चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ ऑक्टोबर २०१९

Date : 8 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर :
  • जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. विल्यम जी.केलिन, सर पीटर जे. रेटक्लिफ, ग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

  • सोमवारी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे. मंगळवारी भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

  • ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा या तिन्ही वैज्ञानिकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या मात्रामुळे आपल्या सेलुलर मेटाबोलिज्म आणि शारीरिक हालचालीवर प्रभाव करतो. या वैज्ञानिकांच्या शोधामुळे एनिमिया, कँसर आणि अन्य आजारांवरील उपाय जलद होऊ लगाले.

असाध्य आजारांशी लढण्याच्या नव्या संशोधनाला नोबेल :
  • स्टॉकहोम : शरीरातील ऑक्सिजन मात्रेतील बदल ओळखून त्यानुसार प्रतिसाद देण्याचे पेशींचे कार्य कसे चालते, हे सिद्ध करून कर्करोग, रक्तक्षय, हृदयविकार यांसह अनेक असाध्य आजारांवर उपचार करण्याचा नवा मार्ग दाखवणाऱ्या संशोधनाला वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

  • जगातील हे सर्वोच्च पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर करण्यात आले. त्यापैकी डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत. सुमारे ९ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

  • ‘‘आपण जिवंत राहण्याची पेशीप्रक्रिया कशी चालते याबद्दलच्या आमच्या ज्ञानात या संशोधनाने मोलाची भर घातली आहे,’’ अशा शब्दांत नोबेल समितीने तिन्ही संशोधकांच्या या क्रांतिकारी संशोधनाचा गौरव केला. शरीरातील बदलत्या ऑक्सिजन मात्रेला प्रतिसाद देण्याची जनुकांची क्रिया नियमित करणारी  ‘जीवशास्त्रीय यंत्रणा’च या संशोधकांनी शोधली आहे, असे गौरवोद्गारही नोबेल समितीने काढले.

सीपीईसी मार्गिकेत नव्या प्रकल्पांसाठी पाकचे प्रयत्न :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  हे चीन दौऱ्यावर जात असून त्यात ते चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेअंतर्गत (सीपीईसी) आणखी मोठे प्रकल्प पाकिस्तानात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जलविद्युत, तेल शुद्धीकरण व पोलाद कारखाने यात चीनने गुंतवणूक करावी यासाठी ते चर्चा करणार आहेत.

  • चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प हा ६० अब्ज डॉलर्सचा आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे मंगळवारी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी बीजिंगमध्ये आगमन होईल त्यावेळी ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते प्रादेशिक व द्विपक्षीय महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. चीनच्या नेत्यांशी ते सीपीईसी मार्गिकेतील प्रकल्पांबाबत बोलणी करणार आहेत. अनेक कारणांमुळे जे प्रकल्प बंद पडले आहेत तेही पुन्हा सुरू करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आर्थिक अडचणी, नोकरशाहीचे अडथळे, राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाचे नियम यामुळे हे प्रकल्प बंद पडले आहेत.

  • पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांची ही तिसरी चीन भेट असून गेल्या ऑगस्टमध्ये ते पंतप्रधान झाले होते. अध्यक्ष क्षी जिनपिंग हे पुढील आठवडय़ात पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच्या अनौपचारिक बैठकीसाठी चेन्नईला येत आहेत. त्याआधी इम्रान यांची जिनपिंग यांच्याशी ही महत्वाची चर्चा होत आहे.

  • जलविद्युत, तेल शुद्धीकरण, पोलाद कारखाने यात चीनची मदत घेण्यासाठी ते चर्चा करणार आहेत असे नियोजन व विकास मंत्री मखदुम खुस्रो बख्तयार यांनी सांगितले. एलएनजी टर्मिनल, सात हजार मेगावॉटचा बुंजी जलविद्युत प्रकल्प, पाकिस्तान पोलाद कारखाना, तेल शुद्धीकरण कारखाना यात चीनची मदत घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा अपेक्षित असून उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त प्रकल्पांचाही विचार होणार आहे.

स्विस बँकांमधील खात्यांचा भारताला तपशील :
  • नवी दिल्ली/ बर्न : भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात माहितीच्या परस्पर देवाणघेवाणीबाबत झालेल्या नव्या व्यवस्थेंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँकांमधील खात्यांबाबतच्या तपशिलाचा पहिला भाग भारताला मिळाला आहे. परदेशात दडवून ठेवल्याचा संशय असलेल्या काळ्या पैशाविरुद्धच्या लढय़ात हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

  • ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन’ (एईओआय) बाबत जागतिक निकषांच्या चौकटीत स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) स्विस बँकांतील आर्थिक खात्यांबाबत ज्या ७५ देशांना माहिती दिली आहे, त्यात भारताचा समावेश आहे.

  • सध्या सक्रिय असलेल्या, तसेच २०१८ साली बंद करण्यात आलेल्या बँक खात्यांबाबत माहिती देण्याची तरतूद असलेल्या एईओआयच्या चौकटीअन्वये स्वित्झर्लंडकडून भारताला तपशील मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर अशा प्रकारची माहिती सप्टेंबर २०२० मध्ये दिली जाईल, असे एफटीएच्या प्रवक्त्याने सांगितले.

  • मात्र माहितीच्या देवाणघेवाणीबाबत कडक गोपनीयता बाळगण्याची अट असून, बँक खात्यांची संख्या अथवा स्विस बँकांमध्ये भारतीय ग्राहकांची किती रक्कम आहे याबाबतचे तपशील जाहीर करण्यास एफटीएच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. एफटीएने सुमारे ३.१ अब्ज आर्थिक खात्यांची माहिती भागीदार देशांना दिली आहे.

‘ग्रुप कॅप्टन’ सचिनची हवाई दलाच्या कार्यक्रमात उपस्थिती :
  • क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गाझियाबाद येथील हिंडन येथे झालेल्या भारतीय हवाई दल दिनानिमीत्तच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात हवाई दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान हवाईदलाची थरारक प्रात्याक्षिके पाहायला मिळाली.

  • ८७ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्या दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुडझेप घेतली. आजच्या ८७ व्या वर्धापनदिनानिमित्त गाझियाबादमधील हिंडन येथे हवाई दलाचा एक विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपीन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया आदी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

  • यावेळी बालाकोटच्या एअरस्ट्राईकमध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या जवानांनी ३ मिराज २००० एअरक्राफ्ट आणि २ सुखोई एअरक्राफ्ट यांचे यशस्वी संचलन केले.

दिनविशेष :
  • भारतीय वायुसेना दिन

महत्वाच्या घटना 

  • १९३२: इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

  • १९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.

  • १९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

  • १९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.

  • १९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

  • २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

जन्म 

  • १८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)

  • १८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)

  • १८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)

  • १९२२:संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)

  • १९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)

  • १९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)

  • १९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)

  • १९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.

  • १९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.

  • १९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.

  • १९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३१७: जपानचे सम्राट फुशिमी यांचे निधन. (जन्म: १० मे १२६५)

  • १८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)

  • १९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)

  • १९६७: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८८३)

  • १९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)

  • १९९६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)

  • १९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.

  • २०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)

  • २०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.