चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२०

Updated On : Jan 13, 2020 | Category : Current Affairsसेरेनाला तीन वर्षांतील पहिले जेतेपद : 
 • अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आई झाल्यानंतर पहिले जेतेपद रविवारी ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेतून पटकवले.

 • तिने बिगरमानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ६-३, ६-४ पराभव केला. तब्बल तीन वर्षांनंतर सेरेनाला जागतिक स्तरावरील टेनिस स्पर्धा जिंकता आली. मात्र त्याहीपेक्षा सेरेनाने खिलाडूवृत्ती दाखवली ती ऑस्ट्रेलियातील वणव्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी तिची बक्षीस रक्कम दान करुन.

 • ‘‘गेली २० वर्षे मी ऑस्ट्रेलियात येऊन खेळत आहे. ते पाहता ऑस्ट्रेलियातील लोकांनी वणव्यामुळे गमावलेली घरे आणि प्राण्यांना आगीमुळे ज्या पद्धतीत होरपळावे लागले ते पाहून मला अतिशय यातना झाल्या. मला मिळालेली बक्षिस रक्कम मी मदतनिधी दान करणार हे याआधीच ठरवले होते,’’ असे सेरेनाने म्हटले.

 • याआधी गरोदर असताना म्हणजेच २०१७मध्ये सेरेनाने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकवले होते. आता तिच्या महिलांच्या ‘डब्ल्यूटीए’ जेतेपदांची संख्या ७३वर पोहचली आहे. तिने पहिले जेतेपद १९९९मध्ये मिळवले होते.

सुमारे चार कोटींची ग्रंथविक्री : 
 • पाण्यासाठी कायम संघर्ष करणाऱ्या उस्मानाबादच्या अंगणी यंदा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांच्या श्रावणसरी मनसोक्त कोसळल्या आहेत.

 • संमेलनाच्या या तीन दिवसांत संत गोरोबा काका साहित्य नगरीतील ग्रंथ दालनात सुमारे चार कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली अशी माहिती,  ग्रंथ प्रदर्शन समितीच्या प्रमुख सुनीताराजे पवार यांनी लोकसत्ताला दिली.

 • सुनीता राजे म्हणाल्या, संमेलन उस्मानाबादला जाहीर झाले तेव्हापासून यावर्षीच्या पुस्तकविक्रीबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. कायम दुष्काळी वातावरण व यंदाच्या अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीमुळे वाचकांचा फारसा प्रतिसाद या शहरात मिळणार नाही, असेही सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्ष विक्री बघून आम्ही थक्क आहोत.

हर्नाडेझ बार्सिलोनाचा मुख्य प्रशिक्षक : 
 • स्पेनला २०१०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मातब्बर खेळाडू आणि बार्सिलोनाचा माजी कर्णधार हॅव्हिएर हर्नाडेझ लवकरच बार्सिलोनाच्याच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कतार प्रीमियर लीगमध्ये अल-साद संघाला मार्गदर्शन करणाऱ्या हर्नाडेझच्या भवितव्याविषयी स्वत: क्लबच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे.

 • बार्सिलोनाचे सध्याचे प्रशिक्षक इर्नेस्टो व्हॅलवरेड यांची लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे हर्नाडेझकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेषत: स्पॅनिश सुपर चषकातील उपांत्य फेरीत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 • ‘‘हर्नाडेझ बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्याच्या चर्चाना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. परंतु तूर्तास तरी अल-साद संघासोबतचा त्याचा करार संपलेला नाही,’’ असे अल-साद क्लबचे क्रीडा संचालक मोहम्मद गुलाम अल-बलुशी म्हणाले. मात्र याविषयी अंतिम निर्णय दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाचा असेल, असेही अल-बलुशी यांनी सांगितले.

फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक : 
 • फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी  हलवण्यात आले आहे. सरकारी संस्थेच्या भूकंपतज्ज्ञांनी सांगितले,की ताल नावाच्या ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडला असून राखही हवेत उडत आहे.

 • आणखी काही आठवडय़ात ज्वालामुखीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे फिलिपाइन्स इन्स्टिटय़ूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिसमॉलॉजी या संस्थेचे प्रमुख रेनाटो सोलिडम यांनी सांगितले. यापूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक १९७७ मध्ये झाला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे एक किमी उंच राखेचा उडालेला थर दिसत आहे. या ज्वालामुखी उद्रेकाने २००० रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून हे ज्वालामुखी बेट एका तळ्याने वेढलेले आहे. ते तळे ज्वालामुखीमुळेच तयार झाले होते.  जर परिस्थिती आणखी बिघडली तर इतर बेटांवरील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे लागणार आहे.

 • फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखी हा नित्याचा प्रकार असून हा देश पॅसिफिकमधील रिंग ऑफ फायरवर येतो. जानेवारी २०१८ मध्ये माउंट मेयॉन येथे ज्वालामुखीने लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. मध्य बिकोल भागात हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.

जयंती विशेष: स्वामी विवेकानंदांची ही वाक्यं देतील संघर्षात लढण्याची प्रेरणा : 
 • एकाग्रतेने वाचन करा, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ती ध्यानधारणा, ध्यानधारणा केल्याने आपण इंद्रियांवर संयम ठेवू शकतो
 • ज्ञान हा वर्तमान काळ आहे, मनुष्य त्याचा अविष्कार करतो ही बाब विसरु नका
 • उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमची लक्ष्यप्राप्ती होत नाही
 • जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकणं बंद करु नका, अनुभव हा आपला गुरु आहे ही बाब विसरु नका
 • लोक तुमची स्तुती करोत किंवा निंदा, लक्ष्य तुम्ही गाठण्याची तुमची वाट बिकट असो किंवा सुकर तुम्ही तुमचा योग्य मार्ग सोडू नका
 • ज्या क्षणी एखादं काम करण्याची घोषणा कराल त्याच क्षणी ते काम सुरु करा नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल
 • जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही
 • एकावेळी एकच काम हाती घ्या आणि ते तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, ते काम पूर्ण होईपर्यंत सगळ्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरुन जा

१३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)