चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जानेवारी २०२०

Date : 2 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गगनयान मोहिमेसाठी चार जणांची निवड, एकाही महिला अंतराळवीराचा नाही समावेश : 
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-३ आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. बंगळुरुत के सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान २०२२ पर्यंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.

  • “गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. रशियामध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे.

  • २०१९ मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,” अशी माहिती के सिवन यांनी दिली आहे. याआधी के सिवन यांनी या मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश असेल अशी घोषणा केली होती. मात्र निवड झालेल्या अंतराळवीरांमध्ये महिलेचा समावेश नाही.

पुढच्या वर्षी चांद्रयान-३ मोहीम : 
  • बंगळूरु : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ योजनेची घोषणा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी केली. गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून, त्यांना लवकरच रशियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणार असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • तिसऱ्या चांद्रयान मोहिमेचे काम प्रगतिपथावर आहे. या मोहिमेत लँडर, रोव्हर, इंधन यंत्रणा अशा तीन घटकांचा समावेश असणार आहे. चांद्रयान ३ मोहीम पुढील वर्षी होईल. चांद्रयान ३ आणि गगनयान या दोन्ही मोहिमांचे काम सुरू आहे, असे शिवन यांनी सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेत यानाचा वेग कमी करताना आवश्यक समतोल साधला न गेल्याने यान चांद्रभूमीवर आदळले, असे शिवन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

  • गगनयान या भारताच्या समानव मोहिमेबाबत त्यांनी सांगितले की, चार अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण रशियात या महिन्यात तिसऱ्या आठवडय़ात सुरू होत आहे. हे चारही जण भारतीय हवाई दलातील आहेत. भारत आणि रशिया तसेच भारत व फ्रान्स यांच्यात गगनयान मोहिमेविषयी करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. त्यासाठी १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाकडून लवकरच नवीन सामरिक अस्त्राची घोषणा :
  • सोल : अण्वस्त्र निर्मूलन प्रकरणी  अमेरिके समवेत अडलेल्या चर्चेबाबत नैराश्य व्यक्त करीत उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी लवकरच धक्कादायक कृतीचे संकेत दिले असून नवीन सामरिक अस्त्राची घोषणा  करणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या टोळीसदृश धाकदपटशाला उत्तर देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल असे त्यांनी स्पष्ट केले.

  • किम यांनी सांगितले, अण्वस्त्र चाचण्यांवर एकतर्फी जाहीर केलेली बंदी आता आम्हीच मागे घेत आहोत. यापुढे अण्वस्त्रे व आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या खुलेआम घेण्यात येतील. उत्तर कोरियाने या चाचण्यांवर घातलेली एकतर्फी बंदी ही आपलीच मोठी कामगिरी असल्याचा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण या चाचण्या सुरू करण्याची घोषणा करताना त्यांनी सावध पवित्रा घेत वाटाघाटींचा मार्गही खुला ठेवला आहे.

  • किम यांनी राजनैतिक पेचाचा वापर लघु पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी करून घेतला, उत्तर कोरियाकडे आता ४०-५० अणुबॉम्ब असल्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या यंत्रणा वेगळ्या असून घन इंधन क्षेपणास्त्रातून अण्वस्त्रे सोडली जाऊ शकतात. शिवाय ही क्षेपणास्त्रे क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीस चकवा देऊ शकतात. शस्त्र कपातीसाठी अनुकूल भूमिका घेत किम यांनी वाटाघाटींची तयारी ठेवली आहे. त्यातून एकतर्फी शरणागतीचा पर्यायही खुला ठेवला आहे.

राज्य विधानसभांना स्वत:चे असे विशेषाधिकार : 
  • तिरुवनंतपुरम : केरळ विधानसभेने वादग्रस्त सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठराव पारित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी भाजप त्याविरुद्ध करत असलेली टीका अमान्य केली. राज्य विधानसभांना स्वत:चे असे विशेषाधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द करावा, असा ठराव केरळ विधानसभेने मंगळवारी संमत केल्यानंतर, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डाव्या आघाडी सरकारवर हल्ला चढवताना विजयन यांनी ‘अधिक चांगला कायदेशीर सल्ला’ घ्यावा, असे म्हटले होते.

  • नागरिकत्वाशी संबंधित कुठलाही कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेला असून, केरळसह कुठल्याही विधानसभेला नाही, असेही प्रसाद म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, खात्यात जमा करणार १२ हजार कोटी : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील तुमकूर येथे दौरा करणार असून नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी जमा केले जाणार आहेत. सहा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

  • देशभरात अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून त्याआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. है पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

  • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जातो. तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. प्रत्येक हफ्त्याला दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याला दिले जातात.

०२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.