चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जानेवारी २०२०

Date : 10 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रासमोर विजेतेपद टिकवण्याचे आव्हान : 
  • गुवाहाटी : देशात क्रीडासंस्कृती निर्माण करणे, तळागाळातील गुणवत्ता शोधून काढणे तसेच युवा पिढीमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीचे महत्त्व वाढवणे, या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला गुवाहाटीत शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी यजमानपद भूषवणाऱ्या महाराष्ट्राने तब्बल २२८ पदकांची कमाई करत पदकतालिकेत अग्रस्थान पटकावले होते. आता हेच सांघिक विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान महाराष्ट्राच्या संघासमोर असेल. महाराष्ट्रासमोर हरियाणा, दिल्ली आणि आसामचा अडथळा असेल.

  • १० ते २२ जानेवारीपर्यंत १७ आणि २१ वर्षांखालील वयोगटांत रंगणाऱ्या या स्पर्धेत ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल ६८०० पेक्षा जास्त खेळाडू २० खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील. महाराष्ट्रानेही २० पैकी १९ प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल ७५१ खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे.

  • पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करणारे महाराष्ट्राचे सर्व खेळाडू विमानाने आसामला पोहोचले आहेत. यजमान आसामनेही विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी कंबर कसली असून ६५६ खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. हरियाणानेही यंदा ६८२ खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. दादरा नगर हवेलीने फक्त तीन खेळाडूंचा चमू पाठवला असून त्यात एक १०० मीटर धावपटू आणि दोन टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश आहे.

जगातील सर्वात उंचीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू : 
  • जम्मू : पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.

  • हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.

  • ‘रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. काश्मीरला रेल्वेमार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल’, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी बुधवारी रात्री येथे पत्रकारांना सांगितले.

  • या पुलाचे बांधकाम म्हणजे स्वातंत्र्यानंतर हाती घेण्यात आलेल्या काश्मीर रेल लिंक प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहे. बांधून पूर्ण झाल्यानतंर तो अभियांत्रिकीतील चमत्कार ठरेल, असे गुप्ता म्हणाले.

  • अतिशय खडतर अशा भूप्रदेशात उभारल्या जाणाऱ्या कमानीच्या आकारातील या प्रचंड पुलाच्या बांधकामासाठी ५,४६२ टन लोखंड वापरण्यात आले असून, तो नदीच्या पात्रापेक्षा ३५९ मीटर उंचीवर राहणार आहे. ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देता येईल अशी त्याची रचना आहे. ‘अभियांत्रिकी चमत्कार’ ठरणारा १.३१५ किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल (कटरा) व कौरी (श्रीनगर) यांना जोडणार आहे.

नवीन वर्षांतील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज : 
  • नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण शुक्रवार, १० जानेवारी रोजी होणार आहे. या वेळी हे चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे चंद्रग्रहण मध्यरात्री २.४२ वाजता विशेष चष्म्याऐवजी उघडय़ा डोळ्यांनीदेखील पाहू शकता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून पाहायला मिळणार आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी रात्री १०.३८ वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर, १२.४० वाजता ८९ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. या वेळी मध्यरात्री २.४२ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली. या वेळी पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी होणार असल्यामुळे हे चंद्रग्रहण उघडय़ा डोळ्यांनी पाहता येऊ शकेल असेदेखील त्यांनी सांगितले.

  • या चंद्रग्रहणाला ‘वोल्फ मून एकल्प्सि’ असे म्हणतात. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथेही दिसेल. यावर्षीचे हे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण असून यावर्षीचे चारही चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असतील.

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा होणार १५ हजार रुपये, आंध्रप्रदेश सरकारची घोषणा : 
  • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या महिलांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

  • जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

  • राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात यासंबंधी आदेश जारी करत ४३ लाख मातांसाठी आर्थिक मदत मंजूर करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत महिला ज्यांचं मुल सध्या शाळेत (पहिली ते बारावी) शिकत आहेत, मग ती खासगी शाळा असो किंवा सरकारी, अनुदानित असो किंवा विनाअनुदानित ते या योजनेसाठी पात्र आहेत.

अमेरिकेच्या संसदेने घटवली ट्रम्प यांची ताकद; घेऊ शकणार नाहीत युद्धाचा निर्णय : 
  • इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना इराणवर पलटवार करण्याची खुली मुभा मिळणार नाही.

  • डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी आपले बहुमत असलेल्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव १९४ मतांच्या बहुमतानं मंजूर करण्यात आला. यानंतर आता तो संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.

  • डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी संसदेला माहिती दिल्याशिवाय इराकमध्ये इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ल्याची परवानगी दिली होती. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या खासदारांना पत्र लिहून राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य कारवायांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

१० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.