चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ ऑक्टोबर २०१९

Date : 12 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मेरी कोमचे सातव्या सुवर्णपदकाचे लक्ष्य :
  • भारतीय महिला संघातील चार बॉक्सर्सनी जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून जगातील महान बॉक्सर म्हणून नावलौकिक कमावणाऱ्या एम. सी. मेरी कोमने सातव्या सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

  • उपांत्य फेरीच्या लढतीत शनिवारी रंगणार असून मेरी कोमसह मंजू राणी, जमुना बोरो आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा असतील.

  • मेरी कोमने (५१ किलो) आतापर्यंत सहा जागतिक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले असून गुरुवारी तिने आठव्या पदकाची भर घातली आहे. आता हे पदक कोणते असेल, याचा फैसला शनिवारी लागणार आहे. उपांत्य फेरीत मेरी कोमचा सामना तुर्कीची युरोपियन विजेती बुसेनाझ काकीरोग्लू हिच्याशी होणार आहे.

  • ‘‘भारताच्या चारही बॉक्सर्सनी चमकदार कामगिरी केली आहे. त्या चारही जणी अंतिम फेरी गाठतील, असा आम्हाला विश्वास आहे. २०१८नंतर आमची कामगिरी कुठेही ढेपाळली नाही. अटीतटीच्या लढतीत दोन खेळाडूंना पराभव पत्करावा लागला, अन्यथा सहा खेळाडू अंतिम फेरीत असत्या,’’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद अली कमार यांनी सांगितले.

इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा नोबेल जाहीर :
  • इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना २०१९ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा दोन दशकांपासूनचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपिअन नागरिक ठरले आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे.

  • २०१९चा शांततेचा नोबेल जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले की, “शांतता प्रस्थापित केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तसेच शेजारील देश इरिट्रियासोबत असलेला दोन दशकांपासूनचा सीमावाद सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णायक पुढाकारासाठी अबिय यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.”

  • “२०१९ चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्‍या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसाईअस अफवेरकी यांनी यासाठी दिलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे अबिय अहमद यांना कमी वेळेत शांतता करारावर काम करता आले,” असेही नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, 'या' कंपन्यांकडून फ्री कॉलिंगची घोषणा :
  • मुंबई : रिलायन्स जिओने इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी इंटरकनेक्ट युसेज चार्ज(IUC) लागू केला आहे. बुधवारी कंपनीने त्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे जिओ युजर्सना धक्का बसला. कालपासून सर्वत्र रिलायन्स जिओला ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यानंतर आज वोडाफोन आयडिया लिमिटेड Vodafone Idea Limited (VIL) ने आययूसीसंदर्भात (IUC) मोठी घोषणा केली आहे.

  • वोडाफोन आयडियाकडून सांगण्यात आले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांकडून इतर कॉल्सच्या बदल्यात अतिरिक्त पैसे आकारणार नाही. वोडाफोन-आयडियाकडून वेगळे आययूसी चार्जेस आकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्री ऑऊटगोईंग सुविधेचा आनंद घ्या.

  • काय आहे इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) - इंटरकनेक्ट युसेज चार्ज अथवा IUC म्हणजे एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटरद्वारे दुसऱ्या ऑपरेटर कंपनीला दिले जाणारे शुल्क आहे. जेव्हा एका कंपनीचे ग्राहक त्याच कंपनीच्या नेटवर्कला सोडून अन्य कंपनीच्या नेटवर्कवरील ग्राहकाला फोन करतात, तेव्हा कॉल करणाऱ्या ग्राहकाच्या कंपनीला दुसऱ्या कंपनीला हे शुल्क द्यावे लागते.

महाराष्ट्रात मोदींच्या चार दिवसांत नऊ सभा :
  • राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्याच्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांत होतील अशा रीतीने नियोजन करण्यात आले आहे. रविवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अखेरच्या टप्यात मोदी महाराष्ट्राच्या प्रचारात उतरणार आहेत. चार दिवसांत त्यांच्या तब्बल ९ सभा होणार आहेत.

  • भाजपच्या खासदारपदावरून थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊन पक्षाबाहेर पडणारे नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्याच दिवशी मोदी यांची सभा होणार आहे. साकोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती व राज्यमंत्री परिणय फुके पटोले यांच्यासमोर उभे आहेत.  १३ ऑक्टोबरला जळगाव व साकोलीमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबरला अकोला, परतूर, पनवेल या ठिकाणी सभा होईल.

  • १७ ऑक्टोबरला पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात मोदी सभा घेतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तर त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी साताऱ्यात जातील. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमुळे व कोथरूडमधील उमेदवारी चर्चेत आलेल्या पुण्यात मोदी यांची सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत १८ ऑक्टोबरला होईल. ही शिवसेना व भाजपची संयुक्त सभा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यात सहभागी होतील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४९२: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.

  • १८२३: स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.

  • १८४७: वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.

  • १८५०: अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.

  • १८७१: भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

  • १९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.

  • १९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.

  • १९६८: मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.

  • १९८८: जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.

  • १९९८: तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.

  • २०००: भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.

  • २००१: संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.

  • २००२: दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.

जन्म 

  • १८६०: गॅरोकोम्पास चे निर्माते एल्मर अॅम्ब्रोस स्पीरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९३०)

  • १८६८: ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

  • १९११: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९८७)

  • १९१८: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)

  • १९२१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१)

  • १९२२: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून २००२)

  • १९३५: भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.

  • १९४६: क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

मृत्यू 

  • १९६७: समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१०)

  • १९९६: फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ते यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९०४)

  • २०११: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रितची यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)

  • २०१२: भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.