चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ ऑक्टोबर २०१९

Date : 11 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक महिला  बॉक्सिंग स्पर्धा : मेरीचे आठवे जागतिक पदक :
  • उलान-उदे (रशिया) : सहा वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणारी एम. सी. मेरी कोम (५१ किलो) हिने गुरुवारी आपल्या शिरपेचात मानाचा आणखी तुरा रोवला. महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी बॉक्सर म्हणून मेरी कोमने नावलौकिक मिळवला आहे. उपांत्य फेरीत धडक मारत मेरी कोमने आपले आठवे पदक निश्चित केले.

  • मेरी कोमसह सहावी मानांकित मंजू राणी (४८ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि गेल्या वेळची कांस्यपदक विजेती तिसरी मानांकित लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांनीही उपांत्य फेरी गाठत भारताचे किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.

  • तिसऱ्या मानांकित मेरी कोमने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या व्हॅलेंसिया विक्टोरिया हिचा ५-० असा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवून अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवले. जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मंजू राणीने गेल्या वेळच्या कांस्यपदक विजेत्या आणि अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या किम यांग मि हिला ४-१ असा पराभवाचा धक्का दिला. जमुना बोरो हिने जर्मनीच्या उरसुला गोट्टलेब हिच्यावर ४-१ अशी सरशी साधली. लव्हलिनाने पोलंडच्या सहाव्या मानांकित कॅरोलिना कोझेवस्का हिच्यावर ४-१ अशी विजयश्री खेचून आणली. दोन वेळा कांस्यपदक पटकावणाऱ्या कविता चहल (८१ किलोवरील) हिला मात्र बेलारूसच्या कॅटसिरायना कावालेव्हा हिच्याकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला.

  • शनिवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीत मेरी कोमला तुर्कीच्या दुसऱ्या मानांकित बुसेनाझ कॅकीरोग्लू हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कॅकीरोग्लू ही युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेची विजेती तसेच युरोपियन क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती असल्यामुळे या सामन्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कॅकीरोग्लूने चीनच्या काय झोंगजू हिला पराभूत केले. राणीला थायलंडच्या चुथामाट रक्षत हिच्याशी लढत द्यावी लागेल. जमुना बोरोचा सामना माजी आशियाई कांस्यपदक विजेती हुआंग सिआओ-वेन हिच्याशी होईल. लव्हलिनाला चीनच्या यांग लिऊ हिच्याशी दोन हात करावे लागतील.

राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची साडेसहाशे पदे रिक्त :
  • अमरावती : राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत शल्यचिकित्सक, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन्स आणि बालरोगतज्ज्ञ या विशेष सेवा देणाऱ्या (स्पेशालिटी) डॉक्टरांची एकूण ६४३ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. या रिक्त जागा भरण्याचे शासनाचे आश्वासन हवेतच विरले असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचल्याचा शासनाचा दावा पोकळ ठरत आहे.

  • राज्यात २३ जिल्हा रुग्णालये, ८५ उपजिल्हा रुग्णालये, ११ स्त्री रुग्णालये, एक अस्थिरोग रुग्णालय, ३६३ ग्रामीण रुग्णालये, ६८ ट्रॉमा केअर युनिट, ३ विभागीय संदर्भ रुग्णालये व १८११ प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा एकूण २ हजार ३६४ शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जाते. विशेष तज्ज्ञांच्याच जागा रिक्त असल्याने आरोग्य सेवा देण्याचा उद्देश पूर्ण होत नाही. विशेषज्ञांची एकूण १५९७ पदे मंजूर असून त्यापैकी ९४५ पदे भरलेली आहेत आणि ६४३ पदे रिक्त आहेत.

  • जागा रिक्त असल्याने कामावरील डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यामुळेही योग्य आरोग्य सेवा देण्यास ही रुग्णालये कमी पडत आहेत. शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांना तुटपुंजे वेतन मिळत असल्याने येथे येण्यास विशेषज्ञ तयार होत नाहीत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे वेतन वाढवावे व अन्य सुविधा द्याव्यात, अशी डॉक्टरांची मागणी आहे.

  • ग्रामीण आणि शहरांमधील सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयांमधून आरोग्य सेवा दिली जाते. गेल्या काही वर्षांपासून सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची संख्या कमी झाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे सरकारी रुग्णालयांमधून वेळेत उपचार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणचा कार्यभार प्रभारी आणि ज्युनियर डॉक्टरांवरच आहे.

  • राज्यात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मिळून ७२ हजार मंजूर पदे आहेत. त्यातील २० हजार ३६० पदे रिक्त आहेत. यामध्ये ७५७० डॉक्टरांच्या पदांचा समावेश असून महत्त्वाची बाब म्हणजे ६४३ विशेषज्ञ डॉक्टरांची पदेच भरलेली नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘सर्जिकल स्ट्राईकला मोदी गेले होते की सैनिक' : 
  • “पुलावामामध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘घर में घूस के मारूंगा…’ असं म्हणायचे. परंतु दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वत: घुसले होते का ?” असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील प्रचारसभेत ते बोलत होते.

  • “त्यावेळी देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारबरोबर होते. सर्व मतभेद बाजूला ठेवून सरकारने बोलावलेल्या बैठकीत मी स्वत: उपस्थित होतो. परंतु लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्याच्या शौर्याचं राजकीय भांडवल केलं,” असं पवार यावेळी म्हणाले.

  • “लढाई ही सैन्यानं लढली. परंतु मोदी यांनी निवडणुकीत पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकचा पुरेपूर फायदा करून घेतला,” असा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम ३७० वरही भाष्य केलं.

  • “कलम ३७० हटवण्याला कोणाचाही विरोध नव्हता. परंतु काही विरोधकांनी ते कलम हटवण्यापूर्वी तेथील लोकांना विश्वासात घ्यावं, तसंच संसदेच्या संयुक्त समितीकडे हा विषय पाठवून त्यावर चर्चा करण्यास सांगितलं होतं. परंतु त्यांच्यावर देशद्रोही असल्याची टीका करण्यात आली. तसंच कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीबाबत लिहिणाऱ्यांनाही देशद्रोही ठरवण्यात आलं,” असं पवार म्हणाले.

ओल्गा तोकार्झूक आणि पिटर हँडके यांना साहित्यातला नोबेल जाहीर :
  • पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकार्झूक यांना २०१८ सालचा तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना २०१९ चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी या पुरस्काराला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे २०१८चा पुरस्कार या वर्षी जाहीर करण्यात आला आहे.

  • ५७ वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी व्यक्ती आहेत. त्या आपल्या पिढीतील व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. २०१८मध्ये त्यांना ‘फ्लाईट्स’ या आपल्या कांदबरीसाठी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजने गौरविण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.

  • तर ऑस्ट्रिअन कादंबरीकार आणि अनुवादक पीटर हँडके (वय ७६) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येने प्रभावित होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले होते. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखनही केले आहे. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला १९७८ मध्ये कान फेस्टिवलमध्ये १९८० मध्ये गोल्ड अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. तसेच १९७५ मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म अॅवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून ते नावारुपाला आले होते.

  • १९०१ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराला सुरुवात झाली होती. आजवर ११६ साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यात सर्वाधिक इंग्रजी भाषिक साहित्यिकांचा समावेश आहे. चार वेळा संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. साहित्यातील नोबेल सर्वात कमी वयात जिंकण्याचा मान ‘द जंगल बुक’ हे पुस्तक लिहिणाऱ्या रुडयार्ड किपलिंग यांच्या नावावर आहे, त्यावेळी त्यांचे वय ४१ वर्षे होते. त्यांचा जन्म ब्रिटिशशासित मुंबईमध्ये झाला होता.

भारत आणि चीनला परस्परांकडून धोका नाही : 
  • मामल्लापुरम : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे महाबलीपुरम या मंदिरांच्या शहरात भव्य स्वागत करण्याची तयारी भारताने केली असतानाच; भारत व चीन यांचा एकमेकांना काहीही धोका नसून, आशियातील या दोन महासत्तांमधील सहकार्य वाढल्यास या भागातच नव्हे, तर यापलीकडेही शांतता व स्थैर्य सुनिश्चित करण्याबाबत सकारात्मक ऊर्जा ओतली जाईल, असे चीनने म्हटले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेमुळे भारत-चीन संबंधांतील विकासाच्या दिशेबाबत ‘मार्गदर्शक तत्त्वांसह’ सहमतीचा नवा समुच्चय सुरू होईल, असे चीनचे राजदूत सुन वेडोंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

  • जगातील सर्वात मोठे विकसित देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून, या ‘गुंतागुंतीच्या जगात’ सकारात्मक ऊर्जा भरणे ही चीन व भारत यांची जबाबदारी आहे. ही परिषद द्विपक्षीय संबंधांना आणखी उंचीवर घेऊन जाईल आणि तिचा क्षेत्रीय आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि विकास यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल, असे सुन म्हणाले. भारत व चीन यांच्यात काश्मीरच्या मुद्दय़ावर वाढती अस्वस्थता असताना, विशेषत: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी जिनपिंग यांच्या भेटीदरम्यान हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, मोदी यांच्याशी अनौपचारिक चर्चेसाठी जिनपिंग हे सुमारे २४ तासांच्या दौऱ्यावर शुक्रवारी चेन्नई येथे पोहोचणार आहेत.

चीनला हाँगकाँगचा दाखला का देत नाही : 
  • नवी दिल्ली : आपण काश्मीरवर लक्ष ठेवून आहोत, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणत असतील, तर भारत हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळीच्या मुस्कटदाबीकडे लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणत नाहीत, असा प्रश्न जिनपिंग भारत दौऱ्यावर येत असताना काँग्रेसने विचारला आहे.

  • भारताच्या अंतर्गत प्रश्नांना लक्ष्य करण्यापासून चीनला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल पक्षाने मोदी सरकारवर टीका केली.

  • आम्ही काश्मीरवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असे क्षी जिनपिंग म्हणतात. मग,  आम्ही हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शनांची मुस्कटदाबी पाहतो आहोत,  आम्ही झिनजियांगमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होताना पाहतो आहोत,  तिबेटमध्ये कायम दडपशाही होताना आम्ही पाहतो आहोत,  आम्ही दक्षिण चीन समुद्रातील हालचालींकडे लक्ष ठेवून आहोत, असे पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्रालय का म्हणत नाहीत, असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्विटरवर विचारले.

  • चीन पाकव्याप्त काश्मीरचा आणि तो परत घेण्याचा मुद्दा मांडतो, तेव्हा पाकिस्तानने चीनला ‘अवैधरीत्या दिलेल्या’ अक्साई चीनबाबत भारताने चीनला जाब विचारावा, असे आव्हानही तिवारी यांनी दिले.

  • चीन काश्मीर मुद्दा मांडत असताना भारत झिनजियांगमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा का उपस्थित करत नाही, असेही त्यांनी विचारले.

महाराष्ट्र, हरयाणात गेल्यावेळी प्रसिद्धीवर २८० कोटी खर्च :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत पंधरा राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी २८० कोटी रुपये म्हणजेच एकूण खर्चाच्या ७८ टक्के रक्कम प्रसिद्धीसाठी वापरली. त्यापैकी भाजपने १८६.३९ कोटी, काँग्रेसने ४१.१९ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसने ३०.६६ कोटी, शिवसेनेने १४.४७ कोटी तर मनसेने १.९५ कोटी रुपये खर्च केले.

  • प्रसिध्दीपैकी प्रसारमाध्यमांमधील जाहिरातींवर सुमारे २४५ कोटी, प्रचार साहित्यावर १९ कोटी तर प्रचार सभांसाठी १६ कोटी रुपये पंधरा पक्षांकडून खर्च करण्यात आले. या शिवाय, प्रवास खर्चावर ४१ कोटी, किरकोळ खर्च २२ कोटी तर, उमेदवारांना दिलेली किरकोळ रक्कम १८ कोटी इतकी होती.

  • नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जमा-खर्चाचे विेषण करणारा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आणि त्यांनी तो कसा खर्च केला ही बाब या अहवालातून समोर आली आहे. २०१४ मध्ये दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा २० सप्टेंबर रोजी झाली होती तर निवडणुकीची प्रक्रीया २२ ऑक्टोबर रोजी संपली होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.

  • १९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.

  • २००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.

  • २००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्म 

  • १८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)

  • १९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

  • १९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)

  • १९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९७)

  • १९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

  • १९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)

  • १९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)

  • १९४६: परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८)

  • १९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९)

  • १९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७)

  • १९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.

  • १९९६: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)

  • १९९७: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.

  • २०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)

  • २००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.