चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ नोव्हेंबर २०१९

Date : 4 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
 ‘हिटमॅन’ने केला धमाकेदार पराक्रम; धोनीला टाकले मागे :
  • भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली असूनही भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ हा सामना खेळत आहेत.

  • पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळत आहे.

  • या सामन्यात रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडला. रोहित शर्मा सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हाच त्याने धोनीला मागे टाकले. रोहित शर्माचा हा ९९ वा टी २० सामना आहे. या आधी भारताकडून पुरुष क्रिकेट संघात धोनीने सर्वाधिक ९८ आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट सामने खेळले होते. तो विक्रम रोहितने मोडला.

  • भारताकडून सर्वाधिक टी २० क्रिकेट सामने हरमनप्रीत कौर (१००) हिने खेळले आहेत. पुढील सामन्यात रोहितला तिच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पुरुष क्रिकेटमध्येदेखील जगात केवळ शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी या दोघांनीच रोहितपेक्षा जास्त टी २० सामने खेळले आहेत.

निर्भया निधीतून सर्व पोलीस ठाण्यांत महिला मदत केंद्रे :
  • निर्भया निधीचा उपयोग देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्रे व सर्व जिल्ह्य़ांमध्ये मानवी तस्करी विरोधी विभागांच्या  स्थापनेसाठी करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

  • १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका मुलीवर बलात्कार करून खून  करण्यात आल्याच्या देश हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर २०१३ मध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली होती. सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा उद्देश हा निधी स्थापन करण्यात होता.

  • इराणी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘मानवी तस्करी विरोधी विभाग हे सर्व जिल्ह्य़ात स्थापन केले जातील तसेच सर्व पोलीस ठाण्याच महिलांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यासाठी संचित निधीचा वापर केला जाणार आहे. महिलांची सुरक्षा वाढवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा हेतू त्यात आहे.

भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ, बँकॉकमध्ये मोदींचं उद्योजकांना आवाहन :
  • उद्योजकांना आवाहन करताना, भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. मोदी आपल्या दौर्‍यादरम्यान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) शिखर परिषदेत सहभागी होतील.

  • गुंतवणुकदारांना प्रोत्साहन देताना मोदी म्हणाले, “भारतात गुंतवणुकीची हीच सर्वोत्तम वेळ आहे. गुंतवणुकीसाठी भारत सध्या जगात सर्वांधिक आकर्षक अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. भारतात व्यापार करणं आधीपेक्षा सोपं आणि सुलभ झालं आहे. भारत सध्या स्थित्यंतराच्या काळातून जातोय. देशाने पारंपरिक नोकरशाही शैलीत काम करणे थांबवले आहे.

  • व्यवसायाच्या बाबतीत आता भारताकडे अनेक संधी आणि सुविधा आहेत. भाजपा सरकारने 2011मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा भारतीची जीडीपी 2 ट्रिलियन डॉलर्स होती. मात्र आता भारताचे 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यत पोहचण्याचे लक्ष्य असल्याचे त्याचप्रमाणे करक्षेत्रात आम्ही महत्वाचे काम केले असून भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे”, असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी गुंतवणूकदारांना केले.

लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० नोव्हेंबरपर्यंत करा ‘हे’ काम :
  • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पेन्शनधारकांना ज्यांचे निवृत्ती वेतन एसबीआयच्या खात्यात जमा होते अशांना 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट(जिवंत असल्याचं प्रमाणपत्र) जमा करण्यास बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

  • एसबीआयच्या कोणत्याही शाखेत हे लाइफ सर्टिफिकेट किंवा जिवंत असल्याचं प्रमाणपत्र जमा केले जाऊ शकते. तसेच, जवळच्या आधार सेंटर आणि कॉमन सर्विस सेंटरवर हे जमा करता येईल.

  • दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेंशनरला आपल्या बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करुन आपण जिवंत असल्याचे प्रमाण द्यावे लागते. जर हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर पेन्शनधारक आपल्या बँक खात्यातून पेन्शन काढू शकणार नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं एसबीआयकडून ट्विटरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरीप्रकरणी संसदीय समित्यांमार्फत चौकशी :
  • व्हॉट्सअ‍ॅपमार्फत हेरगिरीच्या प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांच्या अध्यक्षतेखालील दोन संसदीय समित्यांनी घेतला असून, गृह सचिवांसह इतर उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांकडून ते याबाबतचे तपशील मागवणार आहेत.

  • ‘पेगॅसस’ या इस्रायली स्पायवेअरचा वापर करून काही अज्ञात लोकांनी जगभरात जी हेरगिरी केली, त्यात भारतातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचाही समावेश असल्याचे फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने गुरुवारी सांगितले होते.

  • व्हॉट्सअ‍ॅपमार्फत हेरगिरीचे हे संपूर्ण प्रकरण चिंताजनक असल्याचे गृह विभागाबाबतच्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सांगितले. १५ नोव्हेंबरला होणाऱ्या समितीच्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

  • पुढील बैठकीत गृह सचिव या समितीला जम्मू व काश्मीरमधील परिस्थितीबाबत माहिती देणार आहेत. त्या बैठकीत हाही मुद्दा चर्चिला जाईल आणि आम्ही सचिवांकडून याबाबतचे तपशील मागू, असे शर्मा म्हणाले.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा भविष्यासाठी आधार- सरन्यायाधीश :
  • आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हा भविष्यासाठी आधार राहणार आहे. यापूर्वी राज्यातील अवैध स्थलांतरितांबाबत केवळ अंदाजच व्यक्त केला जात होता आणि त्यामुळे हिंसाचाराची साखळी तयार होत असल्यामुळे ही प्रक्रिया करण्याची तातडीची आवश्यकता होती, असे सांगून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी रविवारी एनआरसीचे जोरदार समर्थन केले.

  • आसाममधील एनआरसीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे न्या. गोगोई हे अध्यक्ष आहेत. आपल्या घरी बसून या प्रक्रियेवर शेरेबाजी करणाऱ्यांवर त्यांनी ताशेरे ओढले. हे लोक केवळ वस्तुस्थितीपासून दूर आहेत इतकेच नव्हे, तर ते वस्तुस्थितीचे विपर्यस्त चित्र उभे करतात. यामुळेच राज्य आणि त्याचा विकासाचा अजेंडा यांवर विपरित परिणाम झाला असल्याचे ते म्हणाले.

  • एनआरसी ही नवी किंवा अभिनव कल्पना नाही. १९५१ सालीच ती पहिल्यांदा मांडण्यात आली होती आणि सध्याची प्रक्रिया म्हणजे १९५१ च्या एनआरसीचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे मूळ आसामचे असलेले सरन्यायाधीश म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

  • १९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

  • १९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

  • १९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

  • १९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

  • २०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

  • २००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

  • २००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्म 

  • १६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)

  • १८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

  • १८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

  • १९२९: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)

  • १९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)

  • १९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. (जन्म: १२ जून १८९४)

  • १९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)

  • १९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९२२)

  • १९९९: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९५८)

  • २००५: इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.