चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ जानेवारी २०२०

Date : 6 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद :
  • चिमुकल्या मुलींचे इवल्याशा डोळ्यांनी कुतूहलपणे पाळण्यातील रंगीबेरंगी फुग्यांकडे पाहणे, ते धरण्यासाठी हात उंचावणे.. जवळच फेटा बांधून उभ्या असलेल्या आई, आत्यांकडे एक नजर फिरवणे, यासह सोबतीला कानावर पडणाऱ्या बारशाच्या गितांचा मंजूळ आवाज व नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई अशा उत्साही वातावरणात एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात रविवारी रंगला.

  • स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.

  • बीड येथे स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ३१ डिसेंबरपासून सोळावा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कीर्तनाला विविध उपक्रमांची जोड दिल्याने महोत्सव सामाजिक परिवर्तनाचे केंद्र झाला आहे.

  • रविवारी महोत्सवाच्या विस्तीर्ण सभामंडपात तिरंगी रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या पाळण्यातील ८३६ चिमुकल्या मुलींचा सामूहिकरीत्या नामकरण सोहळा करण्यात आला. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह प्रतिष्ठानचे गौतम खटोड आणि सुशील खटोड, भरतबुवा रामदासी आदी उपस्थित होते. साडेआठशे मुलींच्या नामकरण सोहळ्याला आल्याने माझे महत्त्व वाढले असल्याने अशा कार्यक्रमाला मुलींची मावशी म्हणून यायला मला आवडेल.

‘नानकाना साहिब’वरील हल्ल्याचा देशभरात निषेध : 
  • शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानच्या नानकाना साहिब शहरातील गुरुद्वारावर जमावाने शुक्रवारी केलेला हल्ला आणि तेथील भाविकांवर केलेली दगडफेक यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी जम्मू-काश्मीर व नवी दिल्लीत विविध संघटनांनी निदर्शने केली.

  • जम्मूत विविध शीख संघटना आणि शिवसेना डोग्रा फ्रंट यांनी शहराच्या निरनिराळ्या भागांत, तसेच पूंछ शहरात निदर्शने केली. पाकिस्तानविरोधी घोषणा देत त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमा जाळल्या. मात्र ही निदर्शने शांततेत झाली.

  • पाकिस्तानातील काही घटक शिखांसह इतर अल्पसंख्याकांना त्रास देऊ इच्छितात. या घटनेचा तात्काळ तपास झाल्यास दोषींवर कारवाई केली जाऊ शकते, असे सर्वपक्षीय शीख समन्वय समितीचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना यांनी एका निवेदनात सांगितले. कर्तारपूर मार्गिका खुली केल्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात काहीशी मित्रभावना निर्माण झालेली असतानाच गुरुद्वारावर झालेला हल्ला संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.

भारतातील दहशतवादी कारवायांत सुलेमानीचा सहभाग :
  • इराणचा सैन्याधिकारी जनरल कासीम सुलेमानी याला निष्पाप लोकांचे जीव घेण्यात आसुरी आनंद मिळत होता; तसेच नवी दिल्ली आणि लंडन इतक्या लांबवरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या योजनांमध्येही त्याचा सहभाग होता, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

  • रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या या शक्तिशाली कमांडरला इराकमध्ये ठार मारण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले.

  • नवी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात सुलेमानी सहभागी होता असे सांगून, ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणच्या भौगोलिक व राजकीय भांडणात भारतालाही ओढण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. मध्यपूर्व भागाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी कृत्ये करण्याचे काम सुलेमानी करत होता, असे त्याला ठार केल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत ट्रम्प म्हणाले.

  • अमेरिकी नागरिकांना ठार करणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांसह इराकमधील अमेरिकी लक्ष्यांवर अलीकडेच झालेले हल्ले,  बगदादमधील  दूतावासावरील  हल्ला हे सर्व सुलेमानीच्या निर्देशावरून झाले, असे ट्रम्प यांनी फ्लोरिडातील रिसॉर्टमध्ये पत्रकारांना सांगितले.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा - सोलापूरचा ‘सुवर्णचौकार’ : 
  • ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत रविवारी सोलापूरच्या मल्लांनी ‘सुवर्णचौकार’ लगावला. कालिचरण सोलनकर (७० किलो-गादी), वेताळ शेळके (८६ किलो-गादी), शुभम चव्हाण (९२ किलो-माती) आणि प्रशांत जगतापने (८६ किलो-माती) या सोलापूरच्या कुस्तीपटूंनी जेतेपद मिळवले.

  • श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्य़ाच्या कालिचरणने पुणे जिल्ह्य़ाच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर १५-३ असा सहज विजय मिळवत कांस्यपदक जिंकले. याच गटाच्या कांस्यपदकाच्या दुसऱ्या लढतीत पिंपरी-चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर १०-० अशा तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळवला.

  • ८६ किलो गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूर जिल्ह्य़ाच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाणवर ८-० असा विजय मिळवला. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांनी कांस्यपदक पटकावले.

०६ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.