चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०१९

Date : 12 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने; काय असते राष्ट्रपती राजवट :
  • विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात फक्त बैठकांचा धडाका सुरू आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिलं.

  • शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही काँग्रेसनी वेळेत निर्णय न घेतल्यानं शिवसेनेला दावा करता आला नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. पण, बहुमतासाठी लागणारा आकडा काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीला जमवता येणार नाही. त्यामुळं राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाली आहे.

  • भाजपा वगळता कोणत्याही पक्षाला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. दोन्ही काँग्रेस मिळून शंभरी पार करतात. मात्र, बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्याची जुळवा जुळव करण्यासाठी दुसरा समविचारी पक्ष नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं शिवसेना पाठिंबा देणार का? असाही प्रश्न सध्या आहे.

ट्रम्प महाभियोगप्रकरणी उद्यापासून खुली सुनावणी :
  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग चौकशीत खुली सुनावणी बुधवारपासून सुरू  होत असून त्यात डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षातील स्फोटक शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार जो बिदेन व त्यांच्या पुत्राच्या युक्रे नमधील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला होता.

  • प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू होत असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली तर अशी कारवाई होणारे ते अमेरिकी इतिहासातील तिसरे अध्यक्ष ठरणार आहेत. त्या परिस्थितीत त्यांच्यावर अध्यक्षांच्या कर्तव्यात कसूर करण्याच्या आरोपाखाली सिनेटमध्ये  सुनावणी केली जाईल. प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व असून २०१९ च्या अखेरीस महाभियोगाची कारवाई अंतिम टप्प्यात पोहोचू शकते. पण सिनेटमध्ये रिपब्लिकनांचे बहुमत असल्याने ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवून पदावरून काढून टाकणे सोपे नाही.

  • बुधवारी प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे जाहीर सुनावणी सुरू होईल. यापूर्वी सहा आठवडे बंद दाराआड जाबजबाब झाले होते. आतापर्यंतच्या सुनावणीत ट्रम्प  व त्यांच्या सहकाऱ्यांनी कशा प्रकारे युक्रेनवर दबाव आणला याचे पूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त :
  • माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.

  • दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे. मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता.

  • मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य  व राज्यसभेचे सदस्य होते. नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.

श्रीनगरमध्ये मिनी बस सुरू; आजपासून रेल्वेसेवाही :
  • जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून सोमवारी शहरात काही रस्त्यांवर मिनी  बस सुरू करण्यात आल्या. रेल्वेनेही श्रीनगर-बारामुल्ला पट्टय़ात सेवेची चाचणी घेतली आहे. मंगळवारी रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. ५ ऑगस्टला अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून त्या भागात रेल्वे सेवा रद्द करण्यात आली होती.

  • रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,की रेल्वेने या भागात तीन महिन्यानंतर प्रथमच सेवेची चाचणी घेतली आहे. श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे सेवा उद्यापासून सुरू करण्यात येईल, तर श्रीनगर-बनीहाल रेल्वे सेवा त्यानंतर काही दिवसात सुरक्षा तपासणीनंतर सुरू करण्यात येईल. रेल्वेने सोमवारी या पट्टय़ांमध्ये दोन चाचण्या घेऊन सुरक्षा तपासणी केली होती.

  • अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जे र्निबध लावण्यात आले होते त्यामुळे रेल्वे व बस सेवा ठप्प झाली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी  काही मिनी बस बटवारा-बाटमालू दरम्यान सुरू करण्यात आल्या. आंतर जिल्हा कॅब व ऑटोरिक्षा सेवा  पुन्हा सुरू झाली आहे. खासगी वाहतूक सेवा काही भागात सुरू असून वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बाजारपेठा काही काळ सुरू करण्यात आल्या पण दुपारनंतर दुकाने बंद झाली.

फेरविचार याचिकेबाबत मुस्लीम पक्षाचा रविवारी निर्णय :
  • अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीन मालकी वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाच्या रविवारच्या (१७ नोव्हेंबर)  बैठकीत घेण्यात येईल, असे अयोध्या जमीन वादातील मुस्लीम पक्षाच्या प्रमुख वकिलांनी सांगितले.

  • अयोध्या प्रकरणी एकमताने देण्यात आलेल्या ऐतिहासिक निकालात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने वादग्रस्त जागी राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करून सुन्नी वक्फ मंडळाला मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर जागा मशिदीसाठी देण्याचा आदेश दिला होता. ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय १७ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाच्या  बैठकीत घेण्यात येईल,’ असे मुस्लीम बाजूचे प्रमुख वकील झफरयाब जिलानी यांनी सांगितले.

  • मुस्लीम समाजातील काही गट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असल्याने मुस्लीम पक्ष फेरविचार याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले,की त्याबाबत १७ नोव्हेंबरला निर्णय घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात जिलानी यांनी उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ  मंडळाची बाजू मांडली होती.

ऐतिहासिक निकालानंतर सुटणार तब्बल २७ वर्षांचा उपवास :
  • जबलपूर - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. निकालानंतर अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

  • अयोध्या निकालानंतर आता तब्बल 27 वर्षांचा उपवास सुटणार आहे. राम मंदिर व्हावे यासाठी केवळ दूध आणि फळे खाऊन उपवास करणाऱ्या जबलपूरच्या 81 वर्षीय आजींनी निकालानंतर उपवास सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • ऊर्मिला चतुर्वेदी असं 81 वर्षीय आजींचं नाव असून त्या संस्कृत शिक्षिका आहेत. गेल्या 27 वर्षांपासून त्या उपवास करत होत्या. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नियमित आहार घेतील अशी माहिती चतुर्वेदी यांच्या मुलाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या प्रकरणावरील निकालानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना धन्यवाद देणारे पत्र देखील चतुर्वेदी पाठवणार आहेत. ऊर्मिला यांच्या मुलाने त्यांच्या उपवासाची माहिती दिली आहे. 

दिनविशेष :
  • जागतिक न्यूमोनिया दिन

महत्वाच्या घटना 

  • १९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

  • १९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

  • १९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

  • १९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.

  • १९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.

  • १९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.

  • २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • २०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

जन्म 

  • १८८०: सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा पारनेर, जि.अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

  • १८८९: रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)

  • १८९६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ.सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८७)

  • १९०४: समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू  श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८९)

मृत्यू 

  • १९४६: बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८६१)

  • १९५९: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

  • १९५९: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८६)

  • १९९७: वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे पुणे येथे निधन.

  • २००५: रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९२४)

  • २००७: भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.