चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ एप्रिल २०२०

Date : 6 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८ :
  • राज्यात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून  करोनाग्रस्तांच्या संखेत वेगानं वाढ होत आहे. राज्यात आज दिवसभरात नवीन ११३ रूग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८ झाली आहे. आतापर्यंत ५६ जण करोनाच्या कचाट्यातून वाचले असून त्यांना डिसचार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागनं दिली आहे.

  • मुंबईमध्ये आज दिवसभरात १०३ रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोना रूग्णांची संख्या ४३३ झाली आहे. राज्यात सर्वाधिक करोना रूग्ण मुंबईत आहेत. पुण्यात तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.   करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या करोनाबाधित ६० वर्षीय महिलेचा आणि ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ६९ वर्षीय करोनाबाधित वृद्ध महिलेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही करोनानं हातपाय पसरण्यास सुरु केलं आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • तर, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

माजी राष्ट्रपती-पंतप्रधान, विरोधकांशी मोदींची चर्चा :
  • देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन माजी राष्ट्रपती, दोन माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. देशातील करोनासंदर्भातील परिस्थितीची माहिती मोदींनी त्यांना दिली. पंतप्रधानांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे.

  • मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, प्रतिभा पाटील तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व मुलायमसिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टालिन, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याशीही मोदींनी दूरध्वनीवरून चर्चा केली.

रेल्वेने तयार केलं स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’, दररोज 100 व्हेंटिलेटर बनवण्याची तयारी :
  • भारतीय रेल्वेने देशात करोना व्हायरसविरोधात लढ्यासाठी स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’ तयार केले आहे. हे व्हेंटिलेटर पंजाबच्या कपुरथला येथील ‘रेल्वे कोच फॅक्टरी’मध्ये(आरसीएफ) बनवण्यात आले आहेत. ‘जीवन’ व्हेंटिलेटरची किंमत कंप्रेसरशिवाय जवळपास दहा हजार रुपये असेल. सध्या देशात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत पाच ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे. मात्र, अद्याप रेल्वेने बनवलेल्या ‘जीवन’ व्हेंटिलेटरसाठी ‘आयसीएमआर’ची मंजुरी मिळालेली नाही.

  • “एकदा आयसीएमआरची मंजुरी मिळाल्यानंतर, दररोज 100 व्हेंटिलेटर बनवण्याची आमची तयारी आहे”, अशी माहिती रेल्वे कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक रविंद्र गुप्ता यांनी दिली. “आरसीएफच्या टीमने हे व्हेंटिलेटर तयार केले असून आवश्यकतेनुसार याचा आकार बदलता येऊ शकतो. या व्हेंटिलेटरमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. आवाज न करता हे व्हेंटिलेटर काम करतं. आम्ही आज अखेरची चाचणी घेतली आणि आता आमच्याकडे सक्षम व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहे. याची किंमत बाजारातील व्हेंटिलेटरपेक्षा बरीच कमी असेल. जीवन व्हेंटिलेटरची किंमत कंप्रेसरशिवाय जवळपास दहा हजार रुपये असेल. यामध्ये काही इंडिकेटर लावले तरीही याची किंमत ३० हजाराच्या पुढे जाणार नाही”, असे गुप्ता म्हणाले.

  • ब्रूकिंग्सच्या एका रिपोर्टनुसार, देशात व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. सध्या देशातील व्हेंटिलेटर्सची संख्या जवळपास 57 हजार आहे, पण जर करोना व्हायरसमुळे परिस्थिती अजून बिघडली तर देशात 15 मेपर्यंत 1.10 लाख ते 2.20 लाख व्हेंटिलेटर्सची गरज लागू शकते. सध्या देशात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत पाच ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे.

०६ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.