चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ नोव्हेंबर २०१९

Date : 2 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताच्या निर्यात प्रोत्साहन योजनांविरोधात जागतिक व्यापार संघटनेचा निकाल :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेने देशी निर्यात प्रोत्साहन योजनांच्या मुद्दय़ांवर केलेल्या तक्रारीत जागतिक व्यापार संघटनेने भारताच्या विरोधात निकाल दिला असून अशा निर्यात प्रोत्साहन योजना या आंतरराष्ट्रीय व्यापार निकषांत बसणाऱ्या नसल्याचे म्हटले आहे. या निकालाचे अमेरिकेने स्वागत केले असून यामुळे अमेरिके तील कामगारांना समान संधीचा लाभ झाला असल्याचे म्हटले आहे. भारताने मात्र या निकालावर अपील करण्याचे ठरवले आहे असे नवी दिल्ली येथे एका अधिकाऱ्याने सांगितले.

  • भारताने त्यांच्या उत्पादकांना निर्यातीसाठी लागू केलेल्या प्रोत्साहन योजना या पक्षपाती आहेत, त्यामुळे इतर देशांवर अन्याय होतो असे जागतिक व्यापार संघटनेने स्पष्ट केले. या निकालावर अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटझियर  यांनी सांगितले की, अमेरिका सर्व मार्गाचा अवलंब करून कामगारांना स्पर्धात्मक जगात समान  संधी उपलब्ध करून देईल.

  • जागतिक व्यापार संघटनेच्या तंटा निवारण समितीने म्हटले आहे की, भारताने निर्यात वाढीवर आधारित अनुदाने देऊ नयेत, शिवाय या प्रोत्साहन योजना रद्द करण्यासाठी भारताला इतर विकसनशील देशांप्रमाणे आठ वर्षांचा कालावधीही दिला जाणार नाही. भारताच्या र्मचडाईज एक्स्पोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम, एक्स्पोर्ट ओरिएंटेड युनिटस, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्कस, एसइझेड, एक्स्पोर्ट प्रमोशन कॅपिटल गुडस या योजना जागतिक व्यापार निकषांमध्ये बसणाऱ्या नाहीत असे जागतिक व्यापार संघटनेच्या तंटा निवारण लवादाने म्हटले आहे.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?; जाणून घ्या महाराष्ट्रात कधी कधी लागू झाली :
  • निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे.

  • शिवसेनेची हीच मुख्यमंत्रिपदाची मागणी तिढ्याचं मुख्य कारण आहे. आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असं मोठं विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. पण राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय ती कशी लागू केली जाते याबद्दलची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. राष्ट्रपती लागवट म्हणजे काय आणि ती महाराष्ट्रामध्ये कधी कधी लागू झाली आहे? याचसंदर्भातील माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

  • भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राष्ट्रपती राजवट.

  • राज्यघटनेच्या कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख आहे. कलम ३५६ नुसार राज्याचे प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लावण्यात येऊ शकते. तसेच कलम ३६५ नुसार राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यास त्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कुठलाही निर्णय राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने घेत नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंतरच घेतात.

पाकिस्तानसाठी काश्मीर नव्हे, तर महागाई, बेरोजगारी मोठी समस्या :
  • इस्लामाबाद : काश्मीरचा प्रश्न नव्हे, तर वाढती महागाई आणि बेरोजगारी या पाकिस्तानला भेडसावणाऱ्या सर्वात दोन मोठय़ा समस्या आहेत, असे गॅलप इंटरनॅशनलने पाकिस्तानातील चारही प्रांतांत केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

  • देशाची अर्थव्यवस्था विशेषत: वाढती महागाई ही पाकिस्तानला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या असल्याचे मत ५३ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारी (२३ टक्के), भ्रष्टाचार (चार टक्के) आणि जलसमस्या (चार टक्के) अशी टक्केवारी असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

  • काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तान आटोकाट प्रयत्न करीत असला तरी केवळ आठ टक्के लोकांनीच त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राजकीय अस्थिरता, ऊर्जा समस्या, डेंग्यूची लागण आदी प्रश्नांबाबत व्यक्त करण्यात आलेल्या भीतीचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे.

  • पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुन्वा या चार प्रांतांतील महिला आणि पुरुष यांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था गर्तेत सापडली आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह कतार, चीन, सौदी अरेबिया आदींकडून आर्थिक मदत मिळाली आहे.

इंजिन बदल न केल्यास  इंडिगोला  उड्डाण परवानगी नाही :
  • नवी दिल्ली : ए ३२० निओ ९७ विमानांच्या दोन्ही पंखांखालील प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी (पीडब्ल्यू) इंजिन कोणत्याही स्थितीत ३१ जानेवारीपर्यंत बदलण्यात यावीत अन्यथा या विमानांच्या उड्डाणाला परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी इंडिगोला दिला आहे. विस्कटलेली घडी बसविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची गरज असल्याचेही डीजीसीएने स्पष्ट केले.

  • या ९७ विमानांपैकी २३ विमानांमध्ये पीडब्ल्यू इंजिन आहेत आणि त्यांचा २९०० तासांहून अधिक वापर झाला आहे त्यामुळे १९ नोव्हेंबपर्यंत पहिल्या टप्प्यात ती बदलावी, असेही डीजीसीएने इंडिगोला सांगितले आहे.

  • गेल्या एका आठवडय़ात ए३२० निओ विमानांच्या इंजिनात उड्डाण करताना बिघाड निर्माण झाल्याचे  प्रकार घडले होते त्या पाश्र्वभूमीवर डीजीसीएने वरील आदेश दिले आहेत.

झारखंडमध्ये ३० नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणुका; २३ डिसेंबर रोजी निकाल :
  • झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येथील ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे.

  • निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे.

  • झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय  १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

BSNL चे ग्राहक असाल तर हा होणार फायदा :
  • भारतातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपासून आययूसी म्हणजेच इंटर कनेक्शन चार्जेसचा मुद्दा फार गाजत आहे. आययूसी बंद तुर्तास तरी बंद होणार नसल्यानं रिलायन्स जिओने मोफत कॉलिंग सेवा बंद करून रिलायन्स जिओवरून अन्य कंपन्यांच्या नंबरवर कॉलसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.

  • जिओने ग्राहकांकडून आता प्रति मिनिट सहा पैसे असा दर आकारण्यास सुरूवात केली आहे. अशातच अन्य कंपन्यांनी आपण आययूसी घेणार नसल्याचं सांगत ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने मोठा निर्णय घेत बीएएनएलवरून अन्य कंपन्यांच्या नंबरवर कॉल केल्यास ग्राहकांनाच पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रत्येक पाच मिनिटांच्या कॉलसाठी बीएसएनएल ग्राहकांना सहा पैसे परत करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कॅशबॅकच्या स्वरूपात ही रक्कम कंपनी आपल्या ग्राहकांना देणार आहे. देशभरातील बीएसएनएल वायरलाईन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच ग्राहकांना या सेवेचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, कंपनीच्या या नव्या निर्णयामुळे कंपनीला नवे ग्राहक मिळण्याची शक्यता मिळण्याची शक्यता आहे.

बापरे… एका रात्रीत तो २४ वर्षीय तरुण ट्रम्प यांच्यापेक्षा झाला अधिक श्रीमंत :
  • अमेरिकेमधील पेनसिल्व्हेनियामधील एक २४ वर्षीय तरुण रातोरात अब्जाधीश झाला आहे. विशेष म्हणजे त्याला मिळालेल्या संपत्तीची किंमत इतकी आहे की त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनाही संपत्तीच्या बाबतीत मागे टाकलं आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संपत्ती या तरुणाच्या आई वडिलांनीच त्याला गिफ्ट केली आहे. या तरुणाचे नाव आहे एरिक त्से.

  • एरिक हा चीनमधील सर्वात मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सीनो बायोफार्मासिटीकल्स या कंपनीच्या संस्थापकांचा मुलगा आहे. सीनोचे संस्थापक त्से पिंग आणि पत्नी चेयुंग लिंग चेंग यांनी कंपनीच्या एकूण समभागांचा (शेअर्स) पाचवा हिस्सा म्हणजेच २१.५ टक्के समभाग एरिकला भेट म्हणून दिले आहेत.

  • कंपनीचे एकूण मुल्य पाहता या समभागांची किंमत ३.८ अब्ज डॉलर म्हणजेच २६९ अब्ज रुपये इतकी होते. संपत्तीची मालकी देण्याबरोबरच सीनोने एरिकला नवीन संचालक म्हणून नियुक्त केलं आहे. एरिकच्या नियुक्तीमुळे कंपनी एका वर्षामध्ये पाच लाख डॉलरपेक्षा अधिक कमाई करेल असा विश्वास त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केला आहे. सीनोचे संस्थापक त्से पिंग म्हणजेच एरिकचे वडील हे चीनमधील वरिष्ट राजकीय सल्लागारांपैकी एक आहेत.

दिनविशेष :
  • भारतीय आगमन दिन

महत्वाच्या घटना 

  • १९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

  • १९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

  • १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

  • १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.

जन्म 

  • १४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)

  • १७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)

  • १८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

  • १८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९६३)

  • १८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९७१)

  • १८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते,  सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

  • १९२१: ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.

  • १९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

  • १९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.

  • १९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.

  • १९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८५६)

  • १९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

  • १९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.

  • १९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

  • २०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

  • २०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.