चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 14, 2019 | Category : Current Affairsनीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड :
 • रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

 • भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी नीता अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचं बोर्डस्की यांनी स्पष्ट केलं. नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

 • “या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणं हा मी माझा गौरव समजते” असं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. गेली अनेक वर्षे या म्युझियमच्या विकास कार्यात सहभाग आहे. म्युझियमच्या वतीने भारतातले अनेक उपक्रम राबवण्यात आले. भारतीय कला आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी, त्याची चर्चा व्हावी ही माझी इच्छा आहे असंही नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. 

शबरीमलात महिलांना प्रवेश: फेरविचार याचिकांवर आज निकाल :
 • केरळातील शबरीमलाच्या अय्यपा मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना (मासिक पाळी येणाऱ्या महिलांसह) प्रवेश  देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. रूढी परंपरेनुसार शबरीमलातील अय्यपा मंदिरात पाळीच्या वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे.

 • त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालात  सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा आदेश लागू केला होता. त्यानंतर त्या निकालावर एकूण ६५ याचिका दाखल झाल्या असून त्यात ५६ फेरविचार याचिका, चार नव्या व पाच हस्तांतर याचिकांचा समावेश आहे.

 • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फेरविचार याचिकांवरचा निकाल ६ फेब्रुवारी रोजी राखून ठेवला होता. मूळ निकाल देणाऱ्या घटनापीठात न्या. आर. एफ नरीमन, न्या. ए. एम खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड  व न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता.

 • २८ सप्टेंबर २०१८ रोजी सर्व वयोगटाच्या महिलांना शबलीमलातील अय्यपा मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय ४ विरुद्ध १ मतांनी देण्यात आला होता. त्यानंतर १० ते ५० वयोगटातील महिलांवर अय्यपा मंदिरात जाण्यास असलेली प्रवेशबंदी उठवण्यात आली होती.

राफेलप्रकरणी फेरविचार याचिकांवर आज निर्णय : 
 • फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला  निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल  जाहीर करणार आहे.

 • दसॉल्ट कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च झाली असून सगळी निर्णय प्रक्रियाच सदोष होती असा  आरोप काँग्रेससह विरोधकांनी केला होता.

 • फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची निर्णय प्रक्रिया सदोष होती तसेच पूर्वीच्या करारापेक्षा आताच्या करारातच जास्त पैसा खर्च करण्यात आला असा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता.

 • १४ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमानांच्या ५८ हजार कोटी रुपयांच्या करारातील गैर प्रकारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी व वकील-कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी निकालावर फेरविचार करण्याची मागणी एका याचिकेतून केली होती. याशिवाय वकील विनीत धंधा, आपचे वकील संजय सिंह यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश  रंजन गोगोई, न्या. एस.के.कौल, न्या. के.एम जोसेफ हे गुरुवारी निकाल देणार आहेत.

‘मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिलेच नव्हते’ :
 • शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे कोणतेही आश्वासन भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीच्या चर्चेत केलेले नव्हते, असे स्पष्टीकरण देत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी मौन सोडले. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपावर पहिल्यांदाच शहा यांनी प्रतिक्रिया दिली.

 • महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, युतीचा विजय झाला तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. त्यावर कोणीही (शिवसेनेने) एकदाही आक्षेप घेतला नाही. आता मात्र कोणी नवीन अटी घालत असेल तर ते भाजप कसे मान्य करेल?, असा मुद्दा मांडत शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे आरोप फेटाळले.

 • युतीला पुन्हा सत्ता मिळाली तर मंत्री पदांमध्ये निम्मा निम्मा वाटा आणि अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद अशी मागणी शिवसेनेने केली होती. निवडणुकीपूर्वी शहा आणि फडणवीस यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. गेल्या आठवडय़ात फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव यांचे आरोप फेटाळले होते. आपण उद्धव यांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते.

 • शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याची चर्चा झाली असेल, आपल्याला माहीत नाही, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव यांच्या आरोपांचे ओझे शहा यांच्या खांद्यावर टाकले होते. त्याबाबत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना बुधवारी उत्तर दिले.

सिंधूचा दमदार विजय; पुढील फेरीत धडक : 
 • हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पी.व्ही. सिंधूने दुसऱ्या फेरीत झेप धडक मारली. सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सामन्यात पी. व्ही सिंधूने चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूला २१-१५, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या बुसनान ओंगबारुंगफान हिच्याशी होणार आहे.

 • त्याआधी सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचं आव्हान हाँगकाँग ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान ने १३-२१, २०-२२ अशा दोन सेट्समध्ये पराभूत केलं. गेल्या सहा स्पर्धांचा इतिहास पाहता पाच स्पर्धांमध्ये सायना पहिल्याच फेरीतून बाहेर पडली आहे.

 • पुरुषांमध्ये १६ व्या मानांकित समीर वर्माचं आव्हान चीन तैपेईच्या वँग त्झू वईने अवघ्या ५४ मिनिटांत परतवून लावलं. पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागण्याची समीरची ही तिसरी वेळ ठरली आहे. 

दिनविशेष :
 • जागतिक मधुमेह दिन / राष्ट्रीय बाल दिन

महत्वाच्या घटना 

 • १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

 • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

 • १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

 • १९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

 • १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 • २०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

जन्म 

 • १७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

 • १८८९: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

 • १८९१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

 • १९१९: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)

 • १९२२: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

 • १९२४: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)

 • १९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

 • १९७१: भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९७१: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)

 • १९७७: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

 • १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)

 • २०००: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

 • २०१३: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.

 • २०१३: भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)

 

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)