चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ एप्रिल २०२०

Date : 8 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द :
  • राजधानी नवी दिल्लीत मे आणि जून महिन्यात दोन टप्प्यात होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली आहे. करोना विषाणूचा धोका वाढत चालला असून सर्वाच्या आरोग्याचे हित जपण्याच्या दृष्टीने सोमवारी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • विश्वचषक स्पर्धा १५ ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची स्पर्धा ५ ते १३ मेदरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जूनदरम्यान होणार होती. ‘‘करोनामुळे रायफल-पिस्तूल तसेच शॉटगन विश्वचषक स्पर्धा संयोजकांना रद्द करावी लागली आहे. या दोन्ही स्पर्धा नवी दिल्लीत होणार होत्या,’’ असे जागतिक नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) म्हटले आहे.

  • सध्याची परिस्थिती पाहता, ‘आयएसएसएफ’ आणि भारतीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा रद्द करण्यासाठी संयोजकांवर दबाब होता. ‘‘खेळाडू, पदाधिकारी, कर्मचारी तसेच आमच्या सर्व सदस्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे,’’ असे ‘एनआरएआय’कडून सांगण्यात आले.

IRCTC कडून 30 एप्रिल पर्यंत ‘या’ रेल्वेंचे बुकिंग रद्द : 
  • करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशा लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आलेले आहेत. मात्र देशतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. हे पाहता  आयआरसीटीसीने आपल्या खासगी रेल्वेचे बुकिंग 30 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • आयआरसीटीसीकडून तीन खासगी रेल्वे चालवल्या जातात. ज्यामध्ये दोन तेजस ट्रेन आणि एक काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. या तिन्ही रेल्वेंचे बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना त्यांचे संपूर्ण पैसे रिफंडद्वारे मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे या तिन्ही रेल्वेंचे 25 मार्च ते 15 एप्रिलपर्यंतचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले होते. मात्र आयआरसीटीसीकडून आता 30 एप्रिल पर्यंत सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • या अगोदर संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा ३१ मार्चऐवजी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं होतं. तसेच, ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असतील त्यांनी चुकूनही तिकीट कॅन्सल करु नये असे आवाहनही आयआरसीटीसीकडून प्रवाशांना करण्यात आलं होतं.

चीनमध्ये बळींची संख्या प्रथमच शून्यावर : 
  • चीनमध्ये प्रथमच करोनाने एकही बळी गेला नसल्याचे सांगण्यात आले. जानेवारीपासून चीनमधील करोना बाधित व मृतांचे आकडे वाढत गेले होते.

  • साथीची परमोच्च अवस्था गाठली गेल्यानंतर ते कमी झाले पण मृतांचा आतापर्यंत आकडा शून्यावर आला नव्हता. असे असले तरी ३२ नवीन परदेशी रुग्ण सापडले असून एकूण परदेशी रुग्णांची संख्या आता ९८३ झाली आहे.

  • चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, सोमवारी चीनमध्ये करोनाने एकही बळी गेला नाही. चीनमधील एकूण मृतांची संख्या त्यामुळे ३३३१ आहे. चीनमध्ये दोन महिने करोनाने थैमान घातले त्यात हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहानमध्ये सर्वाधिक बळी गेले होते.

  • सोमवारच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या ८१७४० असून १२४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७७१६७ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. स्थानिक संक्रमणाचा एकही रुग्ण सोमवारी सापडला नसून परदेशातून आलेले ३२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परदेशी रुग्णांची संख्या आता ९८३ झाली आहे. एकूण ३० रुग्ण हे लक्षणे नसलेले असून त्यात नऊ परदेशी रुग्णांचा समावेश आहे.

मुंबई, पुण्यासह करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन वाढणार :
  • लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (८.३३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. 

  • त्याखालोखाल पंजाब (७.८९ टक्के)आणि हिमाचल प्रदेश (७.६९ टक्के ) या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे.

  • विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंची नजर ‘आयपीएल’कडेच :
  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आकर्षक बोलींबाबत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू अतिशय भावनिक असतात. याच भीतीपोटी विशिष्ट कालावधीत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघाला चिथावत नाही. त्याऐवजी त्यांना खूश राखतात, असा गौप्यस्फोट माजी कर्णधार मायकेल क्लार्कने करून क्रिकेटक्षेत्रात खळबळ माजवली आहे.

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील हाडवैर सर्वश्रुतच आहे. परंतु गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा दृष्टिकोन बदलला आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या ‘आयपीएल’चे ठोकताळे मांडूनच ते मैदानावर उतरतात, असा गंभीर आरोप क्लार्कने केला आहे.

  • ‘‘भारत ही क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही. यात ‘आयपीएल’ महत्त्वाचे ठरते. परंतु ‘आयपीएल’ नजीक येताच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि कदाचित अन्य देशांच्या क्रिकेटपटूंचेही भारतीय संघाविरुद्ध खेळतानाचे वागणे बदलते. एप्रिल महिन्यात कोहलीच्या संघातील खेळाडूंच्या साथीनेच खेळायचे असल्याने त्यांची देहबोलीच बदलते,’’ असे विश्लेषण ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार क्लार्कने केले आहे.

०८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.