चालू घडामोडी - १७ एप्रिल २०१८

Date : 17 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रकुलमध्ये चार पदके कमावणाऱ्या मनिकाची कमागिरी ५३ देशांहून भारी :
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत एकूण ६६ पदकांची कमाई केली. यामध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य, आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक मिळवणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताने या ६६ पदकांसहीत तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया १९८ पदके (८० सुवर्ण, ५९ रौप्य आणि ५९ कांस्य) आणि इंग्लंड १३६ पदके (४५ सुवर्ण, ४५ रौप्य आणि ४६ कांस्य) हे दोन देश या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत.

  • विशेष म्हणजे मनिका बत्रा ही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकणारी खेळाडू ठरली आहे. तिने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा चार पदकांची कमाई केली आहे. म्हणजेच सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये मनिकाचे नाव लिहायचे ठरवल्यास ती १८ व्या स्थानी असेल. म्हणजेच पदकांच्या यादीच्या दृष्टीने राष्ट्रकुलमध्ये सहभागी झालेल्या ७१ देशांपैकी ५३ देशांहून मेनकाची कामगिरी सरस राहिली आहे असे म्हणता येईल.

  • भारताच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाकाच लावला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीही टेबल टेनिसपटूंनी दोन कांस्यपदक आपली नावे कोरली. दहा सदस्यीय टेबल टेनिस संघाने एकूण ८ पदकांची कमाई केली. त्यात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. या आठ पैकी चार पदके बत्राच्या नावे आहेत. शेवटच्या दिवशी मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जी.

  • साथियनसह तिने भारताच्याच अचंता शरथ कमल व मौमा दास या जोडीचा ११-६, ११-२, ११-४ असा पराभव करत चौथे पदक आपल्या नावे केले. यापूर्वी तिने महिला एकेरीच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह महिला सांघिक गटात बाजी मारली होती. तसेच महिला दुहेरीत मौमा दासच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडनमध्ये दाखल, विमानतळावर झाले जंगी स्वागत :
  • स्कॉटहोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. सोमवारी उशिरा रात्री ते स्वीडन येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉवेन यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी तेथील भारतीय नागरिकांचीही भेट घेतली.

  • आज पंतप्रधान मोदी अनेक बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापार आणि गुंतवणुकीसह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भर देतील. देशवापसी करताना 20 एप्रिलला पंतप्रधान मोदी बर्लिन येथे काही वेळासाठी थांबवणार आहेत.

  • या दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'भारत आणि स्वीडनमध्ये मैत्रीचे नाते आहे. आमच्यातील भागीदारी लोकशाही मूल्यं तसेच खुल्या, सर्वसमावेश आणि नियमांच्या आधारावर आधारित आहे. विकासाच्या बाबतीत स्वीडन हा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. ''

शिक्षणासाठी पाश्चिमात्य देशांत पोषक वातावरण - प्रणव मुखर्जी :
  • मुंबई : पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षणासाठी आपल्या देशापेक्षा अधिक पोषक वातावरण आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. सातव्या डॉ. एम. विश्वेश्वरैया स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.

  • सोमवारी कफ परेड येथील एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष कमल मोरार्का, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष शरद उपासनी आणि विजय कलंत्री, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कार्यकारी संचालक वारेरकर या वेळी उपस्थित होते.

  • प्रणव मुखर्जी म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणसंस्था तेथील विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रूची निर्माण होईल, यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्याकडे त्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारतामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावतोय, तो अधिक उंचावण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवे. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशात १२ टक्के साक्षरता होती. आज भारतात साक्षरतेचे प्रमाण वाढून ७४ टक्के इतके झाले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी ७० वर्षे लागली.

  • डॉ. एम. विश्वेश्वरैया यांच्या आठवणींना उजाळा देताना मुखर्जी म्हणाले की, विश्वेश्वरैया हे देशाचे श्रेष्ठ पुत्र आहेत, त्यांनी देशाची बांधणी करताना स्वत:चे आयुष्य वेचले. त्यांनी राबविलेल्या नदीजोड प्रकल्पांमुळे अनेक खेड्यांमध्ये पाणी पोहोचले. मैसुरचे दिवाण असताना त्यांनी बंगळुरू कृषी विद्यापीठ, मैसूर साबण कारखाना, स्टेट बँक आॅफ मैसूर, मैसूर आयर्न अँड स्टील वर्क्ससारख्या कंपन्या आणि संस्थांची स्थापना करून रोजगार उपलब्ध करून दिले.

लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचीय? भगवद्गीता वाचा :
  • जयपूर: कोणतीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला, मुलाखत देणाऱ्या उमेदवाराला मोठ्या अपेक्षा असतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता परीक्षा, मुलाखत देणारे तसे कमीच. मात्र आता राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांना 'कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेऊ नका,' हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भगवदगीतेमधील प्रश्न विचारले जाणार आहेत.  

  • राजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) 2018 च्या प्रशासकीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडा बदल केला आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानाला नितीशास्त्राची जोड देण्यात आली आहे. यामध्ये भगवद्गीता आणि महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय नेते, समाज सुधारक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनाबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे. 

  • राजस्थान प्रशासकीय सेवेच्या 2018 च्या बदलेल्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानाबद्दलचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याशिवाय प्रशासन आणि व्यवस्थापनात भगवद्गीतेची भूमिका यासंदर्भातील प्रश्नदेखील विचारले जातील. या पेपरमध्ये एकूण 3 युनिट असतील. भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्रावरील लढाईच्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेल्या संवादाचे 18 अध्याय आहेत. यामधूनच परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.  

  • विद्यार्थ्यांना प्रशासकीय आणि व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी भगवद्गीतेमधील प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं राजस्थान लोकसेवा आयोगच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 'सर्व अध्याय लक्षात ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळू शकतात. त्यामुळे त्यांना अधिकारी झाल्यावर प्रशासकीय निर्णय घेताना मदत होईल,' अशी माहितीदेखील या अधिकाऱ्यानं दिली. 

कोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून मुंबईसाठी विमानसेवा :
  • कोल्हापूर : गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आता उद्यापासून (मंगळवार) सुरु होणार आहे. मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान योजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.

  • कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर - मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.

  • मुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.

  • खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत नियोजन केलं आहे. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.

राष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी - महाराणी एलिझाबेथ सोडणार पद :
  • लंडन- राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला आजपासून सुरुवात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रवाना झाले आहेत. या परिषदेकडे कॉमनवेल्थ सदस्य देशांबरोबर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

  • इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ या पदावरुन आता निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. 92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नवे राष्ट्रकुलप्रमुख कोण असतील यावर विचार होणार आहे. एलिझाबेथ यांच्यानंतर राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • भारताचे पंतप्रधान 2009 नंतर पहिल्यांदाच या सभेला जात आहेत. यापुर्वी माल्टा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी यांच्या मतानुसार, भारताचा विविध धोरणात्मक संस्थांमध्ये वावर वाढला आहे आणि कॉमनवेल्थही त्यापैकीच एक आहे.

  • भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्त्वाची भूमिका हवीच आहे आणि इंग्लडलाही भारताने कॉमनवेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी असे वाटते. 16 आणि 17 एप्रिल हे दोन दिवस पंतप्रधान मोदी स्वीडन येथे असतील. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफ्वेन यांची ते भेट घेतील आणि व्यापार, संरक्षणविषयक करारांवर ते स्वाक्षरी करतील. त्यानंतर इंडिया-नॉर्डिक शिखर परिषदेतही सामिल होणार आहेत. नॉर्डिक परिषदेमध्ये डेन्मार्क, फिनलंड, आईसलँड आणि नॉर्वेही सहभागी होतील.

  • पंतप्रधानांचे होणार भव्य स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्लंडमध्ये उचित स्वागत झाल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातर्फे राष्ट्रकुल सदस्य राष्ट्रांच्या अध्यक्षासांठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. थेरेसा मे यांच्याशी विविध विषय़ांवर ते चर्चा करतील आणि मेक इन इंडियाअंतर्गत भारतात गुंतवणूक वाढण्यासाठी ते प्रयत्न करतील असे सांगितले जात आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

  • १९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

  • १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

  • १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.

  • १९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.

  • २००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जन्म

  • १४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.

  • १८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)

  • १८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)

  • १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)

  • १८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)

  • १९१६: श्रीलंकेच्या ६ व्या आणि जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओबंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)

  • १९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदूयांचा जन्म.

  • १९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.

  • १९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.

मृत्यू

  • १७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी१७०६)

  • १८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)

  • १९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर१८६९)

  • १९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)

  • १९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१६)

  • १९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.

  • २००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर१९२५)

  • २००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९७२)

  • २०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९२६)

  • २०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन १ ९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.