चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ डिसेंबर २०१९

Date : 13 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘आययूएमएल’चे ‘कॅब’ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान : 
  • इंडियन युनियन मुस्लीम लीगने (आययूएमएल) नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला (कॅब) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या विधेयकामुळे घटनेतील समानतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या एका गटाला धार्मिक आधारावर नागरिकत्व देण्याचा या विधेयकाचा हेतू आहे, असे आययूएमएलने म्हटले आहे.

  • पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर-मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याचे या विधेयकामध्ये प्रस्तावित असून त्याला संसदेने मान्यता दिली आहे. त्याला राष्ट्रपतींची अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

  • कॅबच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी आययूएमएलने पल्लवी प्रताप या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. कॅब हे घटनेच्या मूळ रचनेच्या विरोधी आहे, मुस्लिमांचा दुजाभाव करणारे आहे, कारण या कायद्यान्वये केवळ हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांनाचा लाभ देण्यात येणार आहे.

  • स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याबाबत याचिकाकर्त्यांची तक्रार नाही, तर दुजाभाव आणि धर्माच्या नावावर अयोग्य वर्गीकरण करण्यात आले आहे त्याबाबत तक्रार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कायदा अस्तित्वात; विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी : 
  • नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. गुरूवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेकाला मंजुरी देण्यात आली आहे.

  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं १२५ तर, विरोधात १०५ मतं पडली. त्यानंतर गुरूवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली.

  • एएनआयनं यासंबंधीतील वृत्त दिलं आहे. धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये करण्यात आली आहे.

‘ही’ तीन राज्ये लागू करणार नाहीत नागरिकता दुरुस्ती विधेयक, केंद्र सरकारला स्पष्ट नकार :
  • नागरिकता दुरुस्ती विधेयकावरुन आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरु असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. गुवाहाटीत हजारो नागरिक संचारबंदीचा भंग करुन रस्त्यावर उतरले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी ४८ तासांसाठी वाढवण्यात आली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येतील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचं स्पष्ट करत आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. दरम्यान, नागरिकता दुरुस्ती विधेयकाला तीन राज्यांनी विरोध केला आहे. पश्चिम बंगाल, केरळनंतर आता पंजाबनेही राज्यात विधेयकांचा अंमलबजावणी केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करत असल्याचं म्हटलं आहे.

  • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यालयातून गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करणारं असून, ते लागू केलं जाणार नाही असं कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी केरळ आणि पश्चिम बंगालने विधेयक लागू केलं जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३०: प्रभात चा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.

  • २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.

  • २०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

  • २०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.

जन्म 

  • १७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८४९)

  • १८०४: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)

  • १८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)

  • १८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)

  • १९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)

  • १९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.

  • १९५५: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७८४: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)

  • १९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)

  • १९३०: सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)

  • १९६१: अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ग्रँडमा मोझेस यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन.

  • १९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५ – पुणे)

  • १९९४: सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)

  • १९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन.

  • २००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे  संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.