चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ डिसेंबर २०१९

Date : 16 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सम्मेद शेटे बनला कोल्हापूरचा पहिला बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर : 
  • शुक्रवारी संपलेल्या मलेशिया मधील पिनांग हेरीटेज सिटी आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापुरच्या सम्मेद शेटेने आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळवून आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठीची पात्रता पूर्ण केली आहे. याचसोबत सम्मेदने स्पर्धेत नऊ पैकी सात गुण मिळवून तिसरा क्रमांकही पटकावला. त्यामुळे सम्मेद कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे.

  • बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्म बुद्धिबळ स्पर्धेत खेळल्यानंतर ठराविक आवश्यक कामगिरी करावी लागते. तीन नॉर्म व २४०० आंतरराष्ट्रीय गुणांकनाचा टप्पा पार करणे आवश्यक असते. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय मास्टर किताब जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (फिडे) बहाल करण्यात येतो. सम्मेदने २४०० गुणांकनाचा टप्पा सहा महिन्यापूर्वीच पार केला होता. गतवर्षीच्या दिल्ली ग्रँडमास्टर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत सम्मेदचा पहिला नॉर्म झाला त्यानंतर रशिया मधील एरोफ्लोट आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा नॉर्म कमविला व अंतिम तिसरा नॉर्म शुक्रवारी कमावत सम्मेदने आपल्या आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केलं.

  • या स्पर्धेत पहिल्या तीन फेरीत कमी गुणांकन असलेल्या स्पर्धकांना सहजपणे हरवित नवव्या मानांकित सम्मेदने तीन गुणांसह आघाडी घेतली. नंतरच्या चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित ग्रँडमास्टर कोर्निव्ह ओलिगला बरोबरीत रोखले, त्यानंतरच्या पाचव्या फेरीत चौथा मानांकित व गतविजेत्या अझरबैजानचा मिर्झोव्ह अझर कडून सम्मेद पराभूत झाला. त्यानंतर पुन्हा सावरत सम्मेदने सलग तीन विजय नोंदविताना अनुक्रमे सहाव्या फेरीत जर्मनी च्या ओल्फ वॉल्टर, सातव्या फेरीत इंडोनेशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर फर्मान फँरीड तर आठव्या फेरीत इंडोनेशियाच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर शेत्याकी जोदीचा पराभव करून पुन्हा आघाडी घेतली. 

FAS Tag नव्या वर्षात होणार लागू; केंद्राच्या निर्णयामुळे मोठा दिलासा : 
  • टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्यानं केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.  नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, ज्यांनी फास्टॅग घेतलेलं नाही. त्यांना महिनाभराचा दिलासा मिळाला आहे.

  • राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्यांवर वाहनधारकांना मोठ्या रांगांचा सामना करावा लागत होता. या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर फास्टॅगची योजना तयार केली होती. ‘वन नेशन वन फास्टॅग’ असं या योजनेचं नाव आहे.

  • टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. मात्र, फास्टॅगचा तुटवढा निर्माण झाल्यानं केंद्रानं फास्टॅग लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

जमैकाची टोनी सिंह विश्वसुंदरी : 
  • येथे झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंह हिने विश्वसुंदरी २०१९ किताब पटकावला असून भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली.  जमैकाची तेवीस वर्षीय टोनी अ‍ॅन सिंह हिला विजेती घोषित करण्यात आले.

  • ब्रिटिश दूरचित्रवाणीवरील पीअर्स मॉर्गन यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. टोनी अ‍ॅन सिंह ही इंडो कॅरेबियन वडील ब्रॅडशॉ सिंह व आफ्रिकन कॅरबियन आई जारिन बेली यांची कन्या असून ती फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत महिला अभ्यास व मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे. स्पर्धेच्या वेळी तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिने व्हिटनी ह्य़ूस्टनचे ‘आय हॅव नथिंग’ हे गाणे सादर केले.

  • गतवर्षीची विजेती मेक्सिकोची व्हॅनेसा पॉन्स द लिऑन हिने तिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट ठेवला. सिंह हिने तिचा विजय इन्स्टाग्रामवर छायाचित्र टाकून साजरा केला. तिने जमैकाच्या लोकांचे खास आभार मानले आहेत.

  • ती म्हणाली, ‘माझे मन प्रेम व कृतज्ञतेच्या भावनेने भरून गेले आहे, तुम्ही सर्वानी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. तुम्हीच माझा माझ्यावरचा विश्वास वाढवला आहे. मला या सन्मानाने खूप  भारावून गेल्यासारखे वाटते. माझे कुटुंब व मित्र यांची मी आभारी आहे. तुमचे प्रेम व पाठिंबा घेऊनच मी आता जगात वावरणार आहे. माझ्या आईवर माझे प्रेमच आहे, तिच्या निम्मी पातळी गाठू शकले तरी ते खूप होईल. आईच माझे शक्तिस्थान आहे.

बांगलादेशने भारताकडे मागितली त्यांच्या बेकायदेशीर नागरीकांची यादी : 
  • बांगलादेशने भारताकडे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या त्यांच्या नागरीकांची यादी मागितली आहे. आम्ही भारताला त्यांच्या देशात बेकायद वास्तव्याला असणाऱ्या आमच्या नागरीकांची यादी सुपूर्द करण्याची विनंती केली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी रविवारी ही माहिती दिली. अब्दुल मोमेन यांनी मागच्या आठवडयात व्यस्त वेळापत्रकाचे कारण देऊन भारत दौरा रद्द केला होता.

  • एनआरसी संबंधी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “भारत-बांगलादेशचे संबंध खूप सामान्य आणि चांगले आहेत. एनआरसी हा भारताचा अंतर्गत विषय आहे. एनआरसीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर कुठलाही परिणाम होणार नाही असे आम्हाला भारताकडून आश्वासन मिळाले आहे.” आर्थिक कारणांमुळे काही भारतीय सुद्धा मध्यस्थामार्फत बांगलादेशमध्ये बेकायदा प्रवेश करत असल्याचा त्यांनी दावा केला.

  • “बांगलादेशमध्ये आमच्या नागरीकांव्यतिरिक्त अन्य कोणाचे बेकायदा वास्तव्य आढळून आले तर त्यांना माघारी पाठवू” असे मोमेन म्हणाले. भारताला लागून असणाऱ्या सीमेवरुन काही जण बांगलादेशमध्ये प्रवेश करतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

१६ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.