चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ एप्रिल २०२०

Date : 7 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द :
  • राजधानी नवी दिल्लीत मे आणि जून महिन्यात दोन टप्प्यात होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली आहे. करोना विषाणूचा धोका वाढत चालला असून सर्वाच्या आरोग्याचे हित जपण्याच्या दृष्टीने सोमवारी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • विश्वचषक स्पर्धा १५ ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची स्पर्धा ५ ते १३ मेदरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जूनदरम्यान होणार होती. ‘‘करोनामुळे रायफल-पिस्तूल तसेच शॉटगन विश्वचषक स्पर्धा संयोजकांना रद्द करावी लागली आहे. या दोन्ही स्पर्धा नवी दिल्लीत होणार होत्या,’’ असे जागतिक नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) म्हटले आहे.

  • सध्याची परिस्थिती पाहता, ‘आयएसएसएफ’ आणि भारतीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा रद्द करण्यासाठी संयोजकांवर दबाब होता. ‘‘खेळाडू, पदाधिकारी, कर्मचारी तसेच आमच्या सर्व सदस्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे,’’ असे ‘एनआरएआय’कडून सांगण्यात आले.

“१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा” :
  • तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १५ एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी BCG च्या अहवालाचा हवाला दिला आहे. ३ जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असं या अहवालात म्हटल्याचं राव यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे. खरंतर लॉकडाउन संपण्यासाठी १४ एप्रिल ही तारीख अजून उजाडायची आहे. मात्र तो संपण्याआधीच के चंद्रशेखर राव यांनी आणखी दोन आठवडे भारतात लॉकडाउन हवा अशी मागणी केली आहे.

  • २५ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीसाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याआधी २२ मार्चच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला. आता हा कालावधी आणखी वाढवावा अशी मागणी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

  • भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४ हजारांच्या वर गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि येत्या काळातही ही संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा असं राव यांनी म्हटलं आहे. अद्याप लॉकडाउन नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. मात्र आता तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी केलेल्या मागणीवर मोदी सरकार काही विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतातील करोनाबाधितांची संख्या ४४२१ वर, २४ तासात ३५४ रुग्ण वाढले :
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न असताना बाधितांची संख्या मात्र वाढत चालली असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला संथ असलेल्या करोनाच्या संसर्गानं महिनाअखेरीस उसळी घेतली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली.

  • दुसरीकडं मृत्यूदरही वाढला असून महाराष्ट्रातील परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाउन कायम राहणार असल्याची शक्यता असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.

जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘बॉण्डगर्ल’ ऑनर ब्लॅकमॅनचं निधन :
  • मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ‘जेम्स बॉण्ड’ या व्यक्तिरेखेवर आधारित अनेक चित्रपट आणि सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजमधील जेम्स बॉण्ड हे पात्र जसं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. त्याचप्रमाणे यातील ‘बॉण्डगर्ल’ची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. मात्र चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘गोल्डफिंगर’ यातील बॉण्ड गर्ल अर्थात अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन हिचं निधन झालं आहे.

  • ऑनर ब्लॅकमॅन यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. ‘द गार्जियन’ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे ऑनर यांच्या निधनाची माहिती समजता चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

  • ‘ऑनर या केवळ उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर एक कर्तव्यदक्ष गृहिणीदेखील होती. त्यांनी करिअरबरोबरच घरही उत्तमरित्या सांभाळलं. ती एक चांगली आई, आजी होती. त्यांच्या आवाजात एक गोडवा होता, जो आम्ही कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या आठवणी कायम आमच्यासोबत असतील’, असं ऑनर यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

  • दरम्यान,त्यांच्या निधनानंतर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऑनर यांनी अनेक चित्रपट, छोट्या पडद्यावरील शोमध्ये काम केलं आहे. जेम्स बॉण्डप्रमाणेच त्यांची ‘द अव्हेंजर शो’ मधील भूमिकाही तितकीच गाजली होती.

०७ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.