चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० फेब्रुवारी २०२०

Date : 10 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनमध्ये करोनाचे ८१३ बळी : 
  • चीनमध्ये नवीन करोना विषाणूने शनिवारी ९१ बळी घेतले असून मृतांची एकूण संख्या ८१३ झाली आहे, तर एकूण ३७ हजार निश्चित रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली.

  • शनिवारी एकूण ९१ लोकांचा चीनमध्ये मृत्यू झाला. दिवसभरात २६५६ नवीन रुग्ण निश्चित झाले आहेत. एकूण ३१ प्रांतात ३७,१९८ इतके निश्चित रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. शनिवारच्या ८९ मृत्यूंपैकी ८१ हुबेई प्रांतात झाले असून तेच करोनाचे मूळ केंद्र आहे. हेनानमध्ये दोन, हेबेइ, हेलाँगजियांग, अनहुई, शांगडाँग, हुनान, ग्वाग्झी झुआंग येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. शनिवारी ६०० रुग्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. हुबेई प्रांतात ३२४ जणांना उपचारांनंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले.

  • हुबेईत एकूण २७,१०० निश्चित रुग्ण असून त्यातील ५२४७ गंभीर आहेत. संपूर्ण चीनमध्ये २८,९४२ संशयित रुग्ण असून ६१८८ रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. शनिवारी हाँगकाँगमध्ये २६ निश्चित रुग्ण सापडले असून हाँगकाँगमध्ये एकाचा मृत्यू झाला. मकावमध्ये १० तर तैवानमध्ये १७ निश्चित रुग्ण आहेत.

  • मकावमधून एक व तैवानमधून एका रुग्णाला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. शनिवारी एक अमेरिकी महिला व जपानी पुरुष हे चीनमधील नवीन करोना विषाणूने मरण पावले. वुहान येथे ६१ वर्षांच्या अमेरिकी नागरिकाचा मृत्यू झाला. परदेशातून चीनमध्ये आलेल्या १९ परदेशी नागरिकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यापैकी दोघांना उपचारानंतर सोडण्यात आले. एका जपानी नागरिकाचा वुहान येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला.

दिल्लीतील मतदान आकडेवारी विलंबाबद्दल आयोगावर टीकास्त्र : 
  • नवी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत शनिवारी ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे अखेर रविवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले. मात्र ही आकडेवारी जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल आम आदमी पक्षाने आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. मतदान केंद्राधिकारी आकडेवारी अचूक राहावी यासाठी रात्रभर तपशिलांची छाननी करत होते. यात काही वेगळे असे नाही, असे स्पष्टीकरण दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी दिले आहे.

  • २०१५ च्या निवडणुकीत दिल्लीत ६७.४७ टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी देण्यास निवडणूक आयोगास विलंब लागल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली होती. निवडणूक आयोग काय भाजप कार्यालयाकडून परवानगीची वाट पाहात आहे काय? असा सवाल त्यांनी केला होता. 

  • भाजप कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी मिळाली नाही काय, अशा शब्दात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी या विलंबावर टीकास्त्र सोडले होते. गोपनीय पद्धतीने काही तरी शिजत आहे, असा आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी  केला होता.

‘पाच लाख कोटी डॉलर्सच्या उद्दिष्टासाठी अर्थसंकल्पात पुरेशा उपाययोजना’ : 
  • अर्थसंकल्पात वस्तूंचा खप वाढण्यासाठी उपाययोजना केल्या असून पायाभूत प्रकल्पात सरकारी गुंतवणूक वाढवण्यात आली आहे, त्यामुळे २०२४-२०२५ पर्यंत भारत ५ लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करील असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. वस्तू व सेवा कर दरांचे सुसूत्रीकरण दर तीन महिन्याला न करता ते वर्षांतून एकदाच करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.

  • वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, खप, भांडवली खर्च व सरकारी गुंतवणूक हे तीनही वाढवून आम्ही अर्थसंकल्पात महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. पायाभूत सुविधांवर यात सरकारी खर्च वाढवण्यात येईल. त्याचे दीर्घ व लघुकालीन परिणाम लगेच दिसून येतील. ग्रामीण भागाची स्थिती सुधारण्यासाठी १६ मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था २०२४-२५ पर्यंत गाठता येईल.

  • पश्चिम बंगालला या अर्थसंकल्पातून काय दिले असे विचारले असता त्या म्हणाल्या की, या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हेच मला कळत नाही. कुठल्या राज्याला काय मिळाले हे मी सांगू शकत नाही. अर्थसंकल्पात आम्ही स्थूल आर्थिक  स्थिरतेचा विचार केला आहे. देशात मालमत्ता निर्माण करणे तसेच प्राप्ती कराचे दर कमी करणे यामुळे पैसा थेट लोकांच्या हातात जाईल असे वाटते. देशातील विविध राज्यांत होणाऱ्या प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात केलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संघाचे प्रचारक परमेश्वरन यांचे निधन : 
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व भारतीय जनसंघाचे माजी नेते पी. परमेश्वरन यांचे (वय ९३) रविवारी पहाटे  निधन झाले.

  • भारतीय विचार केंद्रमचे ते संस्थापक संचालक होते. केरळच्या पालक्काड जिल्ह्य़ात ओट्टापालम येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत जनसंघात काम केले होते. त्यांना २०१८ मध्ये पद्मविभूषण उपाधीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

  • २००४ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले होते. परमेश्वरन हे उत्तम लेखक, कवी, संशोधक व संघाचे विचारवंत होते. १९७७ ते १९८२ या काळात दीनदयाळ संशोधन संस्थेचे संचालक होते. आलप्पुळा जिल्ह्य़ात मुहम्मा येथे त्यांचा जन्म झाला. विद्यार्थिदशेतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. त्यांचे पार्थिव कोची येथे संघाच्या मुख्यालयात आणण्यात आले, तेथे लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुहम्मा येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • आणीबाणीत त्यांना १६ महिने तुरुंगवास झाला होता. परमेश्वरन यांनी १९८२ मध्ये केरळात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी भारतीय विचार केंद्रम या संस्थेची स्थापना केली होती.

१० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.