चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 08, 2019 | Category : Current Affairsराज्यात १९९९ ची पुनरावृत्ती होणार ? जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं :
 • विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांचा कालावधी उलटला. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजपा दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समसमान वाटा या आपल्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपा मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास तयार नाही.

 • अशा परिस्थितीत आघाडीच्या काही नेत्यांकडून शिवसेनेला पाठींबा देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेला पाठींबा देत आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं याकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे.

 • गुरूवारी भाजपाच्या काही नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. परंतु यावेळी भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला नाही. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्ष आणि सत्तेतील समान वाटपाचाच सूर निघाला.

 • आपल्या अटी मान्य असतील तर फोन करा अन्यथा नाही केलात तरी चालेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यामुळे हा तिढा गुरूवारीही सुटू शकला नाही. ९ नोव्हेंबर रोजी राज्याची विधानसभा बर्खास्त होणार आहे. विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळवत भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या वाटाघाटीनुसार मुख्यमंत्रिपदावर शिवसेनाही आपला दावा सांगत आहेत.

मतदारांसाठी आता ‘व्होट फ्रॉम होम’ सुविधा :
 • दिल्लीत वास्तव्यास असलेल्या जेष्ठ मतदारांसाठी आता निवडणूक आयोगानं नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ८० वर्षे किंवा त्यावरील तसंच दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगानं ‘व्होट फ्रॉम होम’ ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा मतदारांना आता मतदान केंद्रावर न जाता घरबसल्या मतदान करता येणार आहे.

 • दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीपासून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त दिल्लीतील १.४४ कोटी मतदारांना आपल्या मतदान केंद्रांवर किती मोठी रांग आहे, तसंच किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची माहितीही मिळणार आहे.

 • व्होटर व्हेरिफिकेशन कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमनं एक दौरा केला होता. या टीमनं सर्व निवडणूक अधिकारी, पोलीस आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतल्याची माहिती दिल्ली निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. रणबीर सिंह यांनी दिली.

 • या बैठकीत त्यांनी ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसंच दिव्यांग मतदारांची नावं व्हेरिफाय करण्याचे आदेश दिले असल्याचेही ते म्हणाले. तसंच यावेळी मतदारांसाठी एक नवं अॅप लाँच करण्यात येणार आहे. बूथ अॅप असं या अॅपचं नाव असेल. या अॅपद्वारे कोणताही मतदार आपल्या मतदान केंद्रावर किती मोठी रांग आहे किंवा कोणी आतापर्यंत किती मतदान केलं याची माहिती घेऊ शकतो.

बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी; १,१६३ जागांसाठी भरती :
 • बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं वृत्त आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने (IBPS)विशेष अधिकारी (स्पेशलिस्ट ऑफिसर, SO)पदाच्या एकूण 1,163 जागांसाठी भरती जाहीर केलीये. यामध्ये, कृषी क्षेत्र अधिकारी(स्केल- I), आयटी अधिकारी (स्केल- I),कायदा अधिकारी (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I),आणि मानव संसाधन / वैयक्तिक अधिकारी (स्केल- I) या पदांचा समावेश आहे.

 • यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला 6 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. 26 नोव्हेंबर अर्ज करण्याची अखेरती तारीख आहे. आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरुन इच्छुकांना अर्ज करता येईल. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.

 • पहिल्या टप्प्यात 28 आणि 29 डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होईल. याचा निकाल जानेवारीमध्ये येईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा २५ जानेवारी २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. त्यानंतर अखेर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलाखत घेतली जाईल. अशाप्रकारे उमेदवाराची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्याचं वय २० ते ३० च्या दरम्यान असावं. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. परिणामी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर (ibps.in)असेलेले नोटीफीकेशन पाहूनच अर्ज करावा.

हैदराबादच्या मुन्नीने रचला इतिहास, व्हर्जिनियाच्या सिनेटरपदी निवड :
 • अमेरिकेला जाण्याआधी हैदराबादमध्ये तिला सगळे मुन्नी म्हणून ओळखायचे. आज याच हैदराबादच्या मुन्नीने म्हणजे गझला हाश्मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. गझला हाश्मी गेल्या ५० वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. व्हर्जिनियाच्या सिनेटर बनणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन मुस्लिम आहेत. अमेरिकेच्या राजकारणात मुस्लिम महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत असताना गझला हाश्मी यांनी ही निवडणूक जिंकली आहे. मागच्यावर्षी इल्हान उमर आणि राशिदा तलैब या दोन मुस्लिम महिलांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 • व्हर्जिनियामध्ये भारतीय, हिस्पॅनिक्स आणि कोरियन लोकांची मोठी संख्या आहे. इमिग्रेशन हा तिथे एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्ण वेळ राजकारणात उतरण्यासाठी त्यांनी अलीकडेच आपली नोकरी सोडली. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे.

 • दुबईमध्ये राहणाऱ्या झफर अकबर यांनी गझला हाश्मी यांचे अभिनंदन केले आहे. लहानपणीपासून मी मुन्नीला ओळखतो असे ते म्हणाले. झफर अकबर सुद्धा हैदराबादचे आहेत. या विजयावर बोलताना गझला हाश्मी यांनी हा माझा एकटीचा विजय नाही. व्हर्जिनियामध्ये आपण बदल घडवू शकतो असे ज्यांना वाटते त्या सर्वांचा हा विजय आहे असे त्या म्हणाल्या. गझला यांनी जॉर्जिया विद्यापीठातून इंग्लिशमध्ये बीएची पदवी घेतली. हाश्मी यांचे पती अझर १९९१ साली रिचमाँड येथे स्थायिक झाले.

भारतीय शीख यात्रेकरूंना कर्तारपूरसाठी पासपोर्टची गरज नाही :
 • कर्तारपूर मार्गिकेचा वापर करून गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पासपोर्टची अट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वर्षांसाठी शिथिल केली आहे. गुरुद्वाराला भेट देणाऱ्या शीख यात्रेकरूंकडे पासपोर्ट असणे आवश्यक असल्याचे त्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने जाहीर केले होते.

 • गुरू नानक यांच्या ५५० व्या जंयतीनिमित्त भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पासपोर्टची अट एका वर्षांसाठी शिथील करण्यात आली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

 • त्याचप्रमाणे १० दिवस अगोदर नोंदणी करण्याची आणि ९ व १२ नोव्हेंबर रोजी प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर शुल्क आकारण्याची अटही इम्रान खान यांनी रद्द केली आहे. आम्ही हे स्पष्टीकरण भारताकडे दिले आहे, असेही फैझल यांनी सांगितले.

दिनविशेष :
 • जागतिक शहरीकरण दिन / आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन

महत्वाच्या घटना 

 • १९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

 • १९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

 • १९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

 • १९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

 • २०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

 • २०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

जन्म 

 • १८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)

 • १९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)

 • १९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)

 • १९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)

 • १९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)

 • १६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)

 • २०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)

 • २०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)

 • २०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

 

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)