चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जानेवारी २०२०

Updated On : Jan 14, 2020 | Category : Current Affairsटाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा - आनंदची अनिश गिरीविरुद्ध बरोबरी : 
 • टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीत विश्वनाथन आनंदने हॉलंडच्या अनिश गिरीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने अनिश गिरीविरुद्ध २१व्या चालीला बरोबरी मान्य केली.

 • विशेष म्हणजे रविवारी दुसऱ्या फेरीत आनंदला अमेरिकेच्या वेस्ले सोकडून पराभव पत्करावा लागला होता. तिसऱ्या फेरीत सोमवारी अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआना आणि हॉलंडच्या जॉर्डन वॅन फॉरेस्टने विजय नोंदवले.

परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द : 
 • पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्ऱफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचा निर्णय देत ती रद्द केली आहे. जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोह केल्याचा ठपका ठेवत फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला मुशर्रफ यांनी लाहोरच्या हायकोर्टात आव्हान दिले होते. ज्यानंतर लाहोर हायकोर्टाने ही फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

 • पत्रकार अब्दुल हक यांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष न्यायलयाने दिलेले इतर आदेशही लाहोर कोर्टाने रद्द केले आहेत. विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षाच बेकायदा ठरवण्यात आल्याने ती रद्द झाली आहे असं अतिरिक्त अॅटर्नी जनलर इश्कियात ए खान यांनी म्हटलं आहे.

 • १७ डिसेंबरला पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना देशद्रोही ठरवलं. त्यानंतर पाकिस्तानी घटनेनुसार अनुच्छेद सहा अन्वये फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र अनुच्छेद सहा मध्ये करण्यात आलेल्या १८ व्या सुधारणेनंतर हा निर्णय देता येणार नाही असं लाहोर कोर्टाने म्हटलं आहे.

महिलांबाबतच्या धार्मिक भेदभावाविरोधात सुनावणी : 
 • केरळातील शबरीमला मंदिरासह इतर धार्मिक ठिकाणी भक्तांना प्रवेश देताना महिला व पुरुष असा भेदभाव केला जाऊ नये, या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यांच्या घटनापीठाने सुनावणी सुरू केली. युक्तिवादातील मुद्दे  ठरवण्यासाठी १७ जानेवारीला वरिष्ठ वकिलांची बैठक बोलावण्यात आली आहे.

 • शबरीमला प्रकरणात यापूर्वी देण्यात आलेल्या निकालावर आम्ही फेरविचार करीत नसून यापूर्वी पाच न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आलेल्या याचिकातील मुद्दय़ांवर सुनावणी करीत आहोत, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यांच्या घटनापीठाने म्हटले आहे.

 • मुस्लीम महिलांचा मशिदीत प्रवेश, दाउदी बोहरा समाजात मुस्लीम महिलांच्या लैंगिक अवयवाची केली जाणारी पारंपरिक शस्त्रक्रिया (खतना), पारशी महिलांनी पारशी नसलेल्या पुरुषांशी विवाह केला असेल तर त्यांना अग्यारीत प्रवेश न देणे या मुद्दय़ांवर विचार केला जाईल असे घटनापीठाचे म्हणणे आहे.

ऑस्करची नामांकने जाहीर : 
 • लॉस एंजल्स : जगभरात प्रतिष्ठा असलेल्या ९२व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला आहे.  

 • क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने जाहीर झाली आहेत.  दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.

 • चित्रपट : वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड, जोकर, दी आयरिशमॅन, पॅरासाइट, १९१७, मॅरेज स्टोरी, जोजो रॅबिट

 • अभिनेत्री : रिनी झेलवेगर, चार्ीझ थेरॉन, स्कार्लेट जोहान्सन, साओइर्स रोनन, सिन्थिया इरिव्हो.

 • अभिनेता : जोकीन फिनिक्स, अ‍ॅडम ड्रायव्हर, लिओनार्दो डिकॅप्रिओ, अ‍ॅण्टोनिओ बॅण्डेरस, जोनाथन प्रीस.

 • दिग्दर्शन : मार्टिन स्कॉर्सेसी, क्वेण्टिन टॅरॅण्टिनो, बोंग जून-हो, सॅम मेंडिस, टॉड फिलिप्स.

“भारतातील सध्याची परिस्थिती वाईट”; मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलांची CAA वर नाराजी : 
 • देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व काद्याला विरोध होत असतानाच आता मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष सत्या नाडेला यांनाही भारतामध्ये घडत असणाऱ्या घटना दुखद असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

 • “माझ्या मते भारतात सध्या जे काही सुरु आहे ते दुखद आहे. परिस्थिती वाईट आहे,” असं मत नाडेला यांनी बझफीडचे संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

 • नाडेला हे मायक्रोसॉफ्टच्या मॅनहॅटन येथील कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना त्यांना बांगलादेशमधून आलेला एखादा निर्वासित भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. “मला बांगलादेशमधून भारतात आलेला निर्वासित भारतात एखादी कंपनी सुरु करताना किंवा थेट इन्फोसिसचा पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून पहायला आवडेल,” असं नाडेला म्हणाले.

१४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)