चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जानेवारी २०२०

Date : 4 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय बुद्धिबळ महासंघाची निवडणूक ९ फेब्रुवारीला : 
  • चेन्नई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) ९ फेब्रुवारीला महासंघाची निवडणूक घोषित केली आहे. अहमदाबाद येथे विशेष कार्यकारिणीची बैठक बोलावून निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती ‘एआयसीएफ’चे सचिव भरत सिंग चौहान यांनी दिली. निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरिजित पसायत यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

  • बुद्धिबळ महासंघाच्या या निवडणुकीत २०२० ते २०२३ या काळासाठी कार्यकारिणी समितीची नव्याने नियुक्ती होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यात एक अध्यक्ष, सहा उपाध्यक्ष, एक मानद सचिव, सहा संयुक्त सचिव आणि एक खजिनदार नियुक्त करण्यात येणार आहेत. बिहार, मेघालय, गुजरात, दिल्ली, चंडीगढ, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, नागालँड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या १३ राज्य बुद्धिबळ संघटनांना या निवडणुकीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

  • विशेष म्हणजे बुद्धिबळ महासंघाच्या डिसेंबर महिन्यात तीन बैठका पार पडल्यानंतर ९ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याच्या निष्कर्षांपर्यंत बुद्धिबळ महासंघ पोहोचला आहे.

अशी आहे हायड्रोजन रिंग : 
  • पृथ्वीपासून २६ कोटी प्रकाशवर्षे दूर हायड्रोजनच्या गूढ वायुमेघाचा जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) साहाय्याने शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या वायुमेघाचा व्यास पृथ्वी असलेल्या आकाशगंगेच्या चौपट असल्याचे आढळून आले आहे. इतक्या प्रचंड आकाराच्या वायुमेघाची निर्मिती कशी झाली याचा आता अभ्यास केला जाणार आहे.

  • राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील पीएच.डी.चा विद्यार्थी ओंकार बाईत याने संशोधक डॉ. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास केला आहे. या विषयीचे संशोधन ‘मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

इराण-अमेरिका युद्ध झाल्यास भारतालाही बसणार जबर फटका : 
  • अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास भारतालाही त्याचा फटका बसू शकतो. इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला.

  • भारतावर काय परिणाम होणार - अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास फक्त ऊर्जा पुरवठयावरच परिणाम होणार नाही तर, आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांनाही त्याचा फटका बसेल. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर तेलाच्या किंमती आधीच चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास पश्चिम आशियामध्ये वास्तव्याला असलेल्या ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. एकटया सौदी अरेबियामध्ये तीस लाख भारतीय राहतात. यापूर्वी या भागात झालेल्या युद्धाचा तिथे राहणाऱ्या भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांवर परिणाम झाला होता.

  • भारताची मुख्य चिंता काय - भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, पश्चिम आशियात राहणारे भारतीय तिथून मोठया प्रमाणावर पैसा पाठवतात. ही रक्कम अब्जावधीच्या घरात आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणींचा सामना करत असताना दुसऱ्या देशाच्या युद्धामुळे बसणारा फटकाही परवडणारा नाही.

‘सीएए’च्या मुद्दय़ावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचे ११ मुख्यमंत्र्यांना पत्र : 
  • थिरुवनंतपुरम : केरळ विधानसभेने वादग्रस्त सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठराव संमत केल्यानंतर मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी त्याबाबत ११ राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता टिकवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ११ जणांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची मूल्ये जपण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

  • नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द करावा, असा ठराव केरळ विधानसभेने मंगळवारी संमत केला. त्याला विरोधी पक्ष काँग्रेस आणि यूडीएफ यांनी समर्थन दिले असून भाजपचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी मात्र विरोध केला.

वर्ल्ड वॉर 3 ट्विटरवर ट्रेंड, काय आहे कारण : 
  • मुंबई : इराकमधील अमेरिकेच्या धडकल्यानंतर शुक्रवारी 'विश्वयुद्ध 3' जगभरात ट्रेंड होऊ लागला आहे. अमेरिकन हवाई हल्ल्यात इराणी विशेष सैन्याच्या प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांच्यासह आठ जण ठार झाले. या हल्ल्याच्या काही तासांतच लोकांनी गुगल आणि इतर सोशल मीडिया साइटवर तिसऱ्या महायुद्धाचा शोध सुरू केला. यादरम्यान, गुगलवर 'वर्ल्ड वॉर 3' साठी शोध अचानक वाढला. तर इराण हा शब्द दहा लाखाहून अधिक वेळा शोधला गेला आहे. दुसरीकडे # इराण, #WoldWar3 आणि # WWIII सारखे ट्रेंडिंग हॅशटॅग्स ट्विटरवर सुरूच आहेत.

  • अमेरिकेनं इराकची राजधानी बगदादमध्ये एअर स्ट्राईक केला. बगदादमध्ये झालेल्या त्या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले. याबाबत पेंटागॉननं एक पत्रक जारी करुन एअरस्ट्राईकचा खुलासा केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंच हा एअर स्ट्राईक झाल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे.

  • मेजर जनरल कासिम सुलेमानी इराणच्या कद्स फोर्सचे प्रमुख होते. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कासिम सुलेमानींसह हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुखही ठार झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट करत अप्रत्यक्ष संदेश दिला.

०४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.