चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ ऑक्टोबर २०१९

Date : 14 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा - मंजूला रौप्यपदक : 
  • भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिची विजयी घोडदौड अखेर रशियाच्या एकतारिना पाल्टसेव्हा हिने रोखली. लाइट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने मंजू राणी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली.

  • जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या हरयाणाच्या सहाव्या मानांकित मंजू राणीला दुसऱ्या मानांकित एकतारिनाकडून १-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. एम. सी. मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांना उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागल्यानंतर मंजू राणीने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती.

  • मंजू राणी आणि एकतारिना यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर भर दिल्यामुळे दोघींचेही पारडे जड मानले जात होते. मात्र रशियाच्या एकतारिनाने डाव्या बाजूने हुकचे अप्रतिम फटके लगावत बाजी मारली. दुसऱ्या फेरीत मंजू राणीने सरळ ठोसे लगावत एकतारिनाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला.

  • चाहत्यांचाही तिला पाठिंबा मिळू लागला. पण तिसऱ्या आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा अवलंबला. त्यामुळे पंचांना अनेक वेळा मध्यस्थी करावी लागली. तुल्यबळ लढतीनंतर या दोघींमध्ये विजयी कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पंचांनी एकतारिनाचा हात वर केल्यानंतर भारतीय गोटात निराशा पसरली. अचूक ठोसे लगावल्याचा फायदा एकतारिनाला झाला.

भारतीय नन मरियम थ्रेसिआ यांना संतपद जाहीर :
  • व्हॅटिकन सिटीमध्ये रविवारी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय जोगीण (नन) मरियम त्रेस्या यांच्यासह आणखी चौघांना पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले.

  • केरळमधील त्रिशुर येथे मे १९१४ मध्ये ‘काँग्रिगेशन ऑफ दि सिस्टर्स ऑफ दि होली फॅमिली’ची स्थापना केलेल्या मरियम त्रेस्या यांना सेंट पीटर्स चौकात झालेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मातील हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आले

  • केरळमधील या जोगिणीशिवाय ब्रिटनचे कार्डिनल जॉन हेन्री न्यूमन, स्वित्झर्लंडच्या मार्गेरिट बेज या सामान्य महिला, ब्राझीलच्या सिस्टर डुल्स लोपेस आणि इटलीच्या सिस्टर गिसेप्पिना वन्निनी यांनाही संतपद देण्यात आले. या कार्यक्रमात लॅटिन भाषेतील एक ईशस्तोत्र म्हणण्यात आले.

  • ‘आमच्या या संतांसाठी आज आम्ही ईश्वराचे आभार मानतो’, असे पोप फ्रान्सिस उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, या पाच नव्या संतांची प्रचंड मोठी तैलचित्रे सेंटर पीटर्स बॅसिलिका येथे लावली होती. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स कार्यक्रमाला उपस्थित होते.

मंदीसदृश स्थितीतही भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था :
  • जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीसदृश स्थितीने भारताला मोठा फटका बसला असला तरी अजूनही तो वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे, असे मत जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ  हॅन्स टिमर यांनी व्यक्त केले आहे.

  • जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विषयक अर्थतज्ज्ञ असलेल्या टिमर यांनी सांगितले,की जागतिक आर्थिक मंदीसदृश स्थितीचा फटका भारताला  बसत असूनही त्याचा वाढीचा दर इतर अनेक  देशांपेक्षा अधिक आहे यात शंका नाही.

  • भारताचा विकास दर २०१६ मध्ये ८.२ टक्के होता, तो पुढील दोन वर्षांत २.२ टक्के घसरला याबाबत विचारले असता ते म्हणाले,की गुंतवणूक व वस्तूंच्या खपाअभावी भारताला फटका बसला आहे. त्यामुळे या देशाला अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. आता जो विकास दर अंदाज कमी करण्यात आला आहे, तो २०१२ च्या तुलनेत फार मोठी घट म्हणता येणार नाही. २००९ मध्येही असेच मंदीसदृश वातावरण होते तेव्हाही अशीच घट झाली होती. त्यापेक्षाही आताची घट फार मोठी नसली तरी गंभीर परिस्थिती आहे हे मान्य करावेच लागेल.

  • जगात सध्या जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसारच भारतातील चित्र आहे. कारण जगात सगळीकडे गुंतवणूक कमी होत आहे व जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढत आहे. भारतातील  ८० टक्के मंदीसदृश स्थिती ही जवळपास  जागतिक कारणांमुळे आहे. विकसनशील देशांची निर्यात कमी झाली असून त्यामुळे त्यांची देशांतर्गत अर्थव्यवस्थाही खाली येत आहे, असे त्यांनी सांगितले.

गांधीजींनी आत्महत्या कशी केली :
  • महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

  • आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.

  • गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका

  • खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

  • सुफलम शाळा विकास संकुल ही संस्था काही शाळा आणि शैक्षणिक संस्था चालवते. या संस्थेला गुजरात सरकार अनुदानही देते. शाळेतील शिक्षकांनी विचारलेल्या या विचित्र प्रश्नप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • दोन्ही प्रश्न अतिशय आक्षेपार्ह असून या प्रकाराची आम्ही चौकशी सुरू केली आहे. अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे गांधीनगर जिल्ह्य़ाचे शिक्षण अधिकारी भारत वधेर यांनी सांगितले.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी क्रिकेटचा ‘दादा’; सौरव गांगुलीची निवड निश्चित :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे.

  • सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर तो या पदावर २०२० पर्यंत कार्यरत राहील.  त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

  • ‘बीसीसीआय’च्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, या दृष्टीने रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय यांना सचिवपद आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण सिंग धुमाळ यांच्या नावांबाबत संघटकांचे एकमत झाले आहे. जय हे गुजरात क्रिकेट संघटनेचे आणि अरुण सिंग हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या देबाजित सैकिया यांना संयुक्त सचिवपदासाठी उमेदवारी दिली जाणार आहे.

दिनविशेष :
  • जागतिक मानक दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.

  • १९१२: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.

  • १९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.

  • १०२६: ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.

  • १९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-१ या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.

  • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

  • १९८१: उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.

  • १९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.

  •  

जन्म 

  • १६४३: मुघल सम्राट बहादूरशहा जफर (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२)

  • १७८४: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३)

  • १८८२: आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५)

  • १८९०: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९६९)

  • १९२४: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)

  • १९२७: जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म.

  • १९३१: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९८६)

  • १९३६: लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

  • १९३९: राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक राल्फ लॉरेन यांचा जन्म.

  • १९४०: भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते क्लिफ रिचर्ड यांचा जन्म.

  • १९५८: इटावा घराण्याचे सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म.

  • १९८१: भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१९: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८५५)

  • १९४४: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)

  • १९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)

  • १९५३: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८२)

  • १९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)

  • १९९४: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)

  • १९९७: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २१ मे १९१६)

  • १९९९: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस न्येरेरे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९२२)

  • २००४: स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)

  • २०१३  केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)

  • २०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे १९३०)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.