चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जानेवारी २०२०

Date : 8 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही - मुख्यमंत्री : 
  • महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उद्योग क्षेत्रातल्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

  • राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रसेर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरला आहे. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवर उद्योजकांची उपस्थिती होती.

  • या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया या मान्यवरांची उपस्थिती होती.

बँका बंद, ‘या’ सेवांवरही होणार थेट परिणाम - Bharat Bandh : 
  • कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येत आज बुधवारी दि. 8 जानेवारी रोजी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच महत्त्वाच्या बँक संघटना सहभागी होणार आहेत. परिणामी बहुतांश बँका बंद राहण्याची शक्यता आहे. एटीएम सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • एसबीआयने भारत बंददरम्यानही बँकेचे व्यवहार सुरु राहतील असं स्पष्ट केलं आहे. तरीही इतर अनेक लहान मोठ्या बँकांच्या ग्राहकांना या बंदचा फटका बसू शकतो. याशिवाय वाहतूक आणि अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या देशव्यापी कर्मचारी बंदला शिवसेनेने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. तर, काँग्रेस राष्ट्रवादीदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

  • कामगार मंत्रालयाने 2 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीत एकाही मागणीबाबत ठोस आश्वासन न दिल्याने भारत बंद पुकारला , असे 10 कामगार संघटनांनी एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. इंटक, आयटक, एचएमएस, सिटू यांच्यासह विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. या बंदमध्ये देशभरातल्या काही महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनाही सहभागी होण्याचीही शक्यता आहे.

  • JNU मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ते बंदमध्ये सहभागी होऊ शकतात. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत आहोत, असं या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकार एअर इंडिया विकण्याच्या तयारीत आहे. रेल्वेचंही खासगीकरण केलं जातंय. BSNL-MTNL विलीनीकरण झाल्याने 93600 कामगारांच्या नोकऱ्या गेल्यात. या खासगीकरण धोरणाविरोधात उद्याचा बंद आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन – सीटूच्या (CITU) वतीने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणकडून पहिली प्रतिक्रिया : 
  • इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. आपण स्वसंरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं स्पष्टीकरण यावेळी इराणकडून देण्यात आलं. या हल्लानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वी इराणनं जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचं म्हटलं होतं.

  • अमेरिकेत आयोजित परिषदेसाठी जाणाऱ्या इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना मंगळवारी व्हिसा नाकारण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर मोहम्मद जावेद झरीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यूएन चार्टरच्या आर्टिकल ५१ अंतर्गत इराणनं स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं. “अमेरिकेनं आमच्या नागरिकांवर आणि सैनिकांवर भ्याड हल्ला केला होता. युद्ध छेडण्याचा आमचा हेतू नाही, परंतु आक्रमकतेनं आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करू,” असंही त्यांनी नमूद केलं.

  • “इराकमधील अमेरिकन लष्कराच्या हवाई तळांवर हल्ला करून आम्ही पहिलं पाऊल टाकलं आहे. आम्ही अमेरिकेच्या सैन्याला सोडणार नाही,” अशी प्रतिक्रिया बुधवारी इराणी सरकारी माध्यमाशी बोलताना इराणच्या कमांडरनं दिली. यापूर्वी अमेरिकनं लष्कर आणि पेटागनला दहशतवागी घोषित करण्याच्या बाजूनं मंगळवारी मतदान करण्यात आलं.

मिसाइल स्ट्राइकनंतर अमेरिकेच्या विमानांना इराक, इराण, ओमानमधून उड्डाणांवर बंदी : 
  • अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून FAA कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • बुधवारी पहाटेच्या सुमारास इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर बारापेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मध्य आशियात वाढलेला राजकीय तणाव आणि लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय घेतला आहे. अमेरिका वगळता अन्य देशांच्या प्रवासी विमानांची या भागातून उड्डाणे सुरु आहेत. एफएएच्या बंदीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण अन्य देश सुद्धा FAA चा सल्ला गांभीर्याने घेतात.

  • फेडरल एव्हिएशनने ताजा निर्णय घेण्याआधीच अमेरिकन प्रवासी विमान कंपन्यांना इराक, इराण, ओमान या भागातून २६ हजारफुटापेक्षा कमी उंचीवरुन उड्डाण करण्यास मनाई केली होती. जूनमध्ये इराणने अमेरिकेचे टेहळणी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. इराकमधील अमेरिकन तळावरील हल्ल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेडने इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

०८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.