चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ डिसेंबर २०१९

Updated On : Dec 09, 2019 | Category : Current Affairsमहापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती - उद्धव ठाकरे : 
 • महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवडय़ात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरीत्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले.

 • महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

 • राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.

 • त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवडय़ात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरीत्या घेण्यात येईल.

भारत या देशाला विकणार सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ मिसाइल : 
 • ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. २०२० पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

 • ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

 • वेगवेगळया चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला १० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.

कोकणी लेखक, शिक्षणतज्ज्ञ सुरेश आमोणकर यांचे निधन : 
 • कोकणी लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ व गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे अल्प आजाराने रविवारी पणजी येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

 • गेले काही दिवस आमोणकर यांच्यावर पणजीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

 • शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २००९ साली आमोणकर यांना पद्मश्री किताबाने सन्मानित केले होते. शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक व भाषा चळवळीतील अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमोणकर यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात चार वेळा कर्करोगाशी यशस्वी लढा दिला होता.

 • आमोणकर यांचे शिक्षण मुंबईतील विल्सन महाविद्यालयात झाले होते. नंतर १९५६ ते १९६० या कालावधीत त्यांनी केनियाची राजधानी मोंबासातील गोवन स्कूलमध्ये अध्यापन केले. ‘धम्मपद’ या बौद्धांच्या धर्मग्रंथाचा कोकणीत अनुवाद करण्यासाठी ते पाली भाषा शिकले होते.

 • ज्ञानश्वरी, भगवद्गीता, ‘गॉस्पेल ऑफ जॉन’ या महत्त्वाच्या धार्मिक पुस्तकांचे त्यांनी कोकणीत प्रवाही अनुवाद केले. अलीकडेच त्यांनी शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सीझर’ या नाटकाचा कोकणीत अनुवाद केला होता. शेक्सपियरच्या विविध नाटकांमधील प्रसिद्ध  संवाद व म्हणी यांचे संकलन असलेल्या कोकणीतील अनुवादित पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले होते.

पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक : 
 • भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून, अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. अशा अवस्थेत पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अपकारक आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

 • रघुराम राजन यांनी ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातील लेखात भारतीय अर्थव्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची कारणे विशद करताना राजन यांनी म्हटले आहे की, ‘‘सध्याच्या सरकारमध्ये निर्णय, कल्पना, योजना या सर्वच पातळ्यांवर केंद्रीकरण झाले आहे.

 • पंतप्रधान कार्यालयातील काही लोक सर्व निर्णय घेतात. सत्ताधारी पक्षाचा राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांचे निर्णय उपयुक्त ठरत असतीलही, पण यात आर्थिक सुधारणा बाजूला ठेवल्या गेल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था देशपातळीवर कशी काम करते यापेक्षा राज्यांच्या पातळीवर कशी काम करते याचे ज्ञान संबंधित तज्ज्ञ व्यक्तींना नाही. त्यामुळे त्यांनी आखलेला कार्यक्रम अर्थव्यवस्थेसाठी सुसंवादी नाही.’’

०९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)