चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ फेब्रुवारी २०२०

Date : 15 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धा - महाराष्ट्राचे संघ बाद फेरीत : 
  • रोहतक : रोहतक येथे चालू असलेल्या ४६व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

  • महाराष्ट्राच्या मुलांनी पाँडेचरीला, तर मुलींनी आपल्याच विदर्भ संघाला चितपट करीत आगेकूच केली.

  • महाराष्ट्राच्या मुलांनी साखळीतील पहिल्या सामन्यात पुडिचेरीचा ५७-२५ असा सहज पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत २६-११ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धातदेखील जोशपूर्ण खेळ करीत प्रतिस्पध्र्यावर चार लोण चढवत गुणांचे अर्धशतक पार केले. महाराष्ट्राच्या तेजस पाटीलने १२ चढाया करीत ८ गुण घेतले व ५ पैकी ३ पकडी यशस्वी केल्या. परेश हरडने ११ चढायांत ९ गुण मिळवले, तर २ पकडी पकडी यशस्वी केल्या. वैभव गर्जेने ३ पकडी घेतल्या.

  • हर्ष लाडने २ पकडी करीत त्यांना बरी साथ दिली. सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलांनी मध्य प्रदेशला ५४-३१ असे नमवत दुसऱ्या विजयाची नोंद केली. प्रतीक चव्हाणने एका चढाईत मध्य प्रदेशचे ४ गडी टिपत लोण दिला आणि येथूनच सामना महाराष्ट्राच्या बाजूने एकतर्फी झुकला. आकाश चव्हाणने २४ चढाया करताना २० गुण मिळवत सामन्यावर ठसा उमटवला. प्रथमेश निघोटने १० पैकी ६ यशस्वी पकडी करीत, तर प्रतीक चव्हाणने चढाईत उत्तम साथ दिली. मध्य प्रदेशकडून भानू, अनुपम सिंग यांनी बऱ्यापैकी लढत दिली.

चीनमध्ये ‘करोना’चे १,५०० बळी : 
  • बीजिंग :  चीनमध्ये करोना विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात हुबेई प्रांतात अलीकडे झालेल्या १२१ मृत्यूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झालेल्या चीनमधील रुग्णांची संख्या आता ६५ हजारांवर पोहोचली आहे.

  • करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात गुरुवारी या विषाणूच्या बाधेमुळे ११६ जणांचे बळी गेले. याच दिवशी करोनाची लागण निश्चित झालेले आणखी ४८२३ रुग्ण नोंदले गेले, अशी माहिती या प्रांताच्या आरोग्य आयोगाने शुक्रवारी दिली.

  • चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचे नवे ५०९० रुग्ण आढळून आल्याने या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६४ हजार ८९४ झाली आहे.

  • गुरुवारी देशभरात करोनाचे १२१ रुग्ण दगावले, तसेच करोनाची लागण निश्चित झाल्याचे ५०९० रुग्ण नोंदविण्यात आले. गुरुवारच्या एकूण १२१ मृत्यूंपैकी ११६ हुबेई प्रांतात, दोन हीलोंगजिंग प्रांतात आणि प्रत्येकी एक अन्हुई, हुनान आणि चॉन्गक्विंग प्रांतात झाले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल घेणार शपथ, रामलीला मैदानावर उद्या सोहळा :
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारुन ७० पैकी ६२ जागा आपने जिंकल्या. यानंतर अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. त्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवार) दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर इतर सहा मंत्र्यांचाही शपथविधी त्यांच्यासोबत होणार आहे. या सहा मंत्र्यांमध्ये मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. १६ फेब्रुवारी म्हणजेच उद्या रामलीला मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

  • अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही ते स्पष्ट झालेलं नाही. आपच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दिल्लीतील खासदारांना आणि भाजपाच्या आठ आमदारांनाही शपथविधीसाठी बोलवण्यात आलं आहे.

  • दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि आप म्हणजेच आम आदमी पार्टी यांच्यात मुख्य लढत होती. निवडणूक निकालापूर्वी आम्ही ५५ जागा जिंकू असा दावा भाजपाने केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६२ जागा जिंकत भाजपाचा पराभव केला. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपवर विश्वास टाकला हेच त्याचं प्रमुख कारण होतं. दिल्ली विधानसभेसाठी गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नव्हती. काँग्रेसची ती अवस्था या वेळीही झाली. दिल्लीत एकही जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव : 
  • बीजिंग - कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १११३ झाली असून, रुग्णांची संख्या ४४,२०० वर गेली आहे. चीनच्या हुवेई प्रांतात बुधवारी ९४ जणांचा या व्हायरसने बळी घेतला.

  • जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आता ‘कोविड-१९’ हे नाव दिले आहे. कोरोनातील को, व्हायरस (विषाणू) तील व्ही आणि आजार (डिसिज) मधील डी यातून ते नाव तयार केले आहे. हा व्हायरस २०१९ मध्ये आढळल्याने त्यापुढे १९ हा उल्लेख ठेवला आहे.

  • कोरोनो व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, ४० हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमध्ये ३१ डिसेंबर रोजी आढळला. त्यानंतर अशा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्याचा संसर्ग वाढू नये, म्हणून रुग्णांसाठी चीनने विशेष हॉस्पिटल बांधले आहे. 

१५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.