चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ एप्रिल २०२०

Date : 2 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू :
  • देशातील करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असताना चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. अशातच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी (किर्तनकार) काम केलेल्या व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आलं होतं. करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं तपासणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट आल्यानंतर पद्मश्री प्राप्त व्यक्तीला करोना झाल्याचं निष्पन्न झालं.

  • अस्थमाचा त्रास असल्यानं या व्यक्तीच्या जिवास धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. प्रकृती ढासळल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर गुरूवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.

पुण्यात आणखी दोघांना करोनाचा संसर्ग; महाराष्ट्राचा आकडा ३३८ : 
  • राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या अडीचशेच्या जवळ गेली आहे. गुरूवारी यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. यात पुण्यामध्ये दोन, बुलढाण्यामध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा ३३८ वर गेला आहे.

  • चिंतेची बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.  देशाच्या तुलनेत राज्यात या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ टक्का अधिक आहे.

देशात एकाच दिवसात ३८६ नवे रुग्ण : 
  • देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३८६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६३७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १३२ रुग्ण बरे झाले आहेत.

  • एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा असला तरी तो मुख्यत्वे तबलिगी जमातच्या अनुयायांना झालेल्या बाधेमुळे वाढला आहे. हा देशव्यापी आलेख नसल्याची माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आत्तापर्यंत ४७,९५१ वैद्यकीय चाचण्या झाल्या असून, सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ४५६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

  • निजामुद्दीन मरकजमधील १८०० अनुयायींना दिल्लीतील नऊ रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. विविध ठिकाणी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकार सातत्याने लोकांना आवाहन करत आहे की, कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक समारंभ करू नये व लोकांनी गर्दी करू नये. करोना रोखण्याचा हा एकमेव पर्याय आहे.

  • प्रवासी विमानांतून मालवाहतुकीची विशेष परवानगी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. वैद्यकीय उपकरणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी १४ दिवस ही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

तबलिगी कार्यक्रमातील व्यक्तींच्या संपर्कातील सर्वाचा रेल्वेकडून शोध :
  • दिल्लीतील निजामुद्दीन पश्चिम येथील मरकजमध्ये तबलिगीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांनी ज्या रेल्वेतून प्रवास केला, त्या पाच रेल्वेगाडय़ातील त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

  • तबलिगी जमातच्या कार्यक्रमास हजारो लोकांची उपस्थिती होती. त्यांनी ज्या रेल्वेगाडय़ांमधून प्रवास केला. त्यात १३ मार्च व १९ मार्च दरम्यान दिल्लीहून सुटलेल्या गाडय़ांमध्ये दुरांतो एक्स्प्रेस दिल्ली -गुंटूर, ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस दिल्ली – चेन्नई, तमिळनाडू एक्स्प्रेस दिल्ली ते चेन्नई, राजधानी एक्स्प्रेस दिल्ली ते रांची, संपर्क क्रांती एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. या लोकांच्या संपर्कात नेमके किती जण आले होते याचा कुठलाही आकडा रेल्वे खात्याकडे उपलब्ध नाही. प्रत्येक रेल्वेने साधारण १०००-१२०० लोकांनी प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना धोका असू शकतो.

  • रेल्वेने त्या गाडय़ांमधील प्रवाशांची माहिती राज्यांना देण्याचे ठरवले असून एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेसने १० इंडोनेशियन व्यक्तींनी प्रवास केला होता. ते दिल्लीहून करीमनगरला गेला होते. १३ मार्चला हा प्रकार झाला होता. त्यानंतर त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. नवी दिल्ली ते रांची राजधानी एक्स्प्रेस या गाडीत बी १ डब्यात साठ प्रवासी होते. त्यात मलेशियन महिलेने प्रवास केला होता. तिची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. १६ मार्चला एका महिलेने इतर २३ जणांबरोबर झारखंडपर्यंत प्रवास केला होता. त्यातील महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पंतप्रधानांचा आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी करोनाचा फैलाव रोखणे, स्थलांतरितांचा प्रश्न आणि ताबलिग जमातमध्ये सहभागी झालेल्यांच्या संपर्कात कोण आले या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता या बाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. करोनाची लागण आणि त्याच्याशी संबंधित प्रश्नांवर दोन आठवडय़ांच्या कालावधीत होणारी ही दुसरी तर केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर होणारी ही पहिलीच चर्चा आहे.

  • मरकझ निझामुद्दीन येथे जमलेल्यांना शोधून क्वारण्टाइन करणे आणि चाचण्या घेणे या बाबत अनेक राज्यांमध्ये काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

०२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.