चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 11, 2019 | Category : Current Affairsऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न : 
 • गेल्या तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये (२००८, २०१२ आणि २०१६) रायफल नेमबाजी प्रकारात मला भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही; परंतु २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे माझे स्वप्न आहे, असे मत भारताची नेमबाज तेजस्विनी सावंतने व्यक्त केले आहे.

 • तेजस्विनीने दोहा येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ११७१ गुण प्राप्त करून ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी १२वे स्थान निश्चित केले. या पार्श्वभूमीवर तेजस्विनीशी केलेली खास बातचीत

 • ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केल्याने मी खूप आनंदी आहे. मेहनतीचे फळ अखेर मिळाले आहे. या कामगिरीमध्ये माझे प्रशिक्षक, फिजिओ आणि माझ्या परिवारातील सदस्यांचा मोलाचा वाटा आहे.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन :
 • निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे रविवारी रात्री ९.३० वाजता चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

 • मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची १२ डिसेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली.

 • आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करून त्यांनी राजकारण्यांमध्ये निवडणूक आयोगाचा धाक निर्माण केला. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सुधारण घडवून आणल्या. त्यांच्या आधी त्यांच्याएवढे धाडस क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले असेल. ते निवृत्त झाल्यानंतर आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचा कित्ता गिरवला. निवडणूक आयोग ही लोकशाहीतील महत्त्वाची स्वायत्त संस्था असून ती राजकीय हस्तक्षेपापलिकडे असते, याची जाणीव शेषन यांच्या कार्यपद्धतीमुळेच  नागरिकांना प्रथमच प्रकर्षांने झाली.

अयोध्याविषयक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाढीव सुरक्षा :
 • अत्यंत संवेदनशील अशा राम जन्मभूमी- बाबरी मशीद जमीन वादाचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांसाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी, अडथळे (बॅरिकेड्स) आणि फिरते संरक्षक दल यांचा समावेश करून त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

 • सुमारे शतकभर जुन्या अयोध्या वादात सरन्यायाधीश रंजन गोगोई, भावी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण व एस. अब्दुल नझीर या न्यायाधीशांनी शनिवारी निकाल जाहीर केल्यानंतर ही वाढीव सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

 • खबरदारीचा उपाय म्हणून माननीय न्यायाधीशांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तथापि, यापैकी कुणाही न्यायाधीशाला विशिष्ट असा धोका नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 • या सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून, न्यायाधीशांच्या निवासस्थानी अतिरिक्त बळ तैनात करण्यात आले असून, त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले आहेत. यापूर्वी या न्यायाधीशांच्या घरी सुरक्षारक्षक तैनात होते आणि स्थिर सुरक्षा व्यवस्था अमलात होती. आता फिरते संरक्षक दल देण्यात आले असून, सशस्त्र रक्षकांसह संरक्षक वाहन (एस्कॉर्ट व्हेईकल) न्यायाधीशांच्या वाहनासोबत राहील. ही सर्व व्यवस्था केवळ खबरदारीचे पाऊल म्हणून आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भारतीयांच्या वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील पैसा सरकारजमा : 
 • स्विस बँकेतील भारतीयांची अनेक खाती ही वापरात नसून त्यातील पडून असलेला पैसा आता स्वित्र्झलड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे. स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी २०१५ मध्ये जाहीर केली होती.

 • या खात्यांवर कुणीही दावा केलेला नाही. या खात्यांबाबत पुरावे देऊन ती चालू करण्याचा प्रस्ताव बँकेने दिला होता. त्यातील किमान १० खाती भारतीयांशी संबंधित आहेत. भारतीय निवासी, नागरिक, यांची ही खाती असून त्यातील काही ब्रिटिश काळातील आहेत. या दहाही खात्यांपैकी एकावरही कुणी सहा वर्षांत दावा केलेला नाही, असे स्विस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या खात्यांवर दावा करण्याचा कालावधी पुढील महिन्यात संपत आहे.

 • काही खात्यांवर २०२० अखेपर्यंत दावा करता येणार आहे. काही बंद पडलेली खाती पाकिस्तानातील लोकांची होती, त्यांनी मात्र दावे केले आहेत. स्वित्र्झलड व इतर काही देशांतील  लोकांचीही अशी खाती होती. त्यावरही दावे सांगण्यात आले होते.

 • बंद पडलेल्या खात्यांची संख्या २६०० असून त्यांची यादी डिसेंबर २०१५ मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यात ४५ दशलक्ष स्विस फ्रँक म्हणजे ३०० कोटी रुपयांची रक्कम असून १९५५ पासून या रकमेवर कुणीही दावा केलेला नाही. या बेवारस खात्यांमध्ये दरवर्षी भर पडत आहे. आतापर्यंत ३५०० खाती बंद व बेवारस आहेत. 

मशिदीसाठी जागा स्वीकारण्याबाबत सुन्नी बोर्डाचा २६ नोव्हेंबरला निर्णय : 
 • अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा स्वीकारायची की नाही, याबाबतचा निर्णय २६ नोव्हेंबरला होणाऱ्या आपल्या बैठकीत घेतला जाईल, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने रविवारी सांगितले.

 • सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निकालानुसार अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतानाच, मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा द्यावी, असे निर्देश केंद्र सरकारला दिले होते.

 • ही जमीन स्वीकारायची की नाही याबाबत आपल्याकडे वेगवेगळी मते येत असल्याचे उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झफर फारुकी यांनी पीटीआयला सांगितले. मंडळाची आमसभा २६ नोव्हेंबरला होणे अपेक्षित असून, न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार ५ एकर जागा स्वीकारायची की नाही याचा निर्णय त्यात घेतला जाईल, असे ते म्हणाले.

दिनविशेष :
 • राष्ट्रीय शिक्षण दिन

महत्वाच्या घटना 

 • १९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

 • १९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

 • १९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

 • १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

 • १९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.

 • १९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

 • १९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

 • २००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

जन्म 

 • १८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)

 • १८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू:४ जानेवारी १९०८ – मुंबई)

 • १८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)

 • १८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

 • १९११: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)

 • १९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९९४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

 • १९९९: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

 • २००४: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)

 • २००५: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.  (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)

 • २००५: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)