चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जानेवारी २०२०

Updated On : Jan 15, 2020 | Category : Current Affairsगुड न्यूज - राज्यात लवकरच आठ हजार पदांची पोलीस भरती :
 • राज्यात अनेक महिन्यांपासून जी पोलीस भरती थांबलेली होती, ती भरती प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. जवळपास आठ हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 • अमरावतीमधील दर्यापूर येथील एका कार्यक्रमानंतर गृहमंत्र्यांनी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री  यांनी सांगितले.  याचबरोबर राज्य सरकार गृहखात्यामधील रिक्त पदं देखील लवकरच भरणार आहे. त्यामुळे आता पोलीस होऊ इच्छिणाऱ्या तरूणांसाठी ही आनंदाची व समाधानकारक बातमी आहे.

 • याचबरोबर पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गेल्या काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाज कंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार : 
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प भारत भेटीवर येऊ शकतात. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी सुरु आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग खटल्याची सुनावणी पुढच्या आठवडयात सुरु होऊ शकते. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळीच त्यांच्याविरोधात अमेरिकेत हा खटला सुरु असेल असा अंदाज आहे.

 • ट्रम्प यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी दोन्ही देश संपर्कात असून, सोयीच्या तारखा ठरवण्यासाठी चर्चा सुरु आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ट्रम्प आणि मोदी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या द्विपक्षीय व्यापार करारासह अन्य करारांवर स्वाक्षरी करु शकतात.

 • भारताची आर्थिक विकासाची गती सध्या मंदावली असून, सीएए कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा दौरा होत आहे. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम झाला होता.

 • डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदी यांचा हात हातात घेऊन त्यांनी संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मागच्यावर्षी ट्रम्प यांनी भारताचे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

नड्डा हेच भाजपचे नवे अध्यक्ष : 
 • नवी दिल्ली: भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हेच पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. सध्या भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका होता असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी २० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. विद्य्मान अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नि:संशय पाठिंबा असल्याने नड्डा यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

 • भाजपच्या मुख्यालयात मंगळवारी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेतील सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेची अधिकृत घोषणा १७ जानेवारी रोजी केली जाणार असून १९ जानेवारी ही अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. २० तारखेला दुपारी तीनच्या सुमारास भाजपच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल.

 • लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळवून देऊन सर्वाधिक यशस्वी अध्यक्ष असे बिरूद मिळवणारे अमित शहा मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये  गृहमंत्री बनल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे दिली जात आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम भाजपमध्ये काटेकोरपणे पाळला जात असल्याने नवा राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती होणार आहे. मात्र, भाजपच्या पक्ष संघटनेवर पकड मात्र मोदी-शहा यांचीच राहणार असल्याचे पक्षांतर्गत स्तरावर अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात आले आहे.

रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे सोमवारी वितरण :
 • प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकींचे उच्च प्रतीची व्यावसायिक मूल्ये जपून वार्ताकन करणाऱ्या मुद्रण, प्रक्षेपण आणि डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांना पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत २० जानेवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 • रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. यंदा २५ लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून मुद्रण, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. व्यापारी, आर्थिक, क्रीडा, राजकीय वार्ताकन, चित्रपट आणि दूरदर्शन पत्रकारिता, नागरी पत्रकारिता, पर्यावरणविषयक वार्ताकन, युद्धभूमीवरील पत्रकारिता आणि प्रादेशिक भाषेतील वार्ताकन आदी वर्गवारींचा त्यात समावेश आहे.

 • जिंदाल स्कूल ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, ओ. पी. जिंदाल विद्यापीठाचे टॉम गोल्डसेइन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या पत्रकार पामेला फिलिपोस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण या मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

पाच महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सात दिवसांसाठी ‘2-जी’ इंटरनेट सेवा :
 • केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरध्ये जवळपास पाच महिन्यानंतर जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाइल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा केवळ पोस्टपेड मोबाइलवरच उपलब्ध असणार आहे.

 • याचबरोबर हॉटेल, रुग्णालय व निगडीत संस्थामध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा उधमपुर, कठुआ, सांबा व रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणार आहे. या संबंधीचा आदेश १५ जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत लागू असणार आहे.

 • मंगळवारी गृह विभागाच्यावतीने यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आपल्या आदेशात गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे की, काश्मीर विभागात अतिरिक्त ४०० इंटरनेट कियोस्क स्थापले जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्यासर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देतील.

१५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)