चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ फेब्रुवारी २०२०

Updated On : Feb 07, 2020 | Category : Current Affairsराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा - प्रशांत मोरे, संदीप दिवे अंतिम फेरीत : 
 • छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि संदीप दिवे यांनी अंतिम फेरी गाठली. महिलांमधून माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारी आणि एस. अपूर्वा यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवले.

 • उपांत्य लढतीत विश्वविजेत्या प्रशांत मोरेने (रिझव्‍‌र्ह बँक) महाराष्ट्राच्या निसार अहमदला २५-०, २५-१६ असे नमवत वर्चस्व दाखवून दिले. अन्य उपांत्य लढतीत एअर इंडियाच्या संदीप दिवेने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित त्रिपानकरचा २५-०४, २३-२० असा पराभव केला.

 • महिलांमधून पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या रश्मी कुमारीने तिच्याच संघाच्या नाग ज्योतीला चुरशीच्या सामन्यात ०१-२५, २०-१७, २४-१२ असे हरवून अंतिम फेरी गाठली. आंतरराष्ट्रीय फेडरेशन चषक विजेत्या एलआयसीच्या एस. अपूर्वाने बिहारच्या खुशबू राणीचा सरळ दोन सेट्समध्ये १८-८, २३-१६ असा पराभव केला.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच : 
 • चीनमधून जगभर पसरत चाललेल्या ‘करोना’ विषाणू संसर्गाचा टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही. ‘करोना’ विषाणूच्या अफवेने चिंताग्रस्त होण्याची गरज नसून ऑलिम्पिक स्पर्धा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे स्पर्धा संयोजकांकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

 • टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी वेगाने पसरत चाललेल्या ‘करोना’ विषाणूचा सामना करण्यासाठी विशेष बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. ‘करोना’ विषाणू संसर्गामुळे जवळपास ५६० लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून २८ हजारांहून अधिक नागरिकांना संसर्ग झाला आहे. या विषाणूचे मुख्य केंद्र चीनमधील वुहान हे शहर असले तरी अन्य देशांनीही आता धोक्याचा इशारा दिला आहे.

 • ‘‘या विषाणूपेक्षा लोकांमध्ये भय जास्त वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील गोंधळ शमवणे जास्त महत्त्वाचे आहे. चीनबाहेर ‘करोना’ विषाणूची फक्त १९१ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे योग्य दृष्टिकोनातून पावले उचलण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) याप्रकरणी आणीबाणी घोषित केली नाही. रिओ ऑलिम्पिकदरम्यान आम्हाला ‘झिका’ विषाणूचा सामना करावा लागला होता,’’ असे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे प्रवक्ते क्रेंग स्पेन्स यांनी सांगितले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाची नोटीस : 
 • दिल्ली विधनासभा निवडणूक – २०२० साठीचा प्रचार आज संपला आहे. मात्र, या निवडणूक प्रचारादरम्यान केलेले एक वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी त्यांनी केलेल्या भाषणा  बद्दल ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याप्रकरणी त्यांना ७ फेब्रवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

 • मुख्यमंत्री योगी सभेत भाषाण दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल हे शाहीनबागमधील आंदोलकांना बिर्याणी खाऊ घालतात, असं म्हटलं होतं. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, प्राथमिकदृष्ट्या अशाप्रकारचे वक्तव्य करून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.

 • दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विकासपूरी येथे सभा झाली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानी मंत्र्यांनी केजरीवालांच्या केलेल्या समर्थनाचा संबंध शाहीन बाग आंदोलनाशी जोडला होता. “पाकिस्तानी मंत्री अरविंद केजरीवालांचे समर्थन यासाठी करतात कारण, तेच शाहीन बागमध्ये बिर्याणी खायला घालू शकतात.” असं ते म्हणाले होते.

सिनेटने केले ट्रम्प यांना दोषमुक्त : 
 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या महाभियोगाच्या कारवाईतून रिपब्लिकन सदस्यांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. महाभियोगाच्या कारवाईकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. सिनेटच्या निर्णयामुळे ट्रम्पविरोधकांना जोरदार धक्का बसला असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वर्षांतच ट्रम्प यांनी मोठा राजकीय विजय मिळविला आहे.

 • सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने ५२ विरुद्ध ४८ मताधिक्याने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून सिनेटने ट्रम्प यांची ५३ विरुद्ध ४७ मतांनी निर्दोष मुक्तता केली.

 • सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामात अडथळे आणणे असे दोन आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आले होते. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिदेन यांच्या युक्रेनमधील व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले आणि त्यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर केला, असा पहिला आरोप आहे. तर प्रतिनिधीगृहात या प्रकरणी महाभियोग चौकशी सुरू असताना व्हाइट हाऊसचे अधिकारी आणि अन्य सहकाऱ्यांना समितीसमोर साक्ष देण्यापासून रोखून पुरावे गोळा करण्यात बाधा निर्माण केल्याचा ट्रम्प यांच्यावर दुसरा आरोप आहे.

०७ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)