चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ नोव्हेंबर २०१९

Date : 7 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वीटभट्टी ते ऑलिम्पिकमध्ये देशाचे नेतृत्व :
  • आष्टीच्या अविनाश साबळेच्या परिश्रमाची ‘अडथळ्यांची शर्यत’ :- आई-वडील वीटभट्टीवरील मजूर. तो आणि त्याची बहीणही तेथेच राबलेले. पण मनात उच्च शिक्षित व्हावे, ही त्याची ऊर्मी. परिस्थितीमुळे ते साध्य झाले नाही. सैन्य दल खुणावू लागले म्हणून तो सैनिक झाला. तेथे त्याच्या क्रीडाक्षेत्रातील गुणवत्तेला संधी मिळाली.

  • खडतर परिश्रम ही त्याची जमेची बाजू होती. अंगच्या जिद्दीला त्या परिश्रमाची जोड मिळाली आणि त्याला ऑलिम्पिकमध्ये ‘अडथळ्यांची शर्यत’ या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. असा प्रत्यक्ष जीवनातही अडथळ्यांची शर्यत पार करणारा प्रवास आहे आष्टीतील अविनाश साबळे या तरुणाचा.

  • अविनाश साबळेला तीन हजार मीटरची शर्यत पार करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळवल्यानंतर थेट ऑलम्पिक स्पर्धेचीच द्वारे खुली झाली. या क्रीडा प्रकारात तब्बल ६७ वर्षांनंतर अविनाशच्या माध्यमातून भारताला संधी मिळाली आहे.

  • अविनाश साबळे हा बीड जिल्ह्य़ातील दुष्काळी भाग म्हणून ओळखले जात असलेल्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा. एक हजार लोकसंख्येचे हे गाव.

अखेर बीएसएनएलने कर्मचाऱ्यांसाठी आणली स्वेच्छानिवृत्ती योजना :
  • कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडने (एमटीएनएल) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ सुमारे ८०,००० कर्मचारी घेतील अशी बीएसएनएलला आशा आहे. यामुळे कंपनीची ७,००० कोटी रुपयांची बचत होणार आहे. केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएल एकत्रीकरणाच्या निर्णयासह दिलासा पॅकेज दिल्यानंतर काही दिवसांतच या दोन्ही कंपन्यांनी व्हीआरएस योजना आणली आहे.

  • बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ही योजना ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत खुली राहणार आहे. व्हीआरएस घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी प्रादेशिक कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची संख्या १.५० लाख असून सुमारे १ लाख कर्मचारी या योजनेस पात्र आहेत.

  • बीएसएनएलच्या व्हीआरएस २०१९ योजनेनुसार, वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नियमित आणि कायम कर्माचारी व्हीआरएससाठी पात्र आहेत. यामध्ये जे दुसऱ्या कंपनीमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत, ते कर्मचारीही पात्र आहेत. पात्र कर्मचाऱ्यांसाठी अनुग्रह वेतन प्रत्येक सेवा वर्षासाठी ३५ दिवस आणि उरलेल्या सेवाकाळासाठी २५ दिवसांच्या वेतनाबरोबर असेल.

एच १ बी’ व्हिसा नाकारण्याच्या प्रमाणात चौपटीने वाढ :
  • अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या निर्बंधात्मक धोरणांमुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे एच १ बी व्हिसा अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण चौपटीने वाढले असल्याचे दिसून आले आहे.

  • दी नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी या संस्थेने अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवा संस्थेच्या माहितीआधारे असे म्हटले आहे की, एच १ बी व्हिसा हा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय असला तरी तो नाकारला जाण्याचे प्रमाण चौपट वाढले आहे. २०१५ मध्ये एच १ बी व्हिसा नाकारले जाण्याचे प्रमाण सहा टक्के होते, ते चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीत २४ टक्के झाले आहे. एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्याच्या मदतीने अमेरिकी कंपन्या भारतीय किंवा परदेशी कर्मचाऱ्यांना तज्ज्ञतेच्या आधारावर नोक ऱ्या देतात.

  • तंत्रज्ञान कंपन्या भारतासह अनेक देशातून कर्मचारी घेत असतात. त्यात भारत व चीनच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रमुख भारतीय कंपन्यांकडून एच १ बी व्हिसासाठी करण्यात आलेले अर्ज फेटाळण्याचे प्रमाण ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे वाढले आहे. अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, इंटेल, गुगल या कंपन्यांमध्ये प्राथमिक स्तरावरील नोक ऱ्यांसाठी एच १ बी व्हिसा अर्ज नाकारण्याचे प्रमाण २०१५ मध्ये केवळ एक टक्का होते, तर २०१९ मध्ये ते या चार कंपन्यासांठी सहा, आठ, सात व तीन टक्के वाढले आहे.

  • अ‍ॅपल कंपनीतील नोक ऱ्यांसाठी एच १ बी व्हिसा अर्ज नाकारण्याचे प्रमाण तेवढेच म्हणजे दोन टक्के राहिले आहे. याच काळात टेक महिंद्राला एच १ बी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण चार टक्के होते, ते आता ४१ टक्के, तर टाटा कन्सलटन्सी सव्‍‌र्हिसेसला व्हिसा नाकारण्याचे प्रमाण सात टक्क्यांवरून ५३ टक्के झाले आहे. विप्रोसाठी हे प्रमाण सात टक्क्यांवरून ५३ टक्के झाले, इन्फोसिससाठी ते दोन टक्क्यांवरून ४५ टक्के झाले आहे.

‘आरसेप’बाबत भारताचे प्रश्न सोडविण्यास चीन इच्छुक :
  • भारताने काही प्रश्न उपस्थित करीत ‘आरसेप’मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यानंतर चीनने यावर परस्पर समझोत्यावर आधारित तोडगा काढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.

  • आरसेप खुले आहे, परस्पर समझोत्याचे तत्त्व पाळण्यास आम्ही तयार आहोत आणि भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास तयार आहोत, भारत आरसेपमध्ये सहभागी झाल्यास स्वागतच आहे, असे चीनने म्हटले आहे.

  • दरम्यान, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना अधिसूचित केल्याबाबत चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, अमेरिका हवामानाच्या मुद्दय़ावर जास्त जबाबदारी घेऊन काम करील अशी आशा आहे. हवामान बदल हे मोठे आव्हान आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

  • १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

  • १९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

  • १९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.

  • १९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

  • १९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

  • २००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

जन्म 

  • १८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९३२)

  • १८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९३४)

  • १८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

  • १८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

  • १९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९५)

  • १९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.

  • १९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)

  • १९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

  • १९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)

  • १९६३: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

  • १९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

  • १९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

  • १९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

  • २०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१०)

  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.