चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ डिसेंबर २०१९

Updated On : Dec 02, 2019 | Category : Current Affairs‘एमपीएससी’ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर :
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसह कृषी सेवा परीक्षेचा समावेश आहे.

 • आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा ५ एप्रिल तर मुख्य परीक्षा ८, ९ व १० ऑगस्ट रोजी होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा १ मार्च तर मुख्य परीक्षा १४ जून रोजी घेतली जाईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा १५ मार्च तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी होणार आहे.

 • महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा १० मे तर मुख्य परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी असेल. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेत ५ जुलै रोजी पूर्व परीक्षा तर १ नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

 • पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा ३ मे रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा ६ सप्टेंबर, पोलीस उप निरीक्षक पद मुख्य परीक्षा १३ सप्टेंबर, राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २७ सप्टेंबर तर सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १७ मे रोजी होणार आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १८ ऑक्टोबर रोजी होईल. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ७ जून रोजी होणार आहे. संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा २९ नोव्हेंबर, लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षा ६ डिसेंबर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क मुख्य परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर कर सहायक मुख्य परीक्षा २० डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

जीएसटी संकलन पुन्हा एक लाख कोटींवर : 
 • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनापोटी नोव्हेंबरमध्ये एक लाख तीन हजार ४९२ कोटी रुपये जमा झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. जीएसटी संकलनातील वाढीचे हे प्रमाण ६ टक्के आहे.

 • सणासुदीच्या काळातील मागणीमुळे जीएसटी संकलन वाढल्याचे सांगण्यात येते. जीएसटी संकलन याच महिन्यात गेल्या वर्षी ९७ हजार ६३७ कोटी रुपये होते, तर हे संकलन ऑक्टोबरमध्ये ९५ हजार ३८० कोटी रुपये होते.

 • ऋण वाढीच्या दोन महिन्यांनंतर जीएसटी महसुलात सुधारणा होऊन नोव्हेंबर २०१९ मध्ये ६ टक्के वाढ झाली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटी संकलन वाढले याचा अर्थ मागणीत आणि जीएसटी भरणाही वाढला आहे. कठोर पावले न उचलता हे संकलन वाढले आहे.

 • नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत व्यवहारात जीएसटी संकलन १२ टक्के वाढले असून वर्षांतील हा उच्चांक आहे. नोव्हेंबरमध्ये १,०३,४९२ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले असून केंद्राचा जीएसटी १९,५९२ कोटी रुपये, तर राज्याचा २७,१४४ कोटी रुपये होता. एकात्मिक जीएसटी संकलन ४९,०२८ कोटी झाले. त्यात आयातीवरचा जीएसटी २०,९४८ कोटी रुपये होता. उपकर ७,७२७ कोटी रुपये होता. त्यात ८६९ कोटींचे संकलन आयातीवरचे आहे, असे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे.

दूरसंचार कंपन्यांकडून ५०टक्के शुल्कवाढ : 
 • व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने मंगळवार, ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले.

 • त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नेही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढीची घोषणा केल्याने मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

 • रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.

लंडन ब्रिज हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने स्वीकारली : 
 • लंडन : मध्य लंडनमधील पुलावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी गटाने घेतली आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते,  तर हल्लेखोर दहशतवाद्यास पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.

 • आयसिसच्या अमाक या वृत्त संस्थेने म्हटले आहे की, आयसिसच्याच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. साइट इंटेलिजन्स ग्रुप या जिहादी कारवायांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावरही याबाबत माहिती दिली आहे.

 • हल्लेखोर उस्मान खान हा दहशतवादी होता व त्याला सात वर्षांपूर्वी लंडन शेअर बाजारात बॉम्बस्फोटाचा कट, तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावणी चालवणे या आरोपांखाली २०१२ मध्ये दोषी ठरविण्यात आले होते.

दिनविशेष :
 • जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

महत्वाच्या घटना 

 • १४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.

 • १९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.

 • १९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.

 • १९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

 • १९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

 • १९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत.

 • १९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.

 • १९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

 • २००१: एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्म 

 • १८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)

 • १८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.

 • १८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९१८)

 • १९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.

 • १९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.

 • १९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.

 • १९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)

 • १९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.

 • १९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.

 • १९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.

मृत्यू

 • १५९४: नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १५१२)

 • १९०६: कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.

 • १९८०: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)

 • १९९६: आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्‍ना रेड्डी यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९१९ – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)

 • २०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)

 

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)