चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ फेब्रुवारी २०२०

Updated On : Feb 14, 2020 | Category : Current Affairsमनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू : 
 • लुसान : भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.

 • भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देताना कर्णधार म्हणून मनप्रीतने मोलाची भूमिका बजावली होती. या पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला बेल्जियमचा आर्थर व्ॉन डोरेन आणि अर्जेटिनाचा लुकास व्हिया यांच्यावर मनप्रीतने मात केली. व्ॉन डोरेनला दुसऱ्या तर व्हिया याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 • मनप्रीतला एकूण ३५.२ टक्के मते मिळाली. त्यात राष्ट्रीय संघटना, प्रसारमाध्यमे, चाहते आणि खेळाडूंच्या मतांचा समावश आहे. व्हॅन डोरेनला १९.७ तर व्हियाला १६.५ टक्के मते मिळाली. या पुरस्कारासाठी बेल्जियमचा विक्टर वेगनेझ, ऑस्ट्रेलियाचे अरान झालेवस्की आणि ईडी ओकेनडेन यांना नामांकन मिळाले होते.

 • मनप्रीतने २०१२च्या लंडन आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून त्याची कारकीर्द जोमाने सुरू आहे. त्याने आतापर्यंत २६० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वर्षी मनप्रीतने एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताला विजय मिळवून देत टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान मिळवून दिले होते.

भारत देश आणि भारतीय माझ्या हृदयात-अदनान सामी : 
 • धर्म हा केवळ शब्द आहे.. मानवता हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून आपल्यातील क्षमता मजबूत करा आणि जागतिक स्तरावरील स्पर्धकांसोबत स्पर्धा करत रहा. माझ्या ह्रदयात भारत आणि भारतीय राहतात. मी सगळ्या धर्मांचे सण साजरे करतो. मुसलमानच नाही तर सर्व धर्मांच्या नागरिकांना भारतात सन्मान मिळतो. जगात कुठेही गेलात तरी भारतीय संस्कृती आणि परंपरेला विसरू नका. असे आवाहन गायक पद्मश्री अदनान सामी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

 • एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित चौथ्या “पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट 2020” च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ह्दयनाथ मंगेशकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड,प्रसिद्ध अमेरिकी व्यावसायिक आणि बँकिंग गुंतवणूकदार सोनाली वर्मा, फायझरचे माजी संचालक डॉ. मॅक जावडेकर आदी उपस्थित होते.यावेळी पद्मश्री अदनान सामी यांना मेडॉलिक पर्सोना अवॉर्ड 2020 आणि पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना आयकॉनिक पर्सोना अवॉर्ड 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 • यावेळी पद्मश्री अदनान सामी म्हणाले की, “संगीत हे जगण्याचे साधन आहे. संगीत तुम्हाला नेहमी विद्यार्थी म्हणून जगायला शिकवते. सतत शिकत राहण्याची कला संगीतामुळे शिकता येते. स्वप्न हे आपल्या धैय्य पूर्तीची पहिली पायरी असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वप्न पहावे”. असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

‘१०८ क्रमांका’ची रुग्णसेवा विविध व्याधींनी ‘बाधित’ : 
 • नगर : राज्यासाठी उपयुक्त ठरलेली ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा विविध कारणांनी ‘बाधित’ झाली आहे. नादुरुस्त रुग्णवाहिका, त्यातून आवश्यक व पुरेसा औषधसाठा नाही, जिल्ह्य़ाचे व्यापक भौगोलिक क्षेत्र व मोठय़ा लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या संख्येने असलेल्या रुग्णवाहिका, अपुऱ्या संख्येने असलेले डॉक्टर व चालक अशा विविध ‘व्याधीं’नी ही सेवा गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून ग्रस्त झाली आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या वाहतुकीवर, तातडीने सरकारी रुग्णालयात पोहचवण्यावर झाला आहे. गंभीर परिस्थितीतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोचून वेळेत उपचार सुरू झाल्यास त्याला जीवदान मिळू शकते, या मूळ हेतुलाच या व्याधीने बाधा आणली आहे.

 • राज्याचा आरोग्य विभाग ‘बीव्हीजी’ या संस्थेमार्फत ही सेवा उपलब्ध करते. जिल्ह्य़ात सध्या ४० रुग्णवाहिकांमार्फत (त्यातील ९ अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्टच्या) ही सेवा चालवले जाते. परंतु जिल्ह्य़ाचे मोठे क्षेत्र व लोकसंख्या विचारात घेता ही संख्या अपुरी ठरते आहे. त्यातील नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या ७ आहे. चिंचोंडी पाटील, जेऊर, तळेगाव दिघे, नान्नज, कोल्हार, राहाता या केंद्रावरील वाहने बंद आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या २० ते २२ आहे.

 • या रुग्णवाहिकांवर १२० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्ष उपलब्ध केवळ ६२ आहेत. कमी वेतन व आरोग्य विभागाचा ‘आरोग्यवर्धिनी’ उपक्रम सुरू झाल्यानंतर तेथे मिळणाऱ्या अधिक मानधनामुळे अनेक डॉक्टर तेथे रुजू झाले आहेत. रुग्णवाहिकेवर नियुक्त करण्यात आलेले सर्वच डॉक्टर ‘बीएएमएस’ आहेत. त्यांनाच तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन हृदयविकाराच्या रुग्णवाहिकांवर नियुक्त करण्यात आले आहे.

नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे निधन : 
 • पर्यावरण तज्ज्ञ, दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) संस्थापक संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे गुरूवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मंगळवारपासून पचौरी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबाबत ‘टेरी’कडून ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

आसामच्या नागरिकत्वाबाबतची माहिती संकेतस्थळावरून नाहीशी : 
 • गुवाहाटी : आसामच्या नागरिकत्वाबाबतची अद्ययावत माहिती (डेटा) संबंधित संकेतस्थळावरून नाहीशी झाल्यानंतर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. नोकरी सोडताना या संवेदनशील दस्ताऐवजाचा पासवर्ड सादर करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या महिला अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे.

 • एनआरसीच्या माजी महिला अधिकाऱ्याला लेखी स्मरणपत्रे दिल्यानंतरही तिने या दस्ताऐवजाचा पासवर्ड न दिल्यामुळे तिच्याविरुद्ध ‘ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट’ अन्वये पलटण बझार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे, असे एनआरसीचे राज्य समन्वयक हितेश देव शर्मा यांनी पीटीआयला सांगितले.

 • ‘गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला राजीनामा दिल्यानंतरही या महिलेने पासवर्ड सोपवला नाही. कंत्राटी कर्मचारी असलेल्या या महिलेला नोकरी सोडल्यानंतर पासवर्ड स्वत:जवळ ठेवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे गोपनीयता कायद्याचा भंग केल्याबद्दल तिच्याविरुद्ध बुधवारी एफआयआर नोंदवण्यात आला’, असे ते म्हणाले.

 • पासवर्ड सादर करण्यासाठी एनआरसी कार्यालयाने तिला अनेकदा पत्रे लिहिली, मात्र त्यावर काही प्रतिसाद मिळाला नाही असेही शर्मा यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)