चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ मार्च २०२०

Date : 14 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा : 
  • बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचं असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचं आहे, त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

  • “मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहेत,” अशी माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली. १९७५ मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.

  • बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे. यामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचाही समावेश आहे. बिल गेट्स यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं सत्या नडेला म्हणाले. 

चीनमध्ये करोना संसर्गात घट : 
  • बीजिंग : चीनमध्ये गुरुवारी करोना विषाणूने सात बळी गेले असून मृतांची एकूण संख्या ३१७६ झाली आहे. नवीन निश्चित रुग्णांची संख्या केवळ आठ होती. संपूर्ण देशात सीओव्हीआयडी १९ विषाणूचा भर ओसरला आहे.

  • चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, चीनमध्ये गुरुवारी सात जण विषाणूने मरण पावले तर त्यातील सहा जणांचा वुहानमध्ये मृत्यू झाला तर एक शांगडॉंगमध्ये मरण पावला. आठ नवीन रुग्ण हुबेई प्रांतातील आहेत. देशात ३३ नवीन संशयित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या आता १४७ झाली आहे.  गुरुवारी  १३१८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकूण गंभीर रुग्णांची संख्या आता ४०२० आहे.

  • चीनमध्ये एकूण ८०८१३ निश्चित रुग्ण असून त्यात मरण पावलेल्या ३१७६ जणांचा समावेश आहे. १३५२६ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. ६४१११ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तीन नवीन रुग्ण परदेशातून आले असून त्यात दोन शांघाय तर एक बीजिंगमध्ये आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता  ८८ झाली आहे. हाँगकाँगमध्ये दोन मृत्यू १३१ निश्चित रूग्ण, मकावमध्ये १० निश्चित रूग्ण, तैवानमध्ये १ बळी व ४९ रुग्ण अशी परिस्थिती आहे.

सार्क देशांना संयुक्त रणनीतीचा मोदी यांचा प्रस्ताव : 
  • नवी दिल्ली : करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सार्क देशांनी संयुक्त रणनीती आखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रस्तावित केले. त्याला नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या सदस्य देशांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि करोनाचा संयुक्तपणे मुकाबला करण्यासाठी मोदी यांनी ठेवलेल्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले.

  • सार्क सदस्य देशांनी जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचे आवाहन करताना मोदी यांनी, रणनीती ठरविण्यासाठी सदस्य देशांच्या नेत्यांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचेही प्रस्तावित केले. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी मोदी यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

  • आपण एकत्रितपणे जगासमोर उदाहरण ठेवू शकतो, सार्क देशांनी एकत्रित येऊन करोनाचा मुकाबला करण्यासाठी रणनीती ठरवावी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण देशवासीयांच्या आरोग्याबाबत चर्चा करू शकतो, असे मोदी म्हणाले. सरकार आणि जनता करोनाचा मुकाबला करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहेत, असे मोदी यांनी ट्विट केले.

येस बँकेच्या पुनर्रचनेस केंद्राची मंजुरी : 
  • नवी दिल्ली : आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेच्या पुनर्रचनेच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या योजनेला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसंदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी पैसे काढण्याची ५० हजार रुपयांची मर्यादाही रद्द होईल. भारतीय स्टेट बँक येस बँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

  • येस बँकेत खासगी बँकांनीही गुंतवणूक करण्याची तयारी दाखली आहे. आयसीआयसीआय बँकने एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेची येस बँकेत पाच टक्के गुंतवणूक असेल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पुनर्रचनेच्या योजनेसंदर्भात सहा मार्च रोजी मसुदा जाहीर केला गेला होता व हरकतीही मागितल्या होत्या. त्यानुसार योजनेला अंतिम स्वरूप दिले गेले आहे.

  • या योजनेनुसार स्टेट बँकेची ४९ टक्के गुंतवणूक असेल. स्टेट बँकेला किमान तीन वर्षे २६ टक्के गुंतवणूक येस बँकेत कायम ठेवावी लागेल. खासगी गुंतवणूकदारांसाठी ही मर्यादा ७५ टक्के इतकी असेल.

‘आयपीएल’ १५ एप्रिलपर्यंत स्थगित : 
  • नवी दिल्ली : करोना विषाणूच्या भीतीमुळे गर्दी टाळण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य विभागाने केल्यानंतर दडपणाखाली असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • ‘‘करोनाच्या धास्तीमुळे खबरदारीचे उपाय म्हणून बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्पर्धेला स्थगिती दिली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. देशभरात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली हे आयपीएलमधील फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे घरचे मैदान आहे.

  • बीसीसीआयने २९ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत आयपीएलला स्थगिती दिली असली तरी १५ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता केलेली नाही. जरी १५ एप्रिलनंतर आयपीएलला सुरुवात झाली तरी बंदिस्त स्टेडियममध्ये किंवा प्रेक्षकांविना ही स्पर्धा खेळवण्यात येईल.

१४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.