  • गृह मंत्रालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे हे या समितीचे मुख्य काम आहे, प्रीत कौर या लेबर पार्टीच्या खासदार आहेत.

  • २०१७ मध्ये बर्मिंघम एबेस्टन येथून त्यांनी निवडणूक जिंकली होती. यापुर्वी सप्टेंबर २०१६ पर्यंत लेबर पार्टीच्या केथ वेज ह्या या समितीमध्ये होत्या मात्र ड्रग्स आणि वेश्यावृत्तीच्या आरोपांमुळे त्यांना समितीमधून बाहेर पडावे लागले होते. 

‘लोकमत’तर्फे आज दिल्लीत ८ आदर्श संसदपटूंचा गौरव !
  • बुधवारी सायंकाळी ५ वाजता दिल्लीच्या विज्ञान भवनात होणाऱ्या सोहळ्यात लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी ४ अशा ८ आदर्श सदस्यांचा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकमत संसदीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

  • भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे असून सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून एन.के. प्रेमाचंद्रन (लोकसभा सदस्य) व सीताराम येचुरी (राज्यसभा सदस्य) यांना दिला जाईल.

  • सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) व जया बच्चन (राज्यसभा) यांना दिला जाणार असून, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव केला जाणार आहे.

इंग्लंडची अंतिम फेरीत धडक :
  • अनुभवी सराह टेलरने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने रोमांचक पराभव करून महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

  • आफ्रिकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ४९.४ षटकांत ८ बाद २२१ धावा काढल्या.

  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. दरम्यान, तरीही इंग्लंडसाठी धावांचा पाठलाग करणे सोपे गेले नाही.

  • ठराविक अंतराने धक्के बसत गेल्याने इंग्लंडच्या धावगतीवरही परिणाम झाला. मात्र, एक बाजू लावून धरलेल्या टेलरने ७६ चेंडंूत ७ चौकारांसह संयमी ५४ धावांची खेळी केली. कर्णधार हीथर नाइट (३०) आणि फ्रॅन विल्सन (३०) यांनी चांगली फलंदाजी केली. 

LOC वर त्या २१७ विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी करावे लागले स्पेशल ऑपरेशन :
  • सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या नापाक कारवायांना भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर मिळत असल्याने पाकिस्तानने आता सीमावर्ती भागात रहाणा-या नागरीकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

  • मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून मोर्टरचा मारा सुरु झाल्यानंतर तीन शाळांमधली २१७ विद्यार्थी आणि १५ शिक्षक इमारतीमध्ये अडकले होते, यावेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मोठया धाडसाने त्या सर्वांची सुखरुप सुटका केली. 

  • नौशेरा सेक्टरमधील एका शाळेच्या इमारतीवर थेट मोर्टरचा मारा झाला पण सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

  • विद्यार्थी आणि शिक्षकांची सुखरुप सुटका करण्यासाठी पाच बुलेटप्रूफ गाडया आणि तीन बसेसची तैनाती करण्यात आली होती अशी माहिती राजौरी जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉ. शकील इक्बाल चौधरी यांनी दिली.

युवा नेमबाजांना मिळणार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण :
  • देशात युवा नेमबाजांचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगच्या स्पोटर्स प्रमोशन फाऊंडेशनने (जीएनएसपीएफ) आपल्या प्रोजेक्ट लीपसाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टसह हातमिळवणी केली.

  • प्रोजेक्ट लीप अंतर्गत पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील शुटींग रेंजमध्ये पहिले रायफल शिबिर पार पडले.

  • निवड करण्यात आलेल्या २३ नेमबाजांमध्ये पुण्याचे सर्वाधिक १२ नेमबाज असून हैदराबाद व सिकंदराबादचे प्रत्येकी ३, जबलपूरचे दोन आणि मुंबई, भुवनेश्वर व गुजरातचे प्रत्येकी १ नेमबाज आहेत.

नेपाळ चीनकडून इंटरनेट सेवा घेणार :
  • नेपाळने ऑगस्ट महिन्यापासून चीनकडून इंटरनेट सेवा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या परिसरातील भारताची इंटरनेट सेवेबाबतची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे.

  • नेपाळ सध्या भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेवर अवलंबून आहे. भैरहवा, बिरगुंज आणि बिराटनगर या भागातून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून ही इंटरनेट सेवा पुरवली जाते.

  • चीनकडून हिमालयाच्या परिसरातून नेपाळपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला नेपाळमध्ये चीनी इंटरनेट सेवा सुरू होईल.

  • चीन ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून नेपाळला जोडला गेल्याने दक्षिण आशियाई परिसरातील भारताच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसणार आहे.

रशियाला भूकंपाचा धक्का : 
  • रशियाच्या पूर्व किनाऱ्याला ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने म्हटले आहे.

  • यात जीवित वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. या धक्क्यामुळे प्रशांत महासागराच्या काही भागात त्सुनामीची शक्यता असल्याचा इशाराही विभागाने दिला होता.

  • नंतर हा इशारा पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने मागे घेतला. भूकंपाचे केंद्र रशियाच्या पूर्व-आग्नेय दिशेला १९९ किलोमीटरवर ११.७ किलोमीटर खोलीवर होते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • शहीद दिन : म्यानमार.

  • राष्ट्रीय मुक्ती दिन : निकाराग्वा.

जन्म, वाढदिवस

  • डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ : १९ जुलै १९३८

  • ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान : १९ जुलै १८९४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • राणोजी शिंदे, पेशवाईतील घोडदळाचे प्रमुख सेनापती व जहागिरदार : १९ जुलै १७४५

ठळक घटना 

  • नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना : १९ जुलै १९७६

  • निकाराग्वात उठाव : १९ जुलै १९७९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.