चालू घडामोडी - २५ जून २०१७

Date : 25 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'सचिन..अ बिलिअन ड्रीम्स' अनोखा विक्रम :
  • भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत सचिन..अ बिलिअन ड्रीम्स चित्रपटाने नवा विक्रम आपल्या नावे केला असून २६ मे रोजी प्रदर्शित झालेला हा डॉक्यू ड्रामा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

  • मास्टर ब्लास्टरच्या जीवनावर आधारीत हा डॉक्यू - ड्रामा सलग तीन आठवडे थिएटरमध्ये सुरू होता. हा चित्रपट मराठी, इंग्लिश, तेलुगु, हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता होता. तर महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, दिल्ली, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांनी करमुक्त केला होता.

  • सचिन - ए बिलीयन ड्रीमचे निर्माते रवी भागचंदका माध्यमांशी बोलताना म्हणाले, या क्षेत्रातील अनेकजण गोंधळात होते कारण अशा प्रकारचा डॉक्यू - ड्रामा भारतात कसा चालेल याबद्दल ते साशंक होते.

  • पण सचिनचा जीवनपट मांडण्यासाठी आमचे व्हिजन शुध्द आणि सुस्पष्ट होते. या माध्यामातून त्याची कथा उलगडेल यानर आम्ही ठाम होतो.

आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील काळरात्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमधून देशवासीयांना संबोधित केले. ‘मन की बात’चे हे ३३ वे पर्व होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींनी देशवासीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

  • आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील काळरात्र असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

  • लोकशाही देशाची शक्ती असून लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे मोदींनी म्हटले आहे.

दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी !
  • राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ही कर्जमाफी ३४ हजार २२ कोटी रुपयांची असेल. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला असून, त्यामुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  • देशात आजवर कुठल्याही राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीपेक्षा ही रक्कम अधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे.

  • या निर्णयामुळे दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेले ३६ लाख शेतकरी आणि त्यापेक्षा अधिकचे कर्ज असलेले ८ लाख अशा ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल.

  • सरकारने ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. याआधी सरकारने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. चालू वर्षीचेही कर्ज माफ करण्याची मागणी मान्य करता येणार नाही. तसे कधीही झालेले नव्हते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आणि ट्रम्प मोदींना म्हणाले सच्च्या दोस्ताची वाट पाहतोय : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशाच्या दौऱ्यावरअसून पहिल्या टप्प्यात त्यांनी पोर्तुगालला भेट दिली आणि त्यानंतर ते आज अमेरिकासाठी रवाना झाले आहेत.

  • पंतप्रधान मोदी व्हाइट हाउसवर ट्रम्प यांची सोमवारी पहिल्यांदा भेट घेतील असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वागताची तयारी पूर्णपणे केली आहे.

  • मोदीच्या स्वागताचे ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपला सच्चा दोस्त म्हटले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, व्हाइट हाऊसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वगतासाठी प्रतीक्षा करीत आहे. खऱ्य़ा मित्राप्रमाणे अनेक गोष्टीवर चर्चा होणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतासाठी २२ निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. 

पैसे न भरताच रेल्वे तिकिटाचे बुकिंंग : 
  • लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी रेल्वेने आता आधी तिकीट काढा, पैसे नंतर द्या, अशी नवी सेवा सुरू करण्याचे ठरविले असून, आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकीट मिळणार आहे.

  • डिजिटल पेमेंट स्वीकारणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे. या सेवेमुळे प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकीट बुकिंग केल्यानंतर १४ दिवसांनंतर तिकिटाचे पैसे देता येणार आहेत.

  • या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के इतका सेवाकर मात्र घेण्यात येणार आहे. या सेवेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ई-पेलॅटर या कंपनीशी सहकार्य करार केला आहे.

  • आयआरसीटीसीच्या या सेवेमुळे प्रवाशांना आता तिकीट बुकिंगच्या वेळी लगेचच पैसे द्यावे लागणार नाहीत. या कॅशलेस बुकिंगचा फायदा आतापर्यंत ५० जणांनी घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीचे प्रवक्ते संदीप दत्ता यांनी दिली आहे.

भारतीय महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी :
  • इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली असून इंग्लंडवर ३५ धावांनी मात करुन कर्णधार मिताली राजच्या टीम इंडियाने दणदणीत विजय साजरा केला.

  • भारताने इंग्लंड महिला संघाला विजयासाठी २८२ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाज २४६ धावांमध्येच गारद झाल्या.

  • दिप्ती शर्मा ३, शिखा पांडे २ आणि पूनम यादवने घेतलेल्या एका विकेटच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना स्वस्तात रोखता आलं. इंग्लंडचा अख्खा संघ केवळ २४६ धावांचीच मजल मारु शकला.

  • सलामीवीर पुनम राऊत (८६) आणि स्मृती मंधाना (९०) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार मिताली राजनेही ७१ धावांची खेळी करुन महत्वाची भूमिका निभावली. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : मोझांबिक.

जन्म, वाढदिवस

  • विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान : २५ जून १९३१

  • करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री : २५ जून १९७४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक : २५ जून २००९

ठळक घटना

  • भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहिर केली : २५ जून १९७५

  • कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून वर्ल्डकप जिंकला : २५ जून १९८३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.