चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जानेवारी २०२०

Date : 9 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आनंद ५० व्या वर्षीही गुणवान बुद्धिबळपटू :
  • चेन्नई : पाच वेळा जगज्जेतेपद पटकवणारा भारताचा विश्वनाथन आनंदचा खेळ पहिल्यासारखा सर्वोत्कृष्ट होत नसला तरी त्याच्या पन्नाशीच्या मानाने सर्वोत्तम आहे, असे मत माजी विश्वविजेता रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकने व्यक्त केले आहे.

  • ‘‘आनंदने त्याच्या बुद्धिबळ खेळाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मोठी उंची गाठलेली आहे. त्यामानाने आता त्याला यश मिळत नसले तरी ५०व्या वर्षी आनंद सवर्ोेत्तम खेळ करत आहे. या वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळणे हे सोपे नाही. पुढची पिढी वयाच्या पन्नाशीपर्यंत आनंदसारखे सातत्य दाखवू शकेल, असे मला वाटत नाही. अजून किती खेळायचे हे आनंदच ठरवू शकतो. जोपर्यंत तो खेळाचा आनंद घेत आहे, तोपर्यंत तो खेळत राहील, हे मात्र नक्की. कारण बुद्धिबळ हा खेळ अन्य खेळांसारखा शारीरिक ताकदीवर अवलंबून नाही. मात्र त्याच वेळेला युवा बुद्धिबळपटूंसोबत खेळणे हेदेखील एक आव्हानच आहे,’’ याकडे क्रॅमनिकने लक्ष वेधले.

  • ‘‘आनंद ज्या वेळेस जगज्जेतेपदाची लढत मॅग्नस कार्लसनकडून २०१३ मध्ये हरला तेव्हाच त्याला निवृत्तीचे सल्ले देण्यात येत होते. मात्र आनंदने आपल्या कामगिरीने सर्वाना उत्तर दिले,’’ असेही क्रॅमनिकने सांगितले. क्रॅमनिकने सध्या चेन्नईत युवा बुद्धिबळपटूंसाठी सराव शिबीर आयोजित केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात यापैकीच सहा मुलांनी फ्रान्स येथे डाऊन क्रॅमनिककडून प्रशिक्षणाचे धडे गिरवले होते.

सीएए-एनआरसी विरोधात आजपासून ‘गांधी यात्रा’; यशवंत, शत्रुघ्न सिन्हा करणार नेतृत्व :
  • सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा ‘गांधी शांती यात्रा’ काढणार आहेत. आजपासून (गुरुवार) या यात्रेला सुरुवात होणार असून मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून ही यात्रा सुरू होणार असून अनेक राज्यांमधून मार्गक्रमण करीत ती पुढे दिल्ली येथे संपणार आहे.

  • सरकारने संसदेत एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी या गांधी शांती यात्रेद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा येथून जात ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी राजघाटावर ही यात्रा संपणार आहे.

  • भाजपा सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी नुकतीच मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली होती. दिल्लीच्या जामिया मिल्लिया इम्लामिया विद्यापीठाच्या भेटीदरम्यान सिन्हा म्हणाले होते, केंद्र सरकारने काश्मीरला देशातील इतर राज्यांप्रमाणे बनवण्याचा दावा केला होता. मात्र, परिस्थिती अशी बनली आहे की, आता संपूर्ण देशच काश्मीर बनला आहे.

नागरिकत्व कायद्यावरील हस्तांतर याचिकेवर उद्या सुनावणी : 
  • नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका विविध उच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. त्या एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर १० जानेवारीला सुनावणी करण्यात येणार आहे.

  • न्या.बी.आर गवई व न्या. सूर्यकांत यांनी सांगितले की, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्यावर निकालात जर काही मतभेद झाले तर  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करावी असे आमचे सकृतदर्शनी मत आहे.

  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले, की उच्च न्यायालयांची मते यात वेगवेगळी असू शकतात व वकिलांना त्यावरील सुनावणीसाठी वेगवेगळ्या न्यायालयात उपस्थित रहावे लागेल.

भारताने शांततेसाठी मध्यस्थी करावी, इराणने व्यक्त केली अपेक्षा : 
  • कासिम सुलेमानीच्या मृत्यूनंतर अमेरिकेबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला तर, आम्ही त्याचे निश्चित स्वागत करु असे इराणच्या भारतातील राजदूताने म्हटले आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर काही तासांनी इराणच्या भारतातील राजदूताने हे विधान केले.

  • “जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने नेहमीच चांगली भूमिका बजावली आहे. भारतही या प्रदेशामध्ये आहे. अमेरिकेबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सर्वच देशांनी खासकरुन भारताने पुढाकार घेतला तर आम्ही त्याचे स्वागतच करु” असे इराणचे भारतातील राजदूत अली चीगीनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इराणच्या दिल्लीतील दूतावासामध्ये आज कासिम सुलेमानी यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अली चीगीनी माध्यमांशी बोलत होते.

  • “आम्हाला युद्ध नको आहे, या प्रदेशात सर्वांसाठी शांतता आणि समृद्धी हवी आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने काही पाऊल उचलले तर निश्चित आम्ही त्याचे स्वागत करु” असे इराणचे भारतातील राजदूत म्हणाले. इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्याचे त्यांनी समर्थन केले. हा आम्ही स्वसंरक्षणार्थ केलेला हल्ला होता असा दावा त्यांनी केला.

०९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.