चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ डिसेंबर २०१९

Date : 6 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘महापरीक्षा पोर्टल’ विरोधात तरुणाई आक्रमक :
  • महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध सरकारी पदांची भरती करण्यात येते. मात्र, या पोर्टलद्वारे राबवण्यात येणारी प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप परीक्षार्थीकडून होत आहे. याच पाश्र्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ‘पोर्टल बंद करा’, या मागणीसाठी राबविलेल्या चळवळीला बळ मिळाले आहे.

  • सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया ऑनलाईन व्हावी, म्हणून महापरीक्षा पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, भरती अंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांतील त्रुटी यामुळे परीक्षार्थीनी पोर्टलवर हरकती घेतल्या. त्याचबरोबर या उमेदवारांनी समाज माध्यमांवर पोर्टल बंद करा ही चळवळ उभी केली. अमरावतीतही विद्यार्थ्यांनी या पोर्टलविरोधात भव्य मोर्चा काढला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पूर्वीप्रमाणेच नोकरभरती घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

  • महापरीक्षा पोर्टलद्वारे सदोष परीक्षा घेण्यात येते हेअनेकदा उघडकीस आले आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार तसेच असुविधांमुळे अशा प्रकारचे पोर्टल बंद करून पारदर्शक परीक्षा पद्धती राबवावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

‘एटीएम’चे नियम बदलणार, RBI कडून घोषणा : 
  • रिझर्व्ह बँकेने आजच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला. बँकेने भलेही रेपो रेटमध्ये कपात केलेली नसली तरी सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत काही मोठे निर्णय घेतलेत. आरबीआयने एटीएमबाबत काही मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचे व एक विशेष कार्ड लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केलं.

  • शॉपिंगसाठी नवं कार्ड - सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे ATM बद्दलचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे.

  • एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अॅप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.

‘ग्रामविकास’च्या मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देऊ नयेत : 
  • ग्रामविकास विभागांतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मंजूर कामांचे कार्यारंभ आदेश तत्काळ ऑनलाईन करावेत आणि ५ डिसेंबरनंतर कोणत्याही मंजूर कामाला कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश ग्रामविकास विभागाने बजावले.

  • निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांसाठी मंजूर करण्यात आलेली कामे नव्या सरकारकडून रद्द करण्याचेच हे आदेश असल्याने गुरुवारी दिवसभर भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत ठाण मांडून कार्यारंभ आदेश मिळवून ऑनलाईन करण्यासाठी गर्दी केली होती. या आदेशामुळे अनेकांनी मंजूर करुन घेतलेली कामे रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  • बीड जिल्ह्यत तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या गाव अंतर्गत मूलभूत सुविधा, पर्यटन, यात्रा स्थळ आणि तीर्थ क्षेत्रांच्या विकासाकरिता दोन ते पंचवीस कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना मोठय़ा प्रमाणावर निधी दिला. पाच वर्षांत जिल्ह्यमध्ये एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी या कामांसाठी देण्यात आल्याचे सांगितले जाते.

  • भाजपने सत्तेवर येताच दहा लाख रुपयांपर्यंतच्या जाहीर निविदेची मर्यादा तीन लाखावर आणल्यानंतर गाव पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी ग्रामविकास विभागाची २५-१५ ही एकच योजना आशेचा किरण होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला.

“बलात्काऱ्यांना मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यायला हवी”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी :
  • हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. याच प्रकरणावरुन सोशल मिडियावर अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे.

  • एकीकडे हैदराबाद प्रकरणाची चर्चा असतानाच दुसरीकडे उन्नाव येथे बलात्कारपीडित तरुणी न्यायालयात जात असताना पाच जणांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ९० टक्के भाजलेली तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. यावरुनच भाजपाचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बलात्काऱ्यांना मृत्यूदंडच दिला पाहिजे अशी मागणी करणारे ट्विट केले आहे.

  • शिवराज यांनी केलेल्या ट्विटमध्ये बलात्काऱ्यांना सभ्य समाजात राहण्याचा हक्क नाही असं म्हटलं आहे. “उन्नावमध्ये झालेल्या घटनेने हृद्य पिळवटून निघाले आहे. या घटनेला जबाबदार असणारे नीच लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सभ्य समाजात राहण्याचा हक्क नाहीय,” असं ट्विट शिवराज यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी #DeathForRapists म्हणजेच बलात्काऱ्यांना मृत्यूदंड द्या अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

  • १९१७: फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.

  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म 

  • १४२१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १४७१)

  • १७३२: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)

  • १८२३: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९००)

  • १८५३: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)

  • १८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९१९)

  • १९१६: गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)

  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)

  • १९२३: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २००२)

  • १९३२: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००७)

  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.

  • १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.

  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)

  • १९५६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)

  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)

  • १९७६: पत्री सरकार चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९००)

  • १९९०: मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक़ू अब्दुल रहमान यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.