चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ एप्रिल २०२०

Date : 4 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात २९०२ करोनाग्रस्त रुग्ण; ६८ जणांचा झाला मृत्यू : 
  • देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाग्रस्तांची भारतातील संख्या दोन हजार ९०२ झाली आहे. शनिवारी सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहेत. 

  • देशामध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.

एअर इंडियाची तिकिट विक्री ३० एप्रिल पर्यंत बंद : 
  • सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

  • यापूर्वी सिव्हिल एव्हिएशनकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. विमान कंपन्या १४ एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात. २५ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तो १४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे, असं सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितलं होतं.

‘वृत्तपत्रांचे वितरण रोखणे हा गुन्हा’ :
  • करोनामुळे लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या कालावधीत वृत्तपत्रांच्या वितरणात येत असलेल्या अडथळ्यांबद्दल देशातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वृत्तपत्रांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला असतानाही त्यांच्या वितरणात अडथळा आणणे हा अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार (इस्मा) गुन्हा ठरतो, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. देशात अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीसारखी स्थिती असताना नागरिकांना विश्वासार्ह माहिती, बातम्यांपासून वंचित ठेवले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी वृत्तपत्रांच्या वितरणात येत असलेल्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या  समाजमाध्यमांवरून गावगप्पा आणि अफवा पसरवल्या जात असताना वृत्तपत्रांतून मिळणारी विश्वासार्ह माहिती ही अत्यावश्यक सेवा ठरते. अशा कठिण प्रसंगी पत्रकारांनी जबाबदारीने दिलेली माहिती, बातम्या या जगण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. करोनाच्या संसर्गाशी जग हे एखाद्या युद्धासारखे लढत असताना त्याबाबत मिळणारी विश्वासार्ह माहिती ही एखाद्या अस्त्रासारखी आवश्यक ठरते.

  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सध्या वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध सरकारने घातलेले नाहीत. त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे. कोणीही वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये.

रविवारी दिवे लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन :
  • करोनाच्या महासाथीविरोधात देशावासीयांना पुन्हा एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे केले. रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा. हा प्रकाश म्हणजे करोनामुळे पसरलेल्या अंधकाराविरोधातील लढाई असल्याचे मोदी म्हणाले.

  • करोनाविरोधातील हा नवा सामुदायिक उपक्रम राबवताना लोकांनी घरातून बाहेर पडू नये. आपापल्या घरात-बाल्कनीत दिवे उजळावेत, अशी सूचनाही मोदींनी केली. २२ मार्च रोजी जनता संचारबंदीत पाच मिनिटे थाळी वाजवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकांनी रस्त्यावर उतरून प्रतिसाद दिला होता.

  • रविवारी रात्री नऊ वाजता काही क्षण एकटे बसून भारतमातेचे स्मरण करा, १३० कोटी भारतवासीयांचे चेहरे डोळ्यासोर आणा, सामूहिक महाशक्ती अनुभवा. आताच्या संकट काळात लढण्यासाठी ही ताकद मदत करेल आणि करोनाच्या लढाईत विजयी होण्याचा आत्मविश्वास देईल, असा संदेश मोदींनी जनतेला दिला.

जुलैपासून फुटबॉल लढती सुरू करण्याचे ‘यूएफा’चे लक्ष्य :
  • करोनामुळे सध्या स्थगित करण्यात आलेल्या इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा, चॅम्पियन्स लीगसारख्या सर्वच स्पर्धाच्या लढती जुलैपासून सुरू करण्यासाठी युरोपियन फुटबॉल संघटना (यूएफा) प्रयत्नशील आहे.

  • फुटबॉल लीगचा नवा हंगाम ऑगस्टअखेरीस सुरू होतो. मात्र सध्याच्या हंगामातील उर्वरित लढती खेळवण्याचा ‘यूएफा’चा प्रयत्न आहे. बेल्जियममधील अव्वल लीग स्पर्धेने त्यांचा हंगाम संपल्याचे जाहीर करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. त्याउलट ‘यूएफा’ने मात्र लढती खेळवण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

  • ‘‘सध्याच्या स्थितीत फुटबॉलचा हंगाम संपल्याचे जाहीर करणे योग्य नाही,’’ असे ‘यूएफा’चे अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरिन, युरोपियन क्लब संघटनेचे (ईसीए) अध्यक्ष आंद्रेआ अ‍ॅगनेली आणि आणि युरोपियन लीगचे (ईएल) अध्यक्ष लार्स ख्रिस्तर ऑल्सन यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या हंगामात युरोपातील प्रत्येक लीगमधील १० लढती बाकी आहेत.

  • सध्याच्या हंगामातील लढती जर जुलैपासून सुरू करण्यात यश आले तर त्याचा परिणाम पुढील हंगामातील लढतींच्या वेळापत्रकावर होणार नाही. त्याचवेळेला ‘यूएफा’ फुटबॉलच्या बिघडलेल्या आर्थिक गणिताचाही आढावा घेणार आहे. करोनामुळे ‘यूएफा’कडून जूनपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय लढतीदेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपात चार वर्षांनी होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धादेखील एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आली आहे.

जनजागृतीसाठी पंतप्रधानांची खेळाडूंना पंचसूत्री :
  • करोनाविरोधातील लढय़ासाठी जनजागृती मोहिमेत क्रीडापटूंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्र वारी केले. क्रिकेट कर्णधार विराट कोहली, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदी नामांकित क्रीडापटूंशी पंतप्रधानांनी करोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानानंत जनजागृतीविषयी चर्चा केली.

  • पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यासह देशातील ४०हून अधिक खेळाडूंशी सकाळी ११ वाजता जवळपास एक तास व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली. करोना रोखण्यासाठी सध्या देशात २१ दिवसांची टाळेबंदी लागू आहे.

  • देशात करोनाबाधितांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली असताना पंतप्रधानांनी खेळाडूंना साथसोवळे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या जनजागृती उपक्र मात सहभागी होण्याचे आवाहन के ले.

  • जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणितने समाजमाध्यमांवर दाखल के लेल्या एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान म्हणताना दिसत आहेत की, ‘‘तुमच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ जसा प्रतिस्पध्र्याविरुद्ध मैदानावर त्वेषाने लढतो, तसाच आपण करोनाविरुद्ध लढा देऊ. तुमच्या प्रेरणेने भारत या आव्हानावर मात करील असा मला विश्वास आहे.’’

०४ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.