चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जानेवारी २०२०

Date : 7 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कनिष्ठ मुंबई-श्री शरीरसौष्ठव स्पर्धा : वैभव जाधव ‘कनिष्ठ मुंबई-श्री’चा मानकरी : 
  • सुदिश शेट्टीला ‘दिव्यांग मुंबई-श्री’चा किताब :- मुंबई : शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करत आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करणाऱ्या हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले. ‘दिव्यांगांच्या मुंबई-श्री’ स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली तर फॉच्र्युन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने ‘नवोदित मुंबई-श्री’चा मान पटकावला.

  • मालाड पूर्वेला झालेल्या या स्पर्धेत चार विविध प्रकारांमध्ये झालेल्या २००पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबासाठी सहा गटविजेत्यांमध्ये कडवी लढत रंगली होती. अखेर पंचांनी वैभव, शुभम आणि खुशाल यांच्या शरीरसौष्ठवाची तुलना केली. काही मिनिटांच्या चर्चेनंतर त्यांनी वैभव जाधवला किताब विजेता घोषित केले.

  • दोन गटांत झालेल्या ‘दिव्यांग-श्री’ स्पर्धेत १६ स्पर्धकांनी कमावलेली शरीरसंपदा पाहून प्रेक्षकही थक्क झाले. ५० आणि ५५ किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत सुदिश शेट्टीने यश संपादन केले. ५० किलो गटात माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले पहिला आला.

‘जेएनयू’ कुलगुरूंच्या हकालपट्टीची मागणी : 
  • चेहरे झाकलेल्या जमावाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर हल्ला केल्यानंतर, या विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने केली आहे.

  • काठय़ा व लोखंडी कांबी घेतलेल्या आणि चेहरे झाकून घेतलेल्या जमावाने रविवारी केलेल्या या हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघटनेने (जेएनयूटीए) पत्रकार परिषदेत केली. विद्यापीठ परिसरात जे काही झाले, त्यानंतर ‘कुलगुरूंनी जायलाच हवे’, असे संघटनेचे पदाधिकारी म्हणाले. सुचरिता सेन नावाच्या प्राध्यापिकेच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यामळे त्या पत्रकार परिषदेत येऊ शकल्या नाहीत, असे प्रा. सौगत भादुडी यांनी सांगितले.

  • विद्यापीठ परिसरातील हिंसाचाराबाबत जेएनयूटीएची बैठक सुरू असतानाच हल्लेखोरांनी तेथे प्रवेश केला आणि विद्यार्थी व शिक्षकांवर हल्ला केला, असा आरोप आहे.

मोदींकडून ट्रम्प यांना नववर्षाच्या शुभेच्छा; द्विपक्षीय संबंध मजबूत होत असल्याची व्यक्त केली भावना :
  • पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दोन्ही देशांचं नातं मजबुतीनं पुढे जात असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

  • या निवेदनानुसार, मोदींनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली तसेच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्रम्प, त्यांचे कुटुंब आणि अमेरिकेच्या लोकांना नव्या वर्षात चांगले आरोग्य, समृद्धी आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • पीएमओने सांगितले की, दोन्ही देशांचं नातं मजबुतीने पुढे जात असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तसेच त्यांनी गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील रणनीती सहकार्य अधिक व्यापक व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत काम सुरु ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

“दिवसाला सहा तास अन् आठवड्यातील चारच दिवस काम करा”; पंतप्रधानांचाच प्रस्ताव :
  • जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनण्याचा बहुमान मिळवणाऱ्या फिनलँडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सना मरीन यांनी देशातील कामगारवर्गासाठी एक महत्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. फिनलँडमधील कार्यालयीन कालावधी कमी करुन तो दिवसला सहा तास करावा, त्याचप्रमाणे पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा आठवडा करावा असा प्रस्ताव मरीन यांनी मांडला आहे. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणीही लवकरच सुरु होणार आहे.

  • डाव्या आघाडीतील पाच पक्षांनी एकत्र येऊन फिनलँडमध्ये सरकार स्थापन केलं असून नुकताच मरीन यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी सर्वात आधी देशातील कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने एक ठराव मांडला आहे. देशातील सर्वच कंपन्यांनी कामगारांच्या कामाच्या वेळा कमी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे मरीन यांनी स्पष्ट केलं आहे.

  • मरीन यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्या वयाने तरुण असल्याने त्यांनी असा विचार केल्याची चर्चा देशातील राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली. मात्र यावरही मरीन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी कधीही माझ्या वयाचा किंवा स्त्री असण्याचा विचार केला नाही. मी ज्या कारणामुळे राजकारणात आले त्या उत्साहवर्धक कारणांचा मी अधिक विचार करुन निर्णय घेते,” असं मरीन म्हणाल्या आहेत.

०७ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.