चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० ऑक्टोबर २०१९

Date : 10 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पीएम- किसान योजनेशी आधार जोडणीला ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ :
  • नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रबी पेरणी हंगामापूर्वी शेतकी साहित्य खरेदी करण्याकरता ६ हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी आधार जोडणीकरिता असलेली मुदत सरकारने ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी याबाबतचा निर्णय घेतला.

  • पीएम- किसान योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी १४ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची रक्कम ३ समान हप्त्यांमध्ये देत असते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.

  • १ ऑगस्ट २०१९ नंतर या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आधारची जोडणी अनिवार्य करण्यात आली होती. तथापि, आसाम, मेघालय व जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांना मार्च २०२० पर्यंत त्यातून सूट देण्यात आली होती. आधार जोडणीबाबत अनिवार्यतेच्या अटीला वेळ गागत होता आणि त्यामुळे हा निकष आम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिल केला आहे, असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. यामुळे, अद्याप आधारची जोडणी न करू शकलेल्या मोठय़ा संख्येतील शेतकऱ्यांना या रकमेचा तत्काळ लाभ मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

  • पीएम- किसान योजनेंतर्गत सुमारे १४ कोटी शेतकऱ्यांना ८७ हजार कोटी रुपये मिळणार असल्याने ही अद्वितीय योजना आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले.

जागतिक मंदीचे भारतात पडसाद :
  • वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठय़ा उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीसदृश स्थितीचे परिणाम दिसू लागल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिएव्हा यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या वर्षांत मंदीची झळ भारताला अधिक सोसावी लागण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

  • जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीसदृश स्थितीतून वाटचाल करीत असून त्यामुळे जगातील नव्वद टक्के देशांचा आर्थिक विकास दर कमी होणार असल्याचा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, जगात सध्या मंदीसदृश स्थिती असून या वर्षी आर्थिक विकास दर हा दशकाच्या आरंभापासून प्रथमच सर्वात कमी असेल. जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल पुढील आठवडय़ात जारी केला जाणार असून त्यात २०१९ व २०२० या वर्षांचा सुधारित अंदाज दिला जाणार आहे.

  • शुक्रवारी भारताच्या रिझव्‍‌र्ह बँकेने असे म्हटले होते की, आर्थिक विकास दर सध्याचे मंदीसदृश वातावरण बघता ६.९ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजाइतका राहणार नाही तर तो ६.१ टक्के राहू शकतो. नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, पतधोरणाचा वापर हुशारीने करण्याची गरज असून आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट :
  • नवी दिल्ली : सरकारने दिवाळी-भेट दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे.

  • केंद्राच्या महागाई भत्त्यातील पाच टक्के वाढीचा लाभ ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारी तिजोरीवर १५,९०९.३५ कोटींचा बोजा पडणार आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा आल्याने बाजारातील मागणीला चालना मिळेल, असे मानले जाते.

  • सध्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला असून, बाजारातील मागणी कमी झाली आहे. त्यातून निर्माण झालेल्या दुष्टचक्रामुळे लोकांच्या हाती पैसा खेळण्याचे प्रमाणही कमी झाले असून, विविध क्षेत्रांमधील उत्पादनातही घट झालेली आहे. केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिवाळीत मध्यमवर्गीय कुटुंबांकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत असते. बोनस आणि इतर माध्यमांतून त्यांच्याकडे आलेल्या पैशांतून खरेदी होत असल्याने सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील मागणीही वाढेल, असा अंदाज आहे.

चीन-पाकच्या काश्मीरवरील चर्चेवर भारताचा आक्षेप :
  • चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे भारतासह चीनने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच काश्मीरच्या मुद्यावरून उभय देशांदरम्यान तणावाचे चित्र निर्माण झाले. जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने भारताने त्यास आक्षेप घेतला.

  • ‘‘चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे माध्यमांतील वृत्तांद्वारे कळले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भारताची स्पष्ट भूमिका आहे. चीनलाही भारताची ही भूमिका ज्ञात आहे. त्यामुळे भारताच्या अंतर्गत विषयांवर इतर कोणत्याही देशाने विधान करणे योग्य नाही’’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

  • चीन आणि पाकिस्तानने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख आला आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आपली भूमिका, चिंता याबाबत पाकिस्तानने चीनला माहिती दिली असून, काश्मीरमधील परिस्थितीकडे चीनचे लक्ष असल्याचे चीनने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील संबंधित ठराव, द्विपक्षीय करार आदींच्या आधारे काश्मीरप्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवावा, असे चीनने नमूद केले’, असे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा हे चीन दौऱ्यावर असून, चीन आणि पाकिस्तानने काश्मीरचा उल्लेख केल्याने भारताने नाराजी व्यक्त केली.

'जिओ' वापरकर्त्यांनो...फुकट कॉल विसरा, अन्य नेटवर्कसाठी मिनिटाला ६ पैसे मोजा :
  • मुंबई: 'जिओ'द्वारे लागू करण्यात येणरे हे शुल्क 'जिओ' ते 'जिओ' कॉल केल्यास, 'जिओ' ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा 'जिओ'च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल. याशिवाय, 'जिओ'च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. दरम्यानस 'जिओ'वर येणारे (इनकमिंग) कॉल मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत असतील.

  • २०१७मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)द्वारे प्रतिस्पर्धी नेटवर्क कंपन्यांच्या क्रमांकावर कॉल झाल्यास संबंधित कंपनीला सेवा पुरवठादार कंपनीनं ६ पैसे प्रति मिनिट शुल्क देण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे आधी १४ पैसे प्रति मिनिट हा दर त्यावेळी ६ पैसे प्रति मिनिट करण्यात आला. जानेवारी २०२०पर्यंतच हे शुल्क लागू होते. त्यामुळे 'जिओ'नेही आतापर्यंत आपल्या ग्राहकांवर हे शुल्क लागू केले नाही. त्यापोटी, 'जिओ'नं आतापर्यंत भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आदी कंपन्यांना १३५०० कोटी रूपये दिले. मात्र, 'ट्राय'द्वारे हे शुल्क कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं 'जिओ'नं आता ही जबाबदारी ग्राहकांवर टाकली आहे. या शुल्काला इंटरकनेक्ट युसेज चार्ज अथवा IUC म्हणून ओळखलं जातं.

  • 'जिओ'च्या या निर्णयामुळे बाजारात 'जिओ' आल्यापासून पहिल्यांदाच 'जिओ' ग्राहकांना यापुढे केल्या जाणाऱ्या कॉलिंगचे पैसे भरावे लागणार आहेत. पुढील बुधवारपासून हे बदल लागू होतील. 'जिओ'चे भारतात ३५ कोटी ग्राहक आहेत.

दिनविशेष :
  • जागतिक मानसिक आरोग्य दिन / जागतिक लापशी दिन / जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

  • १९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.

  • १९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.

  • १९४२: सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.

  • १९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.

  • १९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९७०: फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

  • १९७५: पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.

  • १९९८: आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.

जन्म 

  • १७३१: हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)

  • १८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.

  • १८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.

  • १८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)

  • १८७७: मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म.  (मृत्यू: २२ ऑगस्ट १९६३)

  • १८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)

  • १९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)

  • १९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)

  • १९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)

  • १९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.

  • १९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)

  • १९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.

  • १९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)

  • १९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.

  • १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)

  • १९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.

  • २०००: श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)

  • २००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.

  • २००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)

  • २००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)

  • २०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.