चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ डिसेंबर २०१९

Date : 7 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कलम ३७० हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेला मिळाली नवी आशा - पंतप्रधान : 
  • जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या कठीण वाटत असला तरी या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांमध्ये विकासाची नवी आशा जागृत झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीत एका परिषदेत ते बोलत होते.

  • मोदी म्हणाले, “यापूर्वी निवडणुका आल्या की नव्या रेल्वे गाड्या सोडण्याच्या तसेच शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणा केल्या जात होत्या. मात्र, आता आम्ही लोकांना आश्वासनांच्या राजकारणाकडून प्रत्यक्ष कामांच्या राजकारणाकडे घेऊन चाललो आहोत. यापूर्वी संसदेत अनेक नव्या रेल्वे गाड्यांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, एकही सुरु झाली नाही. त्या रेल्वे गाड्यांचा कागदावर कोणताही उल्लेख नाही. आम्ही केवळ घोषणाबाजी करणारे नाही तर नवा अध्याय लिहिणारे लोक आहोत. आम्ही देशाचे सामर्थ्य, साधन-संपत्ती आणि देशाच्या स्वप्नांवर भरवसा करणारे लोक आहोत.”

  • भारत संपूर्ण विश्वासाने आपल्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काम करीत आहे. हे लक्ष्य अर्थव्यवस्थेसोबत १,३०९ कोटी भारतीयांचे दरडोई उत्पन्न, राहणीमानाचा दर्जा आणि त्यांच्या चांगल्या भविष्याशी जोडले गेलेले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा - भारताची ४१ पदकांची कमाई : 
  • दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी भारताने एकूण ४१ पदकांची कमाई करीत अग्रस्थान कायम राखतानाच यजमान नेपाळपासूनचे अंतरही वाढवले आहे. भारताने १९ सुवर्ण, १८ रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर घातली.

  • आता भारताच्या खात्यावर ८१ सुवर्ण, ५९ रौप्य आणि २५ कांस्य अशी एकूण १६५ पदके जमा आहेत. दुसऱ्या स्थानावरील नेपाळच्या खात्यावर ११६ पदके (४१ सुवर्ण, २७ रौप्य, ४८ कांस्य) जमा आहेत. शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.

‘पॉक्सो’ गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा- राष्ट्रपती : 
  • माउंट अबू, राजस्थान : महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस  संदेश दिला.

  • अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.

  • कोविंद म्हणाले की, महिलांची सुरक्षा हा अतिशय गंभीर विषय बनला आहे. यात बरेच काम झाले आहे व अजून बरेच बाकी आहे. आमच्या कन्यांवर होणारे राक्षसी हल्ले पाहून देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे. त्यामुळे आईवडील, नागरिक, तुम्ही आम्ही सर्व जणांनी पुरुषांमध्ये महिलांविषयी आदराची भावना रूजवण्याची गरज आहे. या निमित्ताने अनेक मुद्दे पुढे येत आहेत.

एअरटेलच्या ग्राहकांना दिलासा; केली ‘ही’ मोठी घोषणा : 
  • नुकतेच सर्व कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये बदल केले होते. तसंच रिलायन्स जिओने आपले टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची घोषणा केल्यानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. अशातच सर्व कंपन्यांनी केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच अन्य मोबाईल नेटवर्कसाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती.

  • परंतु आता एअरटेलनं ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेता फेअर युसेज पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पुन्हा एकदा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.

  • एअरटेलनं आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही एक बदल करत आहोत. उद्यापासून (शनिवार) भारतात कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल करता येतील. यासाठी कोणतीही अट नाही, अशा आशयाचं ट्विट कंपनीनं केलं आहे.

दिनविशेष :
  • भारतीय लष्कर ध्वज दिन / आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

  • १८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

  • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९३५: प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

  • १९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

  • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

  • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

  • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

  • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

जन्म 

  • १९०२: भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)

  • १९२१: स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)

  • १९५७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)

  • १९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)

  • २००१: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.

  • १९७६: विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन.

  • १९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन. (जन्म: १७ जून १९०३)

  • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)

  • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म: १६ जुलै १९१३ - अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)

  • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)

  • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.

  • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.