चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ ऑक्टोबर २०१९

Date : 15 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘बीसीसीआय’ची प्रतिमा सुधारण्याची संधी : 
  • मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रतिमा डागाळलेली असतानाच, आता चांगले काम करण्याची संधी आहे. पुढील काही महिन्यांत भारतीय क्रिकेटचा कारभार सुरळीत होईल, असे आश्वासन भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सर्व प्रतिस्पध्र्यावर मात करणाऱ्या सौरव गांगुलीचा मार्ग सुकर झाला आहे.

  • बीसीसीआयच्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान निवडणुका होण्याची शक्यता असून अध्यक्षपदासाठी गांगुली हाच एकमेव उमेदवार असणार आहे. अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या गटांनी आपापला अध्यक्ष बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर गांगुलीने ब्रिजेश पटेल यांच्यावर मात करत अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला.

  • ‘‘देशाचे प्रतिनिधित्व तसेच भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची भूमिका सांभाळणे, ही फार मोठी जबाबदारी आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीसीसीआयची प्रतिमा काहीशी डागाळली आहे. त्यामुळे बीसीसीआयसाठी काही तरी चांगले आणि भरीव काम करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. मी आणि माझे सहकारी एकत्र येऊन बीसीसीआयचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे गांगुलीने सांगितले.

अमर्त्य सेन यांच्यानंतर दुसऱ्यांदा अर्थशास्त्राचे नोबेल : 
  • स्टॉकहोम : भारतीय – अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना सोमवारी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाल्याने भारतीय व भारतीय वंशाच्या नोबेल मानकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. बॅनर्जी यांच्यासमवेत त्यांच्या फ्रेंच अमेरिकी पत्नी एस्तेर डफलो व अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले आहे.

  • रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये पहिल्यांदा साहित्याचे नोबेल मिळाले होते त्यात गीतांजलीसह त्यांच्या सर्वंकष साहित्याचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर १९३० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल  चंद्रशेखर व्यंकट रमण यांना रामन परिणामासाठी मिळाले.  भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक हरगोबिंद खुराना यांना १९६९ मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल  मिळाले होते. त्यावेळी इतर दोन जण सह मानकरी होते. जनुकीय संकेतावलीचा अर्थ व त्याचे प्रथिन संश्लेषण असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.

नोबेलचे भारतीय मानकरी

* १९१३   रवींद्रनाथ टागोर – साहित्य

* १९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र

* १९६९- हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र

* १९७९- मदर तेरेसा – शांतता

* १९८३- सुब्रमण्यम चंद्रशेखर  भौतिकशास्त्र

* १९९८ अमर्त्य सेन – अर्थशास्त्र

* २००९ व्यंकटरमण रामकृष्णन- रसायनशास्त्र

* २०१४- कैलाश सत्यार्थी – शांतता

* २०१९ – अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र

‘पीएमसी’ खातेधारकांना आता ४० हजार रुपये काढता येणार, आरबीआयचा निर्णय : 
  • पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ‘पीएमसी’ बँकेच्या खातेधारकांसाठी खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता या बँकेचे खातेधारक सहा महिन्यांच्या कालावधीत ४० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. या अगोदर पैसे काढण्याची मर्यादा २५ हजार रुपये होती.

  • याप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’चे संचालक, प्रवर्तक यांच्यासह पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांची तब्बल ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे.

  • मुंबईतील पीएमसी बँकेतील ४ हजार ३०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर आरबीआयकडून येथील खातेधारकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते. सुरूवातीस तर हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, याप्रकारामुळे प्रचंड संतप्त झालेल्या खातेधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर व हा मुद्दा सर्वत्र उचलल्या गेल्याने पैसे काढण्याची मर्यादा हळूहळू वाढवल्या जात असल्याचे दिसत आहे.

  • यापूर्वी पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यासमोर आपले पैसे परत मिळावेत यासाठी निषेध आंदोलनही केले आहे. १० ऑक्टोबर रोजी जेव्हा सीतारामन मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात होत्या त्यावेळी पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या एका गटाने सीतारामन यांची भेट घेतली होती.

  • दरम्यान, पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आज यातील तीन आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वारयाम सिंह यांना न्यायालयामोर हजर केले होते. न्यायालयाने या सर्व आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अभिजित बॅनर्जी यांनाअर्थशास्त्राचे नोबेल : 
  • स्टॉकहोम : ‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले.

  • ‘‘बॅनर्जी, डफलो, क्रेमर यांच्या संशोधनामुळे जागतिक दारिद्रय़ाशी सामना करण्याच्या आमच्या क्षमतेत भरपूर सुधारणा झाली. प्रयोगावर आधारित त्यांच्या नव्या दृष्टिकोनामुळे केवळ दोन दशकांत विकासात्मक अर्थशास्त्राचे स्वरूप बदलले आणि आता या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे,’’ अशा शब्दांत नोबेल निवड समितीने पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला.  बॅनर्जी आणि फ्रेंच वंशाच्या अमेरिकी संशोधक डफलो यांनी प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन केले, तर क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत.

  • डफलो अर्थशास्त्रात नोबेल मिळालेल्या दुसऱ्या महिला आणि सर्वात तरुण विजेत्या आहेत. या पुरस्काराची ९ लाख १८ हजार डॉलर्सची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे अमर्त्य सेन यांना यापूर्वी १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. त्यानंतर हा सन्मान मिळालेले अभिजित बॅनर्जी हे दुसरे बंगाली आहेत.

  • क्रेमर हे विकास अर्थशास्त्रज्ञ असून ते सध्या हार्वर्ड विद्यापीठात विकासात्मक समाज विषयाचे प्राध्यापक आहेत.

दिनविशेष :
  • जागतिक विद्यार्थी दिन / जागतिक हातधुणे दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४६: अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

  • १८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.

  • १८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.

  • १९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

  • १९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

  • १९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

  • १९८४: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

  • १९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.

जन्म 

  • १५४२: तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)

  • १८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

  • १८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.)

  • १९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

  • १९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

  • १९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

  • १९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

  • १९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७८९: उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

  • १९१७: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)

  • १९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.

  • १९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

  • १९४६: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९३)

  • १९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

  • १९८१: इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.

  • १९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

  • २००२: प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.

  • २०१२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.