चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ मार्च २०२०

Date : 13 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातील Google चं ऑफिस बंद : 
  • करोना व्हायरसचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. भारतात ७० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर महाराष्ट्रातही करोनाचे १४ संशयित रूग्ण आढळले आहेत. करोनामुळे गुगलचं भारतातील कार्यालय बंद करण्यात आलं आहे.

  • गुगलच्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्यानं कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय गुगलकडून घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यामध्ये करोनाची लक्षण दिसल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला करोना झाल्याचं स्पष्ट झालं.

  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुगलं आपलं बंगळुरूमधील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कंपनीनं कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. १० एप्रिल पर्यंत या कर्मचाऱ्यांना घरून काम करावं लागणार आहे. दरम्यान, करोनाची लागण झालेला गुगलचा कर्मचारी काही दिवसांपूर्वीच परदेश दौऱ्यावरून परतला होता. सुरूवातील त्याला थोडा ताप आला. त्यानंतर काही वेळानं त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. अधिक तपास केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

जनगणनेत कुटुंबाकडील लॅपटॉप, स्मार्ट फोनचीही नोंद : 
  • दशवार्षिक जनगणनेसाठी प्रगणकांना यंदा मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अ‍ॅपचा वापर करुन जनगणना करणाऱ्यांना अधिक मानधन मिळणार आहे, तर कागदपत्रांवरील नमुन्यात नोंदी करणाऱ्या प्रगणकांना कमी मानधन दिले जाणार आहे. या शिवाय प्रगणक प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन नोंदी करतो की नाही, याची पडताळणी विशेष ‘पोर्टल’मार्फत केली जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत कुटुंबाकडील इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्ट फोन याची प्रथमच नोंद होणार आहे, याशिवाय कुटुंब कोणते धान्य सेवन करते, याचीही स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे.

  • जनगणनेची पूर्वतयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरु झाली आहे. यंदाची दशवार्षिक जनगणना प्रत्यक्षात ९ फेब्रुवारी २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार असली तरी त्यापूर्वी १ मे ते २० मे २०२० या कालावधीत जनगणनेतील कुटुंबाची घरयादी तयार केली जाणार आहे. प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. घरयादी तयार करताना एका प्रगणक गटाकडे १५० ते २०० कुटुंबे, म्हणजे ६५० ते ७०० लोकसंख्या राहील, अशी रचना केली जाणार आहे.

  • एका गटावर पाच ते सहा पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत. हे प्रगणक कुटुंबाची यादी तयार करण्यापूर्वी त्यांना दिलेल्या भागाचा नकाशा तयार करतील. त्याच्या मोजणीची सुरुवात वायव्य दिशेने (उत्तर व पश्चिम यांच्यामधील) होईल व नागमोडी (झिगझ्ॉग) पद्धतीने इमारतींना क्रमांक देऊन आग्नेय दिशेला (दक्षिण व पूर्व यांच्यामधील) त्याचा समारोप करतील.

देशात करोनाचा पहिला बळी : 
  • चीनसह जगभर थमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान, पुणे, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही करोनाचा रुग्ण आढळला आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एकास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १४ वर पोहोचली.

  • सौदी अरेबियाहून परतलेल्या ७६ वर्षीय वृद्धावर कर्नाटकातील कलबुर्गी येथे उपचार सुरू होते. त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय होता. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती, असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचे कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी गुरुवारी सांगितले.

  • दुसरीकडे, महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येतही वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यापाठोपाठ गुरुवारी रात्री मुंबई आणि ठाण्यातही प्रत्येकी एक रुग्ण आढळला. ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून परतला होता. मुंबईत आढळलेला रुग्ण दुबईहून परतलेला आहे. ही व्यक्ती वयोवृद्ध असून, प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा अहवाल आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यास सरकारचे प्राधान्य - जयशंकर : 
  • करोना विषाणूचा फैलाव हा ‘गंभीर चिंतेचा’ विषय असून, इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीय यात्रेकरूंना परत आणण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले.

  • करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर बोलताना, इराणच्या निरनिराळ्या भागांत ६ हजारांहून अधिक भारतीय नागरिक असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. यात प्रामुख्याने लडाख व जम्मू- काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील तसेच महाराष्ट्रातील सुमारे ११०० यात्रेकरूंचा समावेश आहे. याशिवाय प्रामुख्याने जम्मू व काश्मिरातील सुमारे ३०० विद्यार्थी; केरळ, तमिळनाडू व गुजरातमधील सुमारे १ हजार मच्छीमार, तसेच उदरनिर्वाहासाठी आणि धार्मिक अभ्यासासाठी इराणमध्ये दीर्घकालीन वास्तव्य करून असलेल्या इतर लोकांचा समावेश आहे, असे जयशंकर म्हणाले.

  • गेल्या काही दिवसांत, अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्याचे सरकार प्रयत्न करत आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणाले.

३१ मार्चपर्यंत शाळा-कॉलेजसना सुट्टी, थिएटर्सही बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा : 
  • करोना विषाणूचा फैलाव भारतात वाढत असून दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहं तसेच शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीत आजवर पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

  • माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “करोनाचा वाढता धोका पाहता दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच ज्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत ती सोडून इतर सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद राहतील.”

  • असाच निर्णय दोन दिवसांपूर्वी केरळ सरकारनेही घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसह चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, केरळमध्ये करोना विषाणाच्या संसर्गाचे आणखी ६ संशयित आढळले आहेत.

१३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.