चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जानेवारी २०२०

Date : 16 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा - कार्लसनचा आणखी एक विश्वविक्रम :
  • विकआंझे (हॉलंड) : विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला. सर्वाधिक १११ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कार्लसनने त्याच्या नावे केला आहे. याआधी हा विश्वविक्रम हॉलंडचे सर्जी टिव्हियाकोव यांच्या नावावर होता. जो १५ वर्षांपासून अबाधित होता.

  • कार्लसन सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सलग चौथ्या फेरीत कार्लसनने बरोबरी पत्करली. चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फॉरेस्टविरुद्धचा डाव कार्लसनने बरोबरीत सोडवला.

भारतासमोर तेलाचा प्रश्न - सच्चा मित्र रशिया देणार साथ : 
  • भारत तेलासाठी पश्चिम आशियावर मोठया प्रमाणात अवलंबून आहे. तेलासाठी पश्चिम आशियावरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने आता रशियाकडे मोर्चा वळवला आहे. दीर्घकाळ तेल पुरवठयाचा करार करण्यासंबंधी भारताने रशियाबरोबर चर्चा सुरु केली आहे. रशियाकडून रॉसनेफ्ट ही तेल कंपनी आणि भारताकडून पेट्रोलियम मंत्रालय या चर्चेमध्ये सहभागी झाले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

  • तेलासंबंधी करार झाल्यानंतर नैसर्गिक गॅस पुरवठयासंबंधी सुद्धा रशियाबरोबर करार करण्याचा प्रयत्न आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. जगाच्या कुठल्याही भागात विशेषकरुन पश्चिम आशियात काहीही घडले तरी, त्याचा तेल पुरवठयावर परिणाम होणार नाही. त्यादृष्टीने करार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

  • आर्थिक दृष्टया किफायतशीर असलेल्या समुद्रमार्गाने रशियाने तेल पुरवठा करावा, यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. ऊर्जा स्त्रोतांची वाहतूक करणे हा एक आव्हान असले तरी, पर्याय शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. रशियाचा अति पूर्वेकडचा भाग ऊर्जा स्त्रोतांनी समृद्ध आहे.

एनआयए कायद्याला छत्तीसगडचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान : 
  • नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत यूपीए १सरकारच्या काळात करण्यात आलेला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदा घटनाबाह्य़ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  या कायद्यामुळे राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊन केंद्राला अनिर्बंध अधिकार मिळतात असा दावा याचिकेत केला आहे.

  • केरळ सरकारने नागरिकत्व कायद्याला आव्हान दिले होते त्यानंतर आता एनआयए कायद्याला छत्तीसगड सरकारने आव्हान दिले आहे.

  • मनमोहन सिंग सरकारने २६ नोव्हेंबर २००८ रोजी एनआयए कायदा मुंबई हल्ल्यानंतर केला होता. त्या वेळी काँग्रेस नेते पी.चिदंबरम हे गृहमंत्री होते. या कायद्यानुसार एनआयएच्या पथकांना राज्यांची परवानगी न घेता कुठेही जाऊन छापे टाकणे व चौकशी करणे असे अधिकार देण्यात आले आहेत. छत्तीसगड सरकारने कलम १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, एनआयए कायद्याने राज्यघटनेतील तत्त्वांचा भंग झाला असून असा कायदे करणे संसदेच्याही कार्यकक्षेत नाही. 

अमेरिकेत शिखांची स्वतंत्र जनगणना : 
  • वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रथमच शिखांची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून जनगणना होणार आहे. यंदा (२०२० साली) अमेरिकेत होणाऱ्या जनगणनेवेळी शीख धर्मीयांची स्वतंत्ररीत्या गणना करण्यात येणार असल्याची माहिती, येथील अल्पसंख्याक संघटनेने दिली.

  • सॅन डियागो येथील शीख संघटनेचे अध्यक्ष बलजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख समुदायाची स्वतंत्ररीत्या जनगणना व्हावी यासाठी आम्ही बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा बैठका घेण्यात आल्या. त्याचे फळ आज मिळाले आहे. या निर्णयाचा केवळ शीख धर्मीयांनाच नव्हे, तर अमेरिकेतील सर्व अल्पसंख्याक समुदायांना पुढच्या काळात फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या अल्पसंख्याक समुदायाची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून गणना होत असून, त्यांना विशिष्ट प्रकारचा संकेतांक (कोड) दिला जाणार आहे. या संकेतांकामुळे स्वतंत्ररीत्या गणना करताना अधिक पारदर्शकता आणि अचूकता राहील, अशी माहिती अमेरिकेतील जनगणना कार्यालयाचे उप-संचालक रॉन जर्मिन यांनी दिली.

नोटांवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापा, रूपया मजबूत होईल - सुब्रमण्यम स्वामी :
  • भारतीय जनता पक्षाचे नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीबाबत एक अजब विधान केलं आहे. ‘भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापण्याच्या बाजूने आपण आहोत’, असे स्वामी म्हणालेत.

  • सुब्रमण्यम स्वामी यांचे मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये भाषण झाले. ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’विषयावर भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत करताना पत्रकारांनी इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याकडे स्वामींचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना, “या प्रश्‍नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. माझे यासाठी समर्थन आहे.

  • भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत. मी तर असे म्हणेन की भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. कोणालाही याबद्दल वाईट वाटू नये”, असे स्वामी म्हणाले.

१६ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.