चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ ऑक्टोबर २०१९

Date : 4 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक बुद्धिबळ क्रमवारी : कोनेरू हम्पीची तिसऱ्या स्थानी झेप :
  • नवी दिल्ली : भारताची महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने ‘फिडे’ या बुद्धिबळाच्या जागतिक संघटनेकडून जाहीर झालेल्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • आंध्र प्रदेशच्या ३२ वर्षीय हम्पीने तब्बल अडीच वर्षांनंतर दमदार पुनरागमन करत अलीकडेच रशिया येथे झालेल्या फिडे महिला ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या हम्पीने या स्पर्धेतून १७ एलो रेटिंग गुणांची कमाई केली. त्याचबरोबर २५७७ गुणांसह तिने तिसरे स्थान प्राप्त केले. आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी हम्पीने तब्बल दोन वर्षे विश्रांती घेतली होती. चीनची योऊ यिफान (२६५९ रेटिंग गुण) आणि जू वेनजून (२५८६) यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे.

  • खुल्या गटात, पाच वेळा जगज्जेता ठरलेला विश्वनाथन आनंद २७६५ गुणांसह नवव्या स्थानी आहे. नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसनने २८७६ गुणांसह अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.

स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ :
  • भारतातील स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी भारताचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे हे यश असून त्याची दाखल आता जागतीक स्तरावरही घेण्यात आली आहे.

  • निती आयोगाने तयार केलेल्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकातून (एसईक्यूआय) ही बाब समोर आली आहे. या माहितीच्या आधारे संयुक्त राष्ट्रांच्या भारतातील कार्यालयाकडून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये म्हटले की, मासिक पाळी सुरु असलेल्या महिला आणि विद्यार्थीना आपल्या शाळांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने या काळात घरीच रहावे लागत होते. मात्र, भारताच्या स्वच्छता क्रांतीमुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. स्वच्छ भारत उपक्रमामुळे स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत आता ९८ टक्के वाढ झाली आहे.

  • एसईक्यूआयनुसार, देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९५ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत. २०१६-१७ च्या अहवालानुसार आसाम आणि मेघालयमध्ये अनुक्रमे ८३.४० आणि ८४.१० टक्के सर्वात कमी प्रमाणावर मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध होती. दरम्यान, बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मागील वर्षाच्या तुलनेत समान माहिती नोंदविली तर सिक्कीम आणि नागालँडमध्ये घट नोंदली गेली.

भारत-पाक अणुयुद्ध झाल्यास १२ कोटी लोकांचे बळी :
  • वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झाले, तर एका आठवडय़ाहून कमी कालावधीत ५ कोटी ते १२ कोटी लोक मृत्युमुखी पडतील. ही बळीसंख्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या सहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या मृत्यूंपेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे जगभरात वातावरणविषयक अरिष्ट ओढवेल, असे अमेरिकेतील संशोधकांनी सांगितले आहे.

  • भविष्यात उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या काल्पनिक संघर्षांचे काय परिणाम होतील आणि ते जगभर कसे पसरतील, याचा कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठ आणि रुटगेर्स विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला.

  • भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर या अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधील तणाव वाढलेला असतानाच; सध्याच्या घडीला भारत व पाकिस्तान या दोघांकडेही प्रत्येकी सुमारे १५० अण्वस्त्रे असून, २०१५ सालापर्यंत हा आकडा दोनशेहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे या संशोधकांनी म्हटले आहे.

  • भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे, जगातील मृत्युदर दुपटीने वाढू शकेल, असे कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील प्राध्यापक ब्रायन टून यांनी सांगितले. मानवी इतिहासात ज्याचे उदाहरण नाही, असे हे युद्ध ठरू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ब्रिटनचे युवराज विल्यम, पत्नी केट मिडलटनसह जाणार पाकिस्तान दौऱ्यावर :
  • ब्रिटनचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या शाही दौऱ्यामध्ये पाकिस्तानमधील अनेक वेगवेगळे पदार्थ चाखून पाहण्याची इच्छा या दोघांनी व्यक्त केली आहे. काही दिवसापूर्वीच विल्यम आणि केट यांनी लंडनमधील आगा खान सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संस्कृतीबद्दल माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानी संगितकार, आचारी, कलाकारांशीही चर्चा केली.

  • आगा खान सेंटरला दिलेल्या या भेटीदरम्यान विल्यम आणि केट या दोघांनीही आपल्या आगामी पाकिस्तानी दौऱ्यामध्ये तेथील अनेक पदार्थांची चव घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी केट यांनी ‘मी अनेकदा घरीच करी (आमटी) बनवते. छोटे युवराज जॉर्ज, युवराज लुईस आणि युवराज्ञी शार्लोटसाठी मी कमी तिखट तर माझ्यासाठी आणि विल्यमसाठी तिखट करी बनवते. सर्वांसाठी वेगवेगळ्याप्रकराची करी बनवणे कठीण आहे. मुलांना कमी तिखट, विल्यमला थोडी फार तिखट तर मला खूप तिखट करी बनवणे खूपच त्रासदायक आहे,’ अशी माहिती दिली होती.

  • दोन्ही युवराज हे खाण्याच्या बाबतीत वडील विल्यम यांच्यावर गेले असून युवराज्ञी शार्लोट ही आईसारखी असल्याचे यावेळी ब्रिटनच्या राजघराण्यातील दांपत्याने सांगितले. युवराज्ञी शार्लोटला आईप्रमाणे तिखट खायला आवडते तर दोन्ही मुले वडिलांप्रमाणे कमी तिखट खाणे पसंत करतात असं विल्यम यांनी स्पष्ट केलं.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय एकता दिन / जागतिक प्राणी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

  • १९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

  • १९४०: ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

  • १९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

  • १९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

  • १९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

  • १९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

  • २००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

जन्म 

  • १८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

  • १८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)

  • १९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)

  • १९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)

  • १९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

  • १९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.

  • १९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)

  • १९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६६९: डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन. (जन्म: (जन्म: १५ जुलै १६०६)

  • १८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

  • १९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

  • १९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

  • १९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

  • १९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)

  • १९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)

  • १९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)

  • २००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.

  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.