चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ ऑक्टोबर २०१९

Date : 5 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचा चित्रेश नटेशन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ :
  • बटामी (इंडोनेशिया) : बटामी, इंडोनेशिया येथे नुकत्याच झालेल्या ‘आशिया-श्री’ अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताच्या चित्रेश नटेशनने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताबावर मोहोर उमटवली. तर महाराष्ट्राच्या रोहित शेट्टीने ‘आशिया-श्री’ हा बहुमान मिळवला.

  • २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत भारताने आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि आठ कांस्यपदके मिळवून एकूण २२ पदकांसह पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले. केरळच्या चित्रेशने ९० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच सर्व गटातील सुवर्णपदक विजेत्यांच्या स्पर्धेतही विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या रोहितने १०० किलो गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

  • याव्यतिरिक्त, कुंदन गोपे (५५ किलो), हरीबाबू कृष्णमूर्ती (७० किलो), विजयप्रकाश (७५ किलो), सरबो सिंग (८० किलो), रवीकुमार राव (७५ किलो – कनिष्ठ गट) आणि श्याम सिंग शेरा (दिव्यांग गट) यांनीही भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.

IMF पेक्षा पाकिस्तानवर चीनचं अधिक कर्ज :
  • कायमच पाकिस्तान चीनला आपला मित्र म्हणत आला आहे. परंतु पाकिस्तान चीनच्याच कर्जात बुडाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आएएमएफने दिलेल्या कर्जापेक्षाही चीनकडून पाकिस्तानने दुप्पट कर्ज घेतलं आहे. सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक संकट उभं असून त्यांच्यावर असलेला चीनचा कर्जाचा बोजाही दिवसागणिक वाढत चालला आहे. तसंच त्यांच्यावरील परकीय चलनाचंही संकट वाढलं आहे.

  • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आयएमएफने 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहे. सध्या पाकिस्तावर असलेल्या इतर कर्जापोटी त्यांना 2.8 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आपला मित्र चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे. त्यामुळे पाकिस्तावरील संकटात वाढ झाली आहे. तर आयएमएफने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला 2022 पर्यंत चीनकडून घेतलेल्या 6.7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.

  • बेल्ट अँड रोड प्रकल्पाची सुरूवात केल्यानंतर पाकिस्तावरील कर्जात वाढ झाल्याची माहिती कराचीतील ऑप्टिमस कॅपिटल मॅनेजमेंटच्या हाफिज फैयाज अहमद यांनी सांगितलं. पाकिस्तानने घेतलेल्या कर्जात वाढ होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान कर्ज घेत आहे. त्यामुळेच तो कर्जाच्या कचाट्यात सापडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

PMC बँक घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केला माहिती अहवाल :
  • पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरवर आधारित आपला माहिती अहवाल दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांनी याप्रकरणी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (एचडीआयएल) दोन संचालकांना अटक केली होती. त्याचबरोबर कंपनीची ३५०० कोटींची संपत्तीही जप्त केली आहे.

  • आर्थिक गुन्हे शाखेने ४३५५.४३ कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्यामध्ये सोमवारी एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी १७ लोकांविरोधात लुकआऊट नोटीसही प्रसिद्ध केली आहे. आरोपी राकेश वधावन आणि सारंग राकेश वधावन या पितापुत्रांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नसल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या घोटाळ्यासंबंधी सर्वजणांची चौकशी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

  • दरम्यान, पीएमसी बँकेच्या ग्राहकांना ३ ऑक्टोबर रोजी आरबीआयने दिलासा दिला. बँकेच्या ग्राहकांना रक्कम काढण्याची मुदत १०,००० रुपयांवरुन वाढवून ती २५,००० रुपये केली. सुरुवातीला आरबीआयने खातेधारकांना सहा महिन्यांत केवळ १,००० रुपयेच काढण्याला परवानगी दिली होती.

संत रविदास मंदिरासाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव द्यावा :
  • नवी दिल्ली : गुरू रविदास मंदिरासाठी सामंजस्याने पर्यायी जागा शोधून त्याबाबतचा प्रस्ताव  सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने यातील संबंधित पक्षकारांना सांगितले. दिल्लीच्या तुघलकाबाद जंगलात हे मंदिर उभारू देण्याची मागणी संबंधितांनी केली होती.  आता या प्रकरणाची सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • दिल्ली विकास प्राधिकरणाने न्यायालयाच्या आदेशानंतर संत रविदास मंदिर पाडून टाकले होते. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वाच्या धार्मिक भावनांचा आम्हाला आदर आहे पण त्याचबरोबर कायद्याचे पालन करणेही महत्त्वाचे आ हे.

  • न्या. अरूण मिश्रा, न्या. एस.रवींद्र भट यांनी सांगितले की, यातील सर्व पक्षकारांनी सामंजस्याने मंदिरासाठी  पर्यायी जागा शोधावी. त्यानंतरच आम्ही आदेश जारी करू शकू.

  • न्यायालयाच्याच आदेशानुसार पाडण्यात आलेले मंदिर परत उभारण्यासाठी कलम ३२ अन्वये दाखल करण्यात आलेली याचिका आम्ही विचारात घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. संसदेचे माजी सदस्य असलेल्या अशोक तनवर व प्रदीप जैन यांनी याचिका दाखल केली होती. त्यात धार्मिक  श्रद्धा जपण्याच्या अधिकारानुसार मंदिर पुन्हा बांधण्याची मागणी केली आहे. तुघलकाबाद येथील समाधी मंदिर पाडण्यात आल्याने धार्मिक श्रद्धा अनुसरण्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल खटल्यात अनेक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

'या' ठिकाणी चांद्रयान २ उतरलं, नासाकडून फोटो जारी :
  • वॉशिंग्टन डी.सी. : अमेरीकन अंतराळ संस्था नासाच्या 'लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर कँमरा'द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने भारताचं चांद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरलं होतं. त्या ठिकाणचे काही हाय रेजॉल्यूशनचे फोटोदेखील काढले आहेत. हे फोटो नासाने आज सकाळी जारी केले आहेत.

  • नासाने या फोटोंसोबत चांद्रयान 2 च्या लॅण्डिंगविषयीची माहितीदेखील दिली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार भारताचं चांद्रयान हे विक्रम लॅण्डरद्वारे सॉफ्ट लॅण्डिंग करणार होतं. परंतु चांद्रयानाने हार्ड लॅण्डिंग केलं आहे.

  • नासाचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (एलआरओ) हे अंतराळयान 17 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळून गेले. तेव्हा एलआरओने दक्षिण ध्रुवारील चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने चांद्रयानाच्या लॅण्डिंगच्या ठिकाणाचेदेखील फोटो काढले. परंतु एलआरओ यान चांद्रयान किंवा विक्रम लॅण्डरचे सध्याचे स्थान शोधू शकलं नाही.

मॉब लिन्चिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या ५० सेलिब्रिटींविरोधात एफआयआर :
  • नवी दिल्ली: मॉब लिन्चिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रामचंद्र गुहा, मणीरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तीमत्त्वांचा समावेश आहे. या व्यक्तींनी मॉब लिन्चिंगबद्दल चिंता व्यक्त करत मोदींना खुलं पत्र लिहिलं होतं. 

  • मॉब लिन्चिंग प्रकरणात सेलिब्रिटींनी मोदींना खुलं पत्र लिहिल्यानंतर बिहारच्या मुझफ्फरपूरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी निकाल देत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २० ऑगस्टला या प्रकरणी आदेश दिल्याचं ओझा यांनी सांगितलं. ओझा यांनी त्यांच्या याचिकेत पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ५० व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला होता. 

  • सेलिब्रिटींनी लिहिलेल्या पत्रातून देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आणि पंतप्रधान मोदींच्या कामाला कमी लेखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये देशद्रोह, सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या कलमांचा समावेश आहे. 

दिनविशेष :
  • जागतिक शिक्षक दिन / आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६४: एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० लोक ठार आणि शहर उद्धस्त झाले.

  • १९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

  • १९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

  • १९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.

  • १९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

  • १९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.

  • १९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८९०: तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.

  • १९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १९९८)

  • १९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)

  • १९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)

  • १९३२: भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.

  • १९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)

  • १९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.

  • १९६४: भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.

  • १९७५: ब्रिटीश अभिनेत्री केट विन्स्लेट यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७)

  • १९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

  • १९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

  • १९८३: टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०७)

  • १९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

  • १९९१: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०४)

  • १९९२: नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.

  • १९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

  • २०११: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.