चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ ऑक्टोबर २०१९

Date : 9 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीरियातून सैन्य माघारी घेण्याच्या कृतीचे ट्रम्प यांच्याकडून समर्थन :
  • वॉशिंग्टन : सीरियाच्या उत्तरेकडील भागात तुर्कीच्या नियोजित कारवाईपूर्वी त्या भागातून सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. अमेरिका म्हणजे पोलीस दल नाही आणि अमेरिका निरंतर युद्ध लढणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र ट्रम्प यांचा हा निर्णय कुर्द यांच्याशी प्रतारणा करणारा असल्याची टीका रिपब्लिकनांनी केली आहे.

  • सीरियाच्या उत्तरेकडील सीमेवरून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याची घोषणा व्हाइट हाऊसमधून करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम कुर्द एकाकी पडण्यावर होणार आहे, कारण आयसिसविरुद्धच्या लढय़ात कुर्द हा अमेरिकेचा मुख्य घटक आहे.

  • सीरियातून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयामुळे अमेरिका रोमांचित झाली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आम्हाला आमचे सैन्य मागे घ्यावयाचे आहे, आता खूप वर्षे झाली आहेत, अनेक दशके लोटली आहेत, त्यामुळे आम्हाला आमचे सैन्य माघारी घ्यावयाचे आहे, या घोषणेवरच आपण निवडून आलो, आपले भाषण तपासून पाहा, आम्हाला या निरंतर युद्धातून सैन्य मागे घ्यावयाचे आहे, असे ट्रम्प यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

‘भारत-चीनने वादांवर संवादातून तोडगा काढावा’ :
  • नवी दिल्ली : भारत आणि चीन यांनी संवादातून प्रश्न सोडवून सीमेवर शांतता आणि स्थर्य कायम राखावे, असे मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.

  • चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग ११ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर वेईडोंग यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत द्विपक्षीय संबंधांना स्पर्श करणाऱ्या अनेक मुद्यांवर भाष्य केले.

  • शेजारी देशांमध्ये अनेक मुद्यांवर वाद असणे साहजिक आहे. भारत आणि चीन यांनी याआधी प्रादेशिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवले आहेत. सीमावादामुळे द्विपक्षीय संबंध बिघडू नये, याची काळजी उभय देशांनी घ्यायला हवी, असे वेईडोंग म्हणाले. दरम्यान, दुसऱ्या भारत-चीन  प्रस्तावित शिखर परिषदेची अनिश्चितता मंगळवारी संपुष्टात आली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग हे ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि चीन बुधवारी या भेटीची अधिकृत घोषणा करणार आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांद्वारे चीनने भारताला ही माहिती कळविली आहे.  

  • जम्मू-काश्मीरबद्दल चीनची भूमिका स्पष्ट आणि कायम असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या प्रश्नावर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे. चीनही तेथील जनतेला न्याय मिळण्यासाठी काम करीत आहे, असे चीनचे पाकिस्तानमधील राजदूत याओ जिंग यांनी म्हटले होते. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर चर्चा करावी असे आवाहन आम्ही भारत आणि पाकिस्ताला केले असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी मंगळवारी सांगितले. चीनचे पाकिस्तानमधील राजदूत जिंग यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केल्याबद्दल भारताने शनिवारी राजनैतिक मार्गाने निषेध नोंदवला होता.

पंतप्रधान मोदी यांनी केले १०७ फुटी रावणाचे दहन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विजयादशमी निमित्त दिल्लीतील द्वारका येथील रामलीला मैदानावर आयोजित रावण दहन कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी मोदी यांच्या हस्ते १०७ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कार्यक्रमास दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह भाजपा नेत्यांची उपस्थिती होती.

  • याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमास जमलेल्या हजारो नागिरकांना संबोधित देखील केले. ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत मोदी यांनी भाषणाची सुरूवात केली व म्हणाले की, भारत म्हणजे उत्सवांची भूमी आहे. भारतात प्रत्येक दिवशी उत्सव असतो. वर्षभरात कदाचित एखादा दिवस असेल त्या दिवशी आपण उत्सव साजरा करत नाही. उत्सव आपल्याला जोडतात आपल्यात उत्साह निर्माण करतात, हे आपल्या नसानसांत भिनलेले आहेत. ते आपल्या संस्कार, शिक्षण व सामाजिक जीवनाचे घटक आहेत.

  • यावेळी मोदी म्हणाले की, उत्सव आपल्या सामाजिक जीवनासाठी प्राण तत्त्व आहे.  आईचा, मुलीचा सन्मान, गौरव आणि तिची प्रतिष्ठा जपण्याचे, तिचे संरक्षण करण्यासाठी संकल्प करणे ही आपली जबाबदारी आहे. यंदाच्या दिवाळीत सामूदायिक कार्यक्रमाचे आयोजन करून ज्या मुलींनी जीवनात काही मिळवले आहे, ज्यांच्याद्वारे इतरांना प्रेरणा मिळते त्यांचा सन्मान केला जावा. या दिवाळीत हेच आपले लक्ष्मीपूजन असायला हवे.

सरकार उभारणार १ हजार ४०० किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया :
  • केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे. ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे. वातावरणातील बदलांशी सामना करण्यासाठी आफ्रिकेत अशी भिंत उभारण्यात आली आहे. याला ‘ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असंही म्हटलं जातं.

  • सध्या हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी याकडे एक उदाहरण म्हणून पाहता येऊ शकते. थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्लीपर्यंत परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

  • ग्रीन वॉल ऑफ इंडियामुळे पश्चिम भारत आणि पाकिस्तानातील वाळवंटातून दिल्लीपर्यंत येणारी धूळही रोखण्यात मदत मिळणार आहे. भारतातील कमी होणारा हरित पट्टा आणि वाढतं वाळवंट रोखण्यासाठी ही कल्पना संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्समधून मिळाली आहे. सध्या ही कल्पना प्राथमिक टप्प्यात असून अद्याप ती मंजुरीपर्यंतदेखील पोहोचली नसल्याचं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. आफ्रिकेतील ग्रेट ग्रीन वॉलवर एका दशकापूर्वी काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु अनेक देशांचा सहभाग आणि त्यांच्या निरनिराळ्या कार्यप्रणालींमुळे अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही. भारत सरकार आपली ही कल्पना 2030 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काम करत आहे. या अंतर्गत 26 दशलक्ष हेक्टर जमिन प्रदूषणमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

दिनविशेष :
  • जागतिक पोस्ट दिन

महत्वाच्या घटना 

  • १४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.

  • १४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.

  • १८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९६२: युगांडा  देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली

जन्म 

  • १७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)

  • १८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९१९)

  • १८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७)

  • १८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९२८)

  • १८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)

  • १९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २००१)

  • १९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)

  • १९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म.

  • १९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

  • १९१४: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)

  • १९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)

  • १९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)

  • १९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.

  • १९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.

  • २०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)

  • २००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)

  • २०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.