चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ ऑक्टोबर २०१९

Date : 6 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अभिमानास्पद! विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान :
  • विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे. अभिनंदन वर्थमान यांच्या धाडसाचं कौतुक सगळ्या देशानं केलं होतं. आता वायुदलाकडून त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

  • एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा विशेष सन्मान करणार आहेत. पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बरोबर तेरा दिवसांनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईक दरम्यान महत्त्वाची कामगिरी बजावली ती अभिनंदन वर्थमान यांनी. त्यांनी पाकिस्तानचे हवाई हल्ला करणारे विमान खाली पाडले. ही कामगिरी बजावत असताना अभिनंदन यांचे विमानही अपघातग्रस्त झाले.

  • विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना कैद केले.  अभिनंदन वर्थमान दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यामुळे एक मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. २७ फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. आता त्यांच्या स्क्वार्डनचा वायुदलातर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे.

ढाक्यामध्ये विवेकानंद भवन उभारणार :
  • ढाक्यामध्ये विवेकानंद भवन उभारलं जाणार असा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झाला आहे. ढाका येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद भवनाचा प्रकल्प उभारला जाणार. या दोन महान व्यक्तींचं आयुष्य आपल्याला कायम प्रेरणा देतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपला समाज आणि मूल्यांवर स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच विवेकानंद भवन ढाका येथे उभारण्यात येणार आहे. या भवनामध्ये 100 हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी संशोधन स्कॉलर्सना राहण्याची संधी उपलब्ध होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • एवढंच नाही तर या दोघांच्या भेटीमध्ये एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशहून एलपीजी आयात करण्याला मंजुरी दिली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पार पडलेल्या या करारानंतर या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

  • मागील वर्षभरात भारत आणि बांगला देश यांच्या 12 संयुक्त प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. दोन्ही देशांमधली एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे ही बाबही समाधानकारक आहे असंही मोदी म्हणाले. भारत आणि आणि बांगलादेश यांच्यातील तीन द्विपक्षीय योजनांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली याचा मनस्वी आनंद होतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारत-बांगलादेश सुवर्ण अध्यायाचे सुतोवाच :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची शनिवारी भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले.

  • भारतामधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कार्यक्रमाविरुद्ध भूमिका घेऊन दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बाधा निर्माण होईल असे कोणतेही पाऊल उचलण्यात येणार नाही असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

  • मोदी आणि हसिना यांना मोठा राजकीय जनादेश मिळाला असूबन दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशामध्ये नवे पर्व सुरू केले आहे. बांगलादेशच्या संसदेत हसिना यांना मोठे बहुमत आहे तर  भारतामध्ये विरोधी पक्ष दुबळा आहे. एनआरसीवरून चिंता करण्याचे कारण नाही, असे आश्वासन मोदी यांनी हसिना यांना न्यू यॉर्कमध्ये झालेल्या भेटीच्या वेळी दिले. एनआरसी ही न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेली प्रक्रिया आहे आणि ती कशी पूर्ण होईल ते पाहावे लागेल, असे मोदी यांनी हसिना यांना सांगितल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

आर अश्विनची 'वेगवान' कामगिरी, मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी :
  • विशाखापट्टण : टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून अश्विनने जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेत आपल्या विकेट्सची संख्या 349 वर पोहोचवली होती.

  • आज दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत अश्विनने भारताकडून वेगवान 350 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 66 व्या सामन्यात त्याने 350 विकेट घेतल्या आहेत. यासह त्यानं श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रमाची बरोबरी केली. भारताकडून अनिल कुंबळेने 77 सामन्यात 350 विकेट तर हरभजन सिंहने 83 सामन्यात 350 विकेट्स घेतल्या होत्या.

  • श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 66 व्या कसोटीत 350 वा गडी बाद केला होता. कसोटीमध्ये 800 गडी बाद करणारा मुरलीधरन जगातील एकमेव गोलंदाज आहे.  कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने आतापर्यंत 27 वेळा केली आहे. याशिवाय सात वेळा 10 गडी बाद करण्याची कमालही त्यानं केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०८: ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.

  • १९२७: वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

  • १९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

  • १९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

  • १९७३: इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.

  • १९८१: इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.

  • १९८७: फिजी प्रजासताक बनले.

  • २००७: जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

जन्म 

  • १७७९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १८५९)

  • १८६६: रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९३२)

  • १८९३: खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९५६)

  • १९१२: अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०००)

  • १९१३: कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९१)

  • १९१४: नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल २००२)

  • १९३०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक रिची बेनो यांचा जन्म.

  • १९४३: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २०१२)

  • १९४६: अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार विनोद खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २०१७)

  • १९४६: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर २०१२)

  • १९७२: संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६६१: शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०)

  • १८९२: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८०९)

  • १९५१: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८६०)

  • १९७४: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९६)

  • १९७९: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)

  • १९८१: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९१८)

  • २००७: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२१)

  • २००७: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)

  • २०१५: हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.