चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ फेब्रुवारी २०२०

Date : 13 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा : 
  • मुंबई : केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर महाविकास आघाडी सरकारने मान्य केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील. यासोबतच दररोज ४५ मिनिटांचे वाढीव काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून होईल, असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

  • राज्यात सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करणारे, महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, बृहन्मुंबई राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, सरचिटणीस अविनाश दौंड आदी पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचे निधन : 
  • पद्म श्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचे बुधवारी गोव्यामध्ये निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. वेंडेल रॉड्रिक्स यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिले होते तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर त्यांचे चांगले संबंध होते.

  • फॅशन डिझायनर असण्याबरोबर वेंडेल एक लेखक, पर्यावरण कार्यकर्तेही होते. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

  • २००३ साली अमिताभ बच्चन आणि कॅटरीन कैफच्या बूम चित्रपटात त्यांनी कॅमियोची भूमिका साकारली होती. त्याशिवाय २००८ साली आलेल्या प्रियांका चोप्राच्या फॅशन चित्रपटातही त्यांची भूमिका होती.

अहमदाबादच्या स्टेडियमवर ‘केम छो ट्रम्प’ मेळाव्याचे आयोजन : 
  • अहमदाबाद : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबाद येथे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यांचा मोठा रोड शो होणार आहे.

  • साबरमती आश्रमाची सफर त्यांना घडवली जाणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन ते पंतप्रधान मोदी यांच्या समवेत करणार आहेत. याच स्टेडियमवर ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ मेळाव्याच्या धर्तीवर ‘केम छो ट्रम्प’ मेळावा (हाउडी ट्रम्प) घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास लाखो लोकांची उपस्थिती राहणार आहे.

  • २४ फेब्रुवारीला ट्रम्प हे अहमदाबादला येणार असून मोदी त्यांच्या राज्यात अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा खास पाहुणचार करणार आहेत. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम या दहा कि.मीच्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा रोडशो होणार असून यावेळी लाखो भारतीय दुतर्फा त्यांच्या स्वागतास सज्ज असतील.

भारत-अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत : 
  • वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ व २५ फेब्रुवारीला भारतात येत असून त्यांनी या दौऱ्याबाबत आशावादी असल्याचे सांगून दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील असे सूचित केले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत असून ते गुजरातमधील अहमदाबाद येथे थांबणार आहेत. मोदी व ट्रम्प यांची संयुक्त सभा (मेळावा)  तेथील स्टेडियमवर होणार आहे.

  • ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात वार्ताहरांना सांगितले की,‘ मोदी हे सभ्यगृहस्थ आहेत, भारत दौऱ्याकडे आपण आशावादी दृष्टिकोनातून पाहात आहोत. महिनाअखेरीस हा दौरा होणार आहे.’ व्हाइट हाऊ सने त्यांच्या दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.

  • एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘दोन्ही देशात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो व्यापार करार योग्य असेल तरच मान्य केला जाईल. भारत काहीतरी करू इच्छित आहे, त्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत जर योग्य असा व्यापार करार होणार असेल तर त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.’

  • अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी सांगितले की, ‘ट्रम्प व मोदी यांच्यात व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. त्यातूनच ट्रम्प यांची भारतभेट घडून येत आहे. अमेरिकेला भारताबरोबरचे संबंध एका नव्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे हे यातून सूचित होते आहे.’

१३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.